आज रामायण पहात होती आणि मंथराचा एपिसोड आला आणि लक्षात आलं की अशा मंथरा तर आपल्या आजूबाजूलाही आहे. ज्या आपलेही कान भरतात इतरांबद्दल आणि आपल्याबद्दल इतरांचे कान भरतात. भांडण लावून या मजा पहात स्वतःचे महत्व वाढवतात. आपण किती पटकन विश्वास टाकतो नं! पण होतं काय अर्लट नाही राहिलो तर या मंथरा आपल्याला कच्चा खाऊन टाकतील. आपली प्रतिमा सर्वासमोर मलिन करतील आणि परत या मंथरा सगळं करुन सवरुन मोकळ्या. लोकांनी चूक लक्षात आणून दिली तरी पद्धतशीरपणे मी नाही हो बाई त्या गावचीच हे बोलून मोकळय़ा! आहे की नाही गंमत! पण मंथरेच्या आगलावेपणामुळे श्रीरामांना वनवास भोगावा लागला होता, आपण सामान्य माणसं, वेदना, दुःख ही आपल्याला होतात. आपण देव नाही.का सहन करायचा अन्याय?
अशा या आधुनिक मंथरांना ओळखणही सोपे नसते. चांगुलपणाची शाल ओढून मस्त फिरतं असतात. पण अनुभवातून माणूस शिकतोच आणि या समाजाला ओळखायला लागतो. खरंतर अशा लोकांना समाजातून बहिष्कृत करायला हवे. कारण कोणाच चांगल होतांना दिसलं की या तडफडतात, त्यांना बेचैनी येते आणि मग त्या मंथरेच्या रुपाने गरळ ओकायला लागतात. जोपर्यंत त्यांचा उद्देश सफल होत नाही तोपर्यंत त्यांच विष कालवणं सुरुच असतं. एकदा का समोरच्या माणसाला मारलं की मग त्यांना असुरी आनंद होतो. त्यांच्यापुढे कोणीच गेलेले त्यांना अजिबातच चालत नाही.
पण जगात चांगले आणि विचारी लोकही असतात. जे वेळ आली की त्यांच पितळ उघडं पाडतात.
एकदा का त्यांचा खरा चेहरा समोर आला की मग मात्र त्यांची ततपप होते. तेव्हा यांचा घाबरटपणा /भित्रेपणा समोर येतो. कारण कारस्थानं मागून करता येतात पण उघडं पडलं की तोंड लपवायला या मंथरांना जागा नसते.कारण समोर येऊन लढाई कधी लढलीचं नसते. सदानकदा दुसर्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवायची सवय!! कधी कधी या लोकांची कीवही येते, असं वाटतं सोडून द्यावे पण त्यामुळे ह्या मंथरा अजूनच सोकावतात, त्यांचा आत्मविश्वास आणि परीघ वाढवतात.
कधीतरी वाटतं श्रीरामांनी सीतामातेच्या ऐवजी या मंथरेचीच अग्निपरीक्षा घ्यायला हवी होती, खरंच सुधारली की नाही हे पहायला. कपट असेल मनात तर जळून खाक!!
जो खरा आणि शांत असतो, कोणाच्या अध्यातमध्यात नसतो तो मात्र तावूनसुलाखून बाहेर पडतोच, ह्या आधुनिक मंथरांना धडा शिकवून. चांगले मित्र, देवावरची श्रद्धा आणि सहनशक्ती माणसांच्या मदतीला येते यांच्याविरुद्ध लढायला!