शब्दवर्षा :पाक्षिक सदर विषय : मै तुलसी तेरे आंगन की.....


मध्यंतरी आमच्या ग्रुपमध्ये अशीच चर्चा सुरू होती की कोणाला कोणती हिरोईन आवडते? तर
मी लगेच उत्तरले मला माधुरी आवडते कारण तिने कोणाचाही संसार नाही मोडला आणि दुसरी बायको बनण्याच्या फंदात नाही पडली.
माझी मैत्रिण म्हणाली की तू हे काय भलतेच कारण सांगते माधुरी आवडायचं.
मी म्हणाले जे आहे ते आहे. कलाकार जर चांगली व्यक्ती असेल तर काय हरकत आहे. समाजासमोर ते काहीतरी आदर्श ठेवत असतातच नं! मग चांगला आदर्श ठेवायला हवा.
हेमामालिनी आणि श्रीदेवी या दोघी या एकाच कारणासाठी मला आवडतं नाही. अर्थात हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण अर्जुन कपूरने एका मुलाखतीत सांगितले की बोनीकपूरने श्रीदेवी शी लग्न केल्यावर त्याला स्वतःला आणि त्याच्या बहिणीला आणि आईला किती मानसिक त्रास झाला ते. हे एक उदाहरण झाले. पण असं बरेचदा घडतं आणि दोन्ही बाजूने. कधी नवऱ्याचे अफेअर असते तर कधी बायकोचे, ज्याचे नसते तो संकटात सापडतो.
मग घटस्फोट, पोटगी, कस्टडी यात वेळ आणि पैसा वाया जातो. मनावर ओरखाडे पडतात ते वेगळंच! मुलं भरडल्या जातात.

पण लग्न झालं असतांना दुसर्‍या व्यक्तीचा विचार मनात येतोच कसा? एक बांधिलकी असते. मी पाश नाही म्हणतं आहे.

मध्यंतरी जांभूळ आख्यानावर वाचण्यात आलं आणि विशाद वाटला. द्रौपदीच्या मनात फक्त कर्णाचा विचार आला तर ते पाप ठरवण्यात आले आणि धर्म सोडून प्रत्येक पांडवाने दोन /तीन लग्न केली तर ते पाप नव्हते. म्हणजे परत महाभारत लिहिणारा कोण तर पूरुषच!
जाऊद्या! बरीच कारणं तयार आहेत या मागची!राज्यविस्तार वगैरे वगैरे. धमक असेल तर राज्यविस्तार स्वतः करावा.दुसरे तिसरे लग्न करुनच राज्यविस्तार होतो का? युद्ध नावाचाही एक प्रकार असतो. पण पुरुषांनी बनवलेले नियम पुरुषांना धार्जिणे असणारच.

तर मुद्दा हा आहे की.
एखादी स्त्री गरीब असेल स्वभावाने नाही तर परिस्थितीने तर ती नवऱ्याला घटस्फोट देईल का?माहेरी जाण्याची सोय नसेल तर काय करावं त्या बाईने?
पोटाचा प्रश्न महत्त्वाचा की अस्मितेचा?
माझी मैत्रिण चिडून एकदा तिच्या नवर्‍याला म्हणाली की तिला घरी खायला प्यायला नव्हते मिळतं म्हणून तिने लग्न नाही केले.
तिचा मान त्याने ठेवायलाच हवा.

आमच्या ओळखीच्या एका आजोबांनी द्विभार्या कायदा होण्याच्या बरोबर एक महिना पहिले दुसरे लग्न केले आणि तेही कोणाशी तर सख्ख्या मेहुणीशी. तिघेही आनंदात होते. तरीपण कधीतरी पहिल्या बायकोचा विचार मनात आल्यावाचून राहात नाही सख्ख्या बहीणीचा सवत म्हणून मनापासून स्वीकार केला असेल?
कुठेतरी मनात कळ उठत असेलच.

हिचा नवरा बाहेर शेण खातो म्हणजे हिच्यातच काहीतरी खोटं असणार हे ओघाओघाने आलेचं. इथे पण मुस्कटदाबी!!

तर एक दुसरा किस्सा म्हणजे एका माणसाने पहिल्या बायकोला घटस्फोट देऊन दुसर्‍या बाईशी लग्न केले आणि पुढील चार वर्षांत तिच्याच मुलीशी म्हणजे सावत्र मुलीशी प्रेमप्रकरण सुरू केले. काय बोलायचं? ही गोष्ट आत्ताची नाही आहे पण खरी आहे.

ही बाजू झाली कायदेशीर बायकोची पण दुसर्‍या बाईच काय? जिला खरंतर नेहमीच एक अपराधी म्हणूनच बघितले जाते. विवाहीत माणसाच्या प्रेमात पडतांना ती काय विचार करतं असेल नक्की? एका स्त्रिचा संसार मोडतो आहे हे लक्षात नसेल का येत? का तिचीही काही मजबुरी असेल? की प्रेमात सर्व क्षम्य असतं? समाजाने घालून दिलेले नियम समाजातील लोकांनीच पाळले नाहीत तर मग समाज मोडकळीस येणारच!! प्रेम असो की मजबुरी असो! अपराध तो अपराधचं!!

मै तुलसी तेरे आंगन की, कोई नहीं मै तेरे साजनकी।
हे कितपत खरं मानायचं?

वर्षा हेमंत फाटक

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »