अॅडव्हेंचर हा शब्द खूपच व्यापक आहे. माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीची अॅडव्हेंचर्स खूप छोटी छोटी आहेत. त्याला अॅडव्हेंचर म्हणायचे की नाही हे तुम्ही ठरवा.
पहिले अॅडव्हेंचर म्हणजे मला एखाद्या व्यक्तीचा राग आला की त्या व्यक्तीशी खूप तावातावाने बोलायंच आहे. समोरचा माणूस आपल्याला मुर्ख समजून वाट्टेल ते बोलतो आहे आणि आपण तिकडे दुर्लक्ष करतो. का तर मुर्खाच्या नादी लागू नये म्हणून! पण अॅटलिस्ट तो मुर्ख आहे हे तरी मला त्याला एकदा जोरात ओरडून सांगायचे आहे. त्यातले थ्रील अनुभवायचे आहे.
शांतपणाचा, सहनशीलतेचा मुखवटा फेकायचं अॅडव्हेंचर मला करायचे आहे.
दुसरे अॅडव्हेंचर म्हणजे मला गाडी काढून रस्ता दिसेल त्या दिशेने फिरायला जायचे आहे.काहीच न ठरवता. दिशाहीन होऊन.प्लॅनिंग न करता. एका दिवसासाठी जरी बाहेर जायचे असले तरी मी 3/4 दिवसांचे सामान सोबत नेते. औषधं सोबत ठेवते.५/६ पाण्याच्या बाटल्या ठेवते. एकवेळचा नाश्ता बरोबर ठेवतेच ठेवते. थोडक्यात काय तर घरच्यांच्या मते मी पावकिलो घर प्रवासाला जातांना सोबत नेते.
एकदा तरी मला प्रवासाला काहीही सोबत न घेता जायचं आहे. वाट फुटेल तिकडे!! सामान आणि माणसं कोणाचीच सोबत न घेता! एकटीने!
तिसरे अॅडव्हेंचर हे प्रत्येक स्त्रीसाठीच असेल ते म्हणजे नवरा आणि मुलांची अजिबातच काळजी न करता एक दिवस तरी जगणे.
हे खरोखरच अॅडव्हेंचर आहे. कारण काळजी करत जगणे सोपे आहे पण काहीच काळजी न करता जगणे हे अॅडव्हेंचरच आहे.शेवटी साहस म्हणजे काय रोजच्या आयुष्यात नेहमी नेहमी न करता येणाऱ्या /आवाक्याबाहेर असणाऱ्या गोष्टींचा अनुभव घेणे.