परवा मावळ भागात फिरायला गेलो होतो. निसर्गसौंदर्याची मुक्तपणे उधळण असलेला नयनरम्य प्रदेश आणि पुण्यापासून अगदी जवळ!
हिरवेगार डोंगर, छोटे छोटे धबधबे आणि बाजूला तुडुंब भरलेला तलाव! वातावरण प्रसन्न झाले होते. हिरव्या रंगाच्या विविध छटा मन मोहून घेत होत्या.
तेवढ्यात कोणीतरी सांगितले की बाजूलाच गुलाबाची शेतीपण आहे. मी लगेच उठले. गुलाब हा जिव्हाळ्याचा विषय.
पुर्णपणे पांढऱ्या कापडाने आच्छादित अशी ती जागा होती. पहिल्यांदा आम्ही लाल गुलाब होते तिथे गेलो. ते टप्पोरे गुलाब पाहून खूप आनंदून गेलो. पण बरेच गुलाब अर्धवट दांडीसकट खाली पडले होते. तो माणूस म्हणाला की खाली पडलेले गुलाब घ्या ते काही आमच्या कामाचे नाहीत. आम्ही आधाशासारखे गुलाब घेतले. मग पिवळा, मग पांढरा असे विभाग होते.
सगळ्याच ठिकाणी प्रत्येक दांडीला एकच मोठ्ठी कळी होती.अगदी टवटवीत!
मी पांढऱ्या कळीचा फोटो काढायला गेली कारण छान चार-पाच कळ्या एकाच ठिकाणी आल्या होत्या, एकमेकींना बिलगून बसलेल्या मैत्रिणींसारख्या!! तितक्यात एक माणूस आला आणि त्याने झटकन आजूबाजूला आलेल्या त्या छोट्या कळ्या हाताने तोडून टाकल्या. मी जोरात ओरडले, "अहो दादा त्या मुक्या कळ्या कशाला तोडल्या?"
तो म्हणाला "अहो ताई, त्या कळ्यांचा काहीच उपयोग नसतो. मोठ्या कळीची वाढ खुंटते नं आणि मग आम्हाला कमी रेट मिळतो".मोठ्या कळीला डिमांड असते.
आता मला समजलं की एका दांडीला एकच फूल का दिसत होतं ते! आणि बरीच फुले खाली का पडली होती ते! म्हणजे एकच दांडी आणि एकच फुलं! आम्ही घेतलेली फुले बिनकामाची होती म्हणून त्यांनी फुकटात दिली.
मला बाबांची आठवण झाली. परडीत एक जरी मुकी कळी दिसली तरी रागवायचे मला आणि इथे या माणसाने अक्षरशः हाताने बारीक कळ्या तोडून टाकल्या. अगदी सहजपणे! म्हणजे हे त्याच रोजचेच काम होते.
मला कसंतरीच झाले.
मी त्याला विचारले की अशा कळ्या तोडण्यापेक्षा एका फांदीला एकच कळी येईल अस कोणतं वाण नाही का?
तो नाही म्हणाला.
कळ्या तीन-चार येतातच. आम्ही कट करतो आणि जी हेल्दी असते तिलाच वाढू देतो. कारण प्रॉफिट तेव्हाच होतो.
मी ती घेतलेली फुले बाजूला असलेल्या मंदिरात वाहिली. एकही फुलं घरी न्यावस वाटले नाही. डोळ्यासमोर त्या मुक्या कळ्याच येत होत्या.
आम्ही तिथून निघालो आणि बाहेर पडत नाही तर रस्त्याच्या दुतर्फा त्या लोकांनी गुलाबी कण्हेर लावलेली. कण्हेरीचे गुच्छ, एका गुच्छात दाटीवाटीने असलेली ८/१० फुले माझ्या मनावरच सावट थोडफार दूर करून गेली आणि विचार आला बरं झालं कण्हेरीला गुलाबासारखी *डिमांड* नाही आहे ते!!