शब्दवर्षा :पाक्षिक सदर ३० जानेवारी २०२३ विषय : इच्छामरण

शब्दवर्षा :पाक्षिक सदर  ३० जानेवारी २०२३ विषय : इच्छामरण

प्रत्येकालाच जगण्याची ओढ असते. स्वतःचा जीव प्रिय असतो आणि मृत्यूला दूर ठेवणे हे जगणाऱ्या प्रत्येकच माणसाचे ध्येय असते.
एक भारतीय जोडपं मात्र या नियमाला अपवाद ठरले आहे. गेली बरीच वर्षे ते दोघेजण इच्छामरणाच्या अधिकाराची मागणी करतात आहे आणि यासाठी त्यांचा पाठपुरावा चालला आहे. त्यांना कायदेशीरपणे त्यांचे जीवन संपवायचे आहे.

खरतंर जीवनेच्छा ही खूप प्रबळ असते पण हे जगणं जेव्हा ओझं वाटायला लागतं तेव्हा कायदेशीररीत्या आयुष्य संपवण्याचा मार्ग आणि हक्क प्रत्येकालाच हवा ह्या बाबतीत खूप लोकांचे मतैक्य आहे.

इथे कायदेशीररीत्या हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे कारण आत्महत्या करुन जीवन संपवणारे खूप जण असतात पण तो पळपुटेपणा झाला आणि कायद्याने तो गुन्हा आहे. इथे मरण हवं आहे पण स्वतःच्या इच्छेने! ठामेठोकपणे! कारणं सांगून! आणि कायद्याच्या चौकटीत राहून! सन्मानपूर्वक!

असह्य होणाऱ्या शारीरिक व्याधीतून मुक्ती मिळवण्यासाठी इच्छा मरण हवे असते. वेदनामय जीवन जगत असतांना कोणी जर याचिक दाखल केली तर ते योग्य आहे का? त्या व्यक्तीच्या संमतीनेच त्याला इच्छामरण यायला हवे का?
अशी कोणती विशिष्ट परिस्थिती असते की माणूस इच्छामरणाची इच्छा व्यक्त करतो? मानसिक, शारीरिक की आर्थिक परिस्थिती ? ही इच्छा का होते? काही दिवसांनी एखादा तरुण पण ही इच्छा प्रगट करेल! हा अधिकार /हक्क खरंच एवढा सहजपणे उपलब्ध असेल?असायला हवा का? इच्छा मरणाची परिस्थिती /इच्छा योग्य आहे हे कोण ठरवणार? लोकशाही, हुकुमशाही, वकील, डॉक्टर, नातेवाईक की स्वत: ती व्यक्ती ? इच्छा मरण व्यक्त करणाऱ्याने आधी अर्ज दाखल केला आणि नंतर समजा तो कोमात गेला तर निर्णय कोण घेणार? आधीचा अर्ज ग्राह्य धरणार की नाही? आणि त्या व्यक्तीच्या अधिकाराचं काय? कोणता अधिकार ग्राह्य धरायचा? निर्णय कोण घेणार?
एखाद्या अपंग व्यक्तीला हा अधिकार सहजपणे मिळेल का?

खुपच गुंतागुंतीचा विषय आहे, अनेक बाजू आहेत. कायदा लागू करणे खूपच जिकिरीचे काम आहे.
न्यूझीलंड, कोलंबिया, कॅनडा, स्पेन या बऱ्याच देशांमध्ये हा कायदा लागू करण्यात आला आहे. पण खूप विचारपूर्वक, तज्ञांच्या संमतीने आणि अनेक अटींची पूर्तता करूनच.

बरेच वेळा एखाद्या व्यक्तीचे फक्त ह्रदय काम करत असते पण बाकीचे अवयव काम करणे बंद करतात तेव्हा जीवन संरक्षण प्रणाली काढायचा निर्णय अगदी जवळचे लोक अर्थातच नाईलाजाने घेतात, आणि डाॅक्टरांच्या सल्ल्यानेच! पण मग हे काय आहे? शेवटी तुम्ही लाईफ सपोर्ट काढताच नं? आपण हा अपराध ठरवू शकतो का? कारण हे नैसर्गिक मरण तर नक्कीच नाही! दुसरी व्यक्ती ठरवते आहे आपण जगायचं की नाही ते? हा हक्क त्या दुसर्‍या व्यक्तीला कोणी दिला?

मग यापेक्षा इच्छामरणाचा कायदा बरा! सारासार विचार करून माणूस हा निर्णय घेतो आणि कदाचित तेंव्हाच अवयव दानाचा निर्णय पण घेऊ शकतो आणि एखाद्या व्यक्तीला जीवनदान देऊ शकतो. पण मग स्मृतीभंश झालेल्या रुग्णाच्या बाबतीत हा निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला आहे?

दुर्दैवाने हा विचार करायची आज वेळ आली आहे. रोगट समाजाची एक झलक अशी ही!
एक विशिष्ट वयोमर्यादा, रोग्याची अवस्था, टर्मिनल इलेनस, असह्य, जर्जर अवस्था! या सर्व गोष्टींचा विचार आवश्यक आहे.
या ठिकाणी मला अरुणा शानबाग या दुर्दैवी जीवाचा उल्लेख केल्यावाचून राहवत नाही.

इच्छामरण आणि दयामरण यातील फरक लक्षात घेणे आवश्यक आहे. नाहीतर आजूबाजूला असलेले स्वार्थी लोक या गोष्टीचा गैरफायदा घेतल्यावाचून राहाणार नाही.कायदा आला की पहिले पळवाटा निघतात.

पण हा विचार मनात आल्यावाचून राहात नाही की माणसाला अधिकाराची आणि हक्काची तीव्र जाणीव मरणाच्या बाबतीतही आहे?मग जगण्याचा हक्क पण तेवढाच आहे हे का विसरल्या जातं?

मला *प्रायोपवेशन* या शब्दाची आत्ता आठवण झाली. मृत्यू जवळ आल्यानंतर जाणीवपूर्वक अन्नपाण्याचा त्याग करण्याची क्रिया पण त्यासाठी लागणारे आत्मिक बळ, निश्चय हे प्रत्येकाजवळ नसते. मृत्यूला कवटाळणे, त्याचे स्वागत करणे याला खुप धैर्य लागतं. आदरणीय स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ठायी ते होतं.

इच्छामरणाचा वर प्राप्त झालेल्या पितामह भीष्मांना कोण विसरणार? कधी कधी पुराणातील दाखले असे आवासून उभे राहातात.

जन्माला येणे जर आपल्या हातात नाही तर मरणे आपल्या हातात असावे हा अट्टाहास का आणि कशासाठी?

वर्षा हेमंत फाटक

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »