'बंद दरवाजा' पुस्तक परिचय


'बंद दरवाजा' हा लेख संग्रह साहित्य अकादमी पुरस्कार विजेते आणि पद्मश्री पुरस्कार प्राप्त श्री. लक्ष्मण माने यांनी भटक्या विमुक्त जमातीला केंद्र स्थानी ठेवून केलेल्या चळवळीचा लेखाजोखा आहे.खरतंर *उपरा* हे पुस्तक मी आधी वाचलं आणि सत्य, वास्तव लिहीणाऱ्या या लेखकाच्या लेखन शैलीसमोर नतमस्तक झाले.
या पुस्तकाला प्रसिद्ध लेखक श्री. अनिल अवचट यांची प्रस्तावना आहे, इथेच या पुस्तकाचे महत्व अधोरेखित होते आणि आपल्याला कल्पना येते की एक सुंदर, वेगळा बाज असलेली कलाकृति आपल्याला वाचायला मिळणार आहे.

पुस्तकाच्या सुरवातीला लेखकाने त्यांची भूमिका मांडली आहे. ती वाचतांनाच एक वेगळेपण जाणवायला लागतं आणि हे पुस्तक आपल्यावर गारुड करतं. तुम्ही निवांतक्षणी रिलॅक्स होऊन वाचण्यासाठी हे पुस्तक हातात घेतल असेल तर तुमचा भ्रमनिरास होईल कारण हे पुस्तक तुम्हांला विचार करायला भाग पाडतं. कारण या पुस्तकात जादूई दुनियेच वर्णन नाही आहे तर वास्तवातल्या, काळीज पिळवटून टाकणाऱ्या अनुभवांच आहे. ते अनुभव मनाला चटका लावून जाणारे आहेत. लेखकाने केलेल्या संघर्षांची कल्पना आपल्याला येत जाते आणि न पाहिलेल्या एका दुर्लक्षित जगाशी आपला परिचय होतं जातो.

लेखकाने भटक्या विमुक्त जमातींच्या जीवनशैलीवर अभ्यासपूर्ण संशोधन केले आहे. हा अभ्यास करण्यासाठी त्यांना 'फोर्ड फाउंडेशन' या अमेरिकन संस्थेची अभ्यास - शिष्यवृत्ती मिळाली होती.
लेखक स्वतः कैकाडी समाजाचे प्रतिनिधित्व करतात.अतिशय मेहनतीने, शिक्षणाची कास धरत त्यांनी समाजात स्वतःचे असे एक स्थान निर्माण केले आहे. आपल्या समाजाची प्रगती व्हावी, समाजाचा उत्कर्ष व्हावा या उद्देशाने त्यांना झपाटून टाकले आहे. मुख्य म्हणजे पालावर,वस्तीवर, तांड्यावर जाऊन त्यांच्याच बोलीभाषेत लेखकानी भटक्या विमुक्त जमातीतील लोकांशी संवाद साधला आहे. त्यांनी अकरा नवीन जमातींचा शोध लावला त्यासाठी
जवळपास 75 हजार किलोमीटरचा प्रवास केला. मनापासून तळमळ असल्याशिवाय ही भटकंती शक्यचं नव्हती. ही तळमळ, हा जिव्हाळा वरवरचा नाही तर मनापासून आलेला आहे. लेखकाच्या या भगिरथ प्रयत्नांना आपण मनोमन सलाम करतो. ही तळमळ वाचकांपर्यंत पोहचते आणि आपण ही विचार करायला लागतो की या भटक्या विमुक्त समाजासाठी मी काय करु शकतो? यातंच पुस्तकाचे यश सामावले आहे.

या जमातींच्या उत्कर्षासाठी, पुनर्वसनासाठी केलेल्या चळवळी,काढलेले मोर्चे, तेंव्हाची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती, आलेल्या अनेक अडचणी, त्यातून धैर्याने काढलेला मार्ग, अनेक दिग्गज लोकांची मिळालेली साथ, सरकारी यंत्रणेकडून मिळालेली तुटपुंजी मदत, भटक्या विमुक्त जमाती बद्दल असणारी इतर समाजाची उदासिनता आपल्याला अंतर्मुख करते.

खरंतर बंद दरवाजा हे एक प्रतिक आहे भटक्या विमुक्त जमातींच्या शोषणाचं, असहायतेचं, बकालपणाच, त्यांच्या प्रगतीत येणाऱ्या अडचणींच आणि मुख्य सामाजिक प्रवाहात यायला प्रतिबंध करणाऱ्या घटकांच!! यावरुन बंद दरवाजा हे किती योग्य शीर्षक आहे याची प्रचिती येते. संजय पवार यांनी साकारलेले मुखपृष्ठ अतिशय बोलके आहे.
या पुस्तकातून उलगडतं जातं ते बंद दरवाज्याच्या मागे असलेलं निशब्द जगणं, अलिप्तता, भयंकर दारिद्र्य, अंधश्रद्धा, त्यातील भीषणता आणि त्यामागे दडलेलं भयानक सत्य! काही प्रसंग वाचून आपण हेलावून जातो तर कधी कधी अंतर्मुख होतो.हा समाज मुख्य प्रवाहापासून इतका दूर का राहीला?हा प्रश्न पुस्तक वाचून झाल्यावरही मनात रेंगाळत राहतो. आपण अस्वस्थ होतं जातो. नकळतपणे डोळ्यांसमोर रस्त्याच्या कडेला खेळ करणारे डोंबारी, रामोशी, डोक्यावर मोठ्या टोपलीत भांडी घेऊन येणारी बोहारीण आठवते.
पण पुस्तक वाचले की लक्षात येतं की अशा कितीतरी भटक्या जमाती आहेत ज्या अजूनही मुख्य समाजापासून मैलोनमैल दूरच आहेत.

त्या लोकांची बोलीभाषा, म्हणी, त्यांचा पेहराव, त्यांच्या जमातींची नावे, अघोरी प्रथा, लग्नाच्या पद्धती, खास प्रसंगी गायली जाणारी गाणी या पुस्तकात आहे. लेखकाने काही शब्दांचे आणि गाण्यांचे अर्थ पण सांगितले आहेत. तेंव्हा मनातं विचार येतो की समाज कोणताही असो भाव-भावना, त्या व्यक्त होण्याचे मार्ग प्रत्येकाच्या ह्रदयातूनचं जातात. तिथे तुमचं आमचं सगळ्यांच सेम असतं. मग मुलीची पाठवणी असो की मयताचा प्रसंग असो. भावनेशिवाय कोणताही माणूस अपूर्णचं!

काही लेखांमध्ये लेखकाने त्या त्या व्यक्तींशी साधलेला संवाद इतका बोलका आहे की क्षणभर वाटतं की आपल्यासमोरचं तो प्रसंग घडतो आहे. प्रत्येक पात्राचे अतिशय सुंदर शब्दचित्र चितारले आहे. लेखकाची निरीक्षण शक्ती, अभ्यासू वृत्ती आणि मुख्य म्हणजे भटक्या विमुक्त जमातींना मुख्य प्रवाहात आणण्याची धडपड लक्षात येते. कधीतरी आलेलं त्यांच अपयश आपल्याही जिव्हारी लागतं. अंधश्रद्धा आणि अघोरी प्रथेपायी होणारी परवड आपल्याला विचारात पाडते. नकळतपणे मेंदू काही काही घटनांची नोंद घ्यायला लागतो.

भटक्या विमुक्त जमातींच्या सुखदुःखाची, वेदनेची जाणीव एकेका लेखातून समोर येऊन ठाकते.
'जनतेच्या कोर्टात' या लेखात बायकांची झालेली बेअब्रू पाहून चीड येते. असहाय्यतेचा फायदा कसा घेतला जातो हे प्रकर्षाने लक्षात येतं आणि कोर्टकचेरी, पोलीसखाक्या, स्वार्थीपणा, राजकारण हे शब्द फेर धरून नाचायला लागतात.
कऱ्हाडच्या बाबूराव चव्हाणचा अनुभव वाचून तर आपल्याही अंगावर सर्रकन काटा येतो.
' कंजारभाटांची सुहागरात' हा लेख वाचल्यावर एकप्रकारचा बधिरपणा मनात साचून राहतो. स्त्री कुठल्याही समाजातील असो ती पवित्रच असली पाहिजे नाहीतर तिच्या कपाळी शिक्षा ही आलीच!हे जाणवतं. पण अज्ञानातून शिक्षा होणार असेल तर न्याय कोणाकडे मागायचा?कारण न्याय करणारा पण अज्ञानीच असेल तर?डोक्याला मुंग्यां यायला लागतात. पाणी नसलं की आपल्याला घाण वाटते पण शौचाची जागा धुवायला सॉरी स्वच्छ करायला अजूनही छोट्या दगडांचा उपयोग होत असेल तर!! येतोय नं अंगावर काटा?

नोकरी आणि आरक्षण या गोष्टींचा लाभ खरोखरंच ज्यांच्यापर्यंत पोहचायला हवा त्याच्यापर्यंत पोहचतो आहे का? या विषयावर
कैकाडी आणि लमाण-बंजारा जमातींच
उदाहरण देतं लेखक आपलं अज्ञान दूर करतो आणि आपले डोळे उघडतात. स्वतःची पोळी भाजून घेणाऱ्यांची एक वेगळीच जात असते हे समजतं.
आपण स्वतःला एवढे प्रगतिशील म्हणवून घेतो पण कुठेतरी समांतर पद्धतीने जीवन जगणारा एक भटका विमुक्त समाज प्रमुख प्रवाहापासून दूरच आहे.

तंत्रज्ञानासमोर रुढी, परंपरा जिंकतात. शिक्षणाची वाहती गंगा कुठे आहे का खरोखरंच उलटी वाहते आहे हा विचार अस्वस्थ करतो.

हे सर्व लेख वाचले की वाटतं संपूर्ण भटक्या समाजाला खऱ्या अर्थाने न्याय मिळालाचं नाही आहे.
बंद दरवाजा अजून हवा तसा उघडला गेला नाही आहे.

दुर्लक्षित राहिलेल्या या भटक्या विमुक्त जमातींच्या प्रश्नांचा विचार अतिशय सुरक्षित आणि आलिशान जीवन जगण्याऱ्या शहरी फ्लॅटचा 'बंद दरवाजा' हे पुस्तक वाचल्यानंतर नक्कीच उघडेल याची खात्री वाटते.

( 'बंद दरवाजा' -लक्ष्मण माने
मेहता प्रकाशन,)

सौ. वर्षा हेमंत फाटक

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »