शब्दवर्षा :पाक्षिक सदर विषय : भीती 20 नोव्हेंबर 2023

शब्दवर्षा :पाक्षिक सदर  विषय : भीती 20 नोव्हेंबर 2023

शब्दवर्षा :पाक्षिक सदर


प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती वाटतेच.(आता माझा हा लेख कोणाला आवडलाच नाही तर!!!) प्रत्येक लिहीणाऱ्याला ही भीती वाटतंच असते. अर्थात ही भीती माझ्यासारख्या नवोदिताला वाटते प्रतिथयश लेखक या भीतीच्या पल्याड गेला असतो.
हे सदर लिहायला सुरवात केली तेव्हा पण मनात धाकधूक होतीच की आपण वर्षभर लिहू शकू की नाही? पण क्षितिज सरांनी *शब्दवर्षा* हे नावही सुचवलं (जे मला कधीच सुचलं नसतं) आणि विश्वास पण दाखवला. हा विश्वास फार महत्वाचा असतो.
तू हे करु शकशील हे जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या तोंडून आपण ऐकतो तेव्हा विनाकारण बाळगत असलेली भीती कुठल्या कुठे पळून जाते.

कोणतीही गोष्ट पहिल्यांदा करतांना भीती ही वाटतेच. पहिला स्टेज शो, पहिले भाषण, पहिली तोंडी परिक्षा, पहिले नाटक सगळ्या पहिल्या गोष्टी करतांना पोटात गोळा येतो की नाही? पहिल्यांदाच विमानात बसतांना पण भीती वाटतेच. आजकाल तर रस्त्यावर चालतांना ही भीती वाटते की मागून येऊन कोणती बस किंवा कार आपल्याला उडवेल याची!

लहानपणी शाळेची, शिक्षकांची, आई-वडिलांची, आजी-आजोबांची, अंधाराची, एखाद्या विषयाची कसची ना कसची भीती मनुष्याला वाटतं असतेच. आमच्या एक बाई राग आला की पाटीच डोक्यात मारायच्या. आम्ही जाम टरकून असायचो त्यांना!

पण खरंच भीती म्हणजे काय? एखादी गोष्ट करण्यापासून आपल्या जी जाणीव रोखते तिला भीती म्हणता येईल का?ही भीती मानगुटीवर बसते आणि आपला पिच्छा सोडत नाही. भित्यापाठी ब्रम्हराक्षस! एखाद्या गोष्टीचा अनुभव येईपर्यंत आपल्याला भीती वाटते आणि मग मात्र हळूहळू ती भीती दूर होते. जुनी माणसं म्हणायची की ज्या गोष्टीची तुम्हांला भीती वाटते ती गोष्ट सतत करत राहा, भीती गायब होईल.

मला वाटतं कम्फर्ट झोन हा खुप महत्त्वाचा फॅक्टर आहे. या कम्फर्ट झोनमध्ये माणूस सुरक्षित असतो. यातून बाहेर पडायची वेळ आली की मग घाबरायला होतं. एखाद्याला घर सोडून अचानक दुसरीकडे जायला लागले तर तो सुरवातीला बावचळूनच जाईल किंवा विदर्भातल्या माणसाला डोंबिवली स्टेशनवरून दादरची लोकल पकडायला सांगितली तर काय होईल? इस्ट आणि वेस्ट काय असतं? किंबहुना एका शहराचे असे दोन भाग असतात हेच माहीत नसतं.
म्हणजे परिस्थिती किती आणि कशाप्रकारे बदलते यावरही तुमच्या भीतीचे प्रमाण अवलंबून असते. मनुष्य जास्तीत जास्त प्रयत्न या कम्फर्ट झोनमध्ये राहायचा करतो.


लहान मुलांना कोंडून ठेवले किंवा मारले की भीतीपोटी ती आईवडिलांचे ऐकतात.पण नंतर काय? मनातून इतकी भीती बसली असते की मुलं धाकाने तोतर बोलायला लागतात किंवा बरीच मुलं कोणत्या ना कोणत्या भीतीपोटी अंथरुण ओले करायला लागतात.म्हणजे ज्या गोष्टीपासून रोखायला आपण मुलांना भीती दाखवतो ती गोष्ट बाजूलाच राहते आणि भलतेच काहीतरी होऊन बसतं. भीतीपोटी कोणाच्या ह्रदयाचे ठोके वाढतात तर कोणाला घाम फुटतो तर कोणाचे हातपाय थरथरतात.
अंबिका आणि अंबालिकेला महर्षि व्यासाची भीती वाटली आणि त्याचा परिणाम धृतराष्ट्र अंध होऊन जन्मला तर पंडू अशक्त!!


एकदा माझ्या मैत्रिणीने तिच्या मुलाला शिक्षा म्हणून घराबाहेर ठेवले आणि घराचं दार लावून घेतले. तो माझ्याघरी आला.माझ्या मुलांसोबत जेवायला बसला. मला वाटलं मैत्रीण भाजी वगैरे आणायला गेली बाहेर गेली असेल. ती मात्र मुलगा नाही दिसला तर चांगलीच घाबरली होती. मुलगा दिसत नाही हे लक्षात आल्यावर सगळीकडे बघून आली.
आणि हे महाराज माझ्याकडे जेवून खावून मजेत होते. ती मला घाबरतं घाबरंत सांगायला आली की तिचा मुलगा दिसत नाही आहे ते आणि मुलाला माझ्याघरी पाहून रडायलाच लागली.मला समजेना की हीला अचानक रडायला काय झालं ते! मुलगा मात्र हसायला लागला की आईची कशी गंमत केली म्हणून. पहिलीतल्या मुलाला कुठे भीती - बीती दाखवायची. नंतर मात्र तिने कानाला खडा लावला.

अर्थात थोडासा धाक हा हवाचं.धाक आणि माफक प्रमाणात शिक्षा ही हवीच.
(मोहब्बते या सिनेमात अभिताबला व्हिलन ठरवले आहे पण तसाच धाकात ठेवणारा शाळेचा प्रिन्सिपल हवा) सगळेच प्रेम करायला लागले तर देशाचं काय होणार?

आजकाल बरेच पालक मुलांना हवं ते घेऊन देतात कारण नाही घेऊन दिले तर मुलं काहीतरी वेडावाकड करतील ही भीती सतत पालकांच्या मनात असते. दुर्बल आणि तकलादू समाज व्यवस्थेचे हे चित्र पाहून वैषम्य वाटतं. हीच मुलं पुढे एखादी गोष्ट मिळाली नाही की मग खून /मारामाऱ्या करतात. परवाच बातमी वाचली की दारू प्यायला पैसे दिले नाही म्हणून मुलाने वडिलांचा खून केला. ही भीती कशी संपवायची?

देव आपल्याकडे बघतो आहे ह्या भीतीपायी बरेच लोक वाईट कर्म करायला घाबरतात. चांगली गोष्ट आहे. पण नास्तिक माणसाचे काय? ह्या प्रश्नाची भीती राहतेच. म्हणून देवासाठी नाही तर स्वतःसाठी चांगली कामे करायला हवीत.

एखाद्या व्यक्तीला कामाची सुरुवात करायच्या आधी खूप भीती वाटते पण एकदा का त्या व्यक्तीने ते काम करायला सुरुवात केली की भीतीचं नाव ही उरतं नाही.आरंभशूर असतात खुपजण!
बरेच जण परिक्षेच्या आधी आजारी पडतात आणि मग सगळा अभ्यास विसरतात.
पाल, झुरळं या नगण्य प्राण्यांची भीती आपल्या इथे बऱ्याच जणांना वाटते.

एखादी गोष्ट होईपर्यंत मनावर एकप्रकारचे दडपण असतं. ते काम पूर्ण झाले की माणूस रिलॅक्स होतो पण भीतीमुळे माणूस ते दडपण पेलू शकत नाही.

या भीतीवर मात करणं आवश्यक आहे. ती एकदा का मानगुटीवर बसली की संपल.
ही भीती आपलं लक्ष्य आणि आपणं यात अडथळ्यांचा एक मोठ्ठा डोंगर उभा करते. एकदा हा डोंगर सर केला की मिळणारा आत्मविश्वास भीतीला पळवून लावतो. भीती आसपास फिरकत देखील नाही. अर्थात हे प्रयत्नपूर्वक व्हायला हवे.

आजकाल मानसोपचारतज्ञ भीती घालवायला मदत करतात. बर्‍याच फ्लॉवर रेमेडीज पण आहेत. मुख्य इलाज म्हणजे मी सुरवातीला सांगितल्याप्रमाणे आपल्या आजुबाजूला चांगली माणसं गोळा करणं आणि त्यांना टिकवून ठेवणं.

साठी जवळ आली की बऱ्याच जणांना पैलतीर दिसायला लागतो आणि एकप्रकारची भीती वाटायला लागते. प्रत्येकाला वाटतं की मरण सहज यावं. कुठेतरी पडून - धडून, गादीवर पडून राहण्यापेक्षा एकदाच काय तो हार्ट अ‍ॅटॅक येऊन जावा , परावलंबी होऊन जगण्याची भीती प्रत्येकाला वाटतं असते.

खरतंर या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात मनुष्य कितीतरी सुख-दुःख भोगतो. मला काही झालं तर माझ्या मुलांच कसं होईल ही भीती पालकांच्या मनात असते पण जन्मलेल्या मुलाचे काही अडत नाही तर आपल्यावाचून कोणाचं काय अडणार आहे? ही भीती निरर्थक आहे. तुमच्या जवळची कितीतरी लोक तुम्हाला सोडून गेली,तुम्ही जगणं सोडलं का?

सध्या मृत्यूपेक्षाही एका नवीन प्रकारच्या भीतीचा प्रकार उदयास आला आहे : माझा डेटापॅक संपला तर?????

वर्षा हेमंत फाटक

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »