शब्दवर्षा : पाक्षिक सदर: २जानेवारी २०२३ :तुरुंग

शब्दवर्षा : पाक्षिक सदर:  २जानेवारी २०२३ :तुरुंग

तुरुंग, कारागृह, जेल हे शब्दच धडकी भरवणारे आहेत.सामान्य माणूस या गोष्टींपासून चार हात लांबच असतो.पोलीस,कायदा, वकील, खटला आणि शेवटी सुनावली जाणारी शिक्षा आणि मग तुरुंग! मला वाटतं गुन्हा ते तुरुंग असा हा काटेरी प्रवास असतो.

जेलमध्ये असलेला कैदी म्हणजे खतरनाकच! ही आपली काहीशी धारणा असते.पण काही कैद्यांची शिक्षा त्यांच्या चांगल्या वागणुकीमुळे कमी होते, हे पण सत्य आहे. अर्थात त्यामुळे कैद्याने केलेल्या गुन्ह्याची दाहकता कमी होते असे नक्कीच नाही.

लहानपणी शाळेच्या वाटेवरच पोलीस स्टेशन होतं. आम्ही सकाळी शाळेत जायचो तेव्हा पांढरा डगला आणि डोक्यावर टोपी असलेले 10/12 कैदी त्या शेतात काम करत असायचे आणि 3/4 पोलीस तिथेच बाजूला उभे असायचे. अगदी लागूनच महादेवाचं मंदीर पण होत. आम्ही त्याला जेलचे मंदीरच म्हणायचो. कधीकधी हे कैदी मंदिराचे आवार झाडत असायचे. झाडांना पाणी घालत असायचे. तारेच मोठ्ठ कुंपण होत. उंच भिंत नव्हती. त्यामुळे ते कैदी काम करतांना दिसायचे. कधीकधी बसमधून येतांना पोलीसांसोबत कैदी ही असायचा.बेड्या असायच्या चोराच्या हातात. मग सगळेजण चोरट्या नजरेने त्या चोराकडे पहायचे.

जसजसे वाचन वाढत गेले, वय वाढत गेले तसतशा तुरुंगाशी संबंधित इतर गोष्टी पण कळायला लागल्या. हिंदी सिनेमाने तुरुंग आणि कायदा - कानून म्हणजे काय या ज्ञानात बरीच भर घातली. कधीतरी वाटायचं की फक्त चांगल्या लोकांवरच अन्याय होतो आणि फसवून त्यांनाच तुरुंगात टाकतात.
अंधाकानून, अर्धसत्य, अर्जुन, आज की आवाज या काही सिनेमांनी मात्र वास्तव समोर आणलं.

मला एक प्रसंग आठवतो. आमच्या कॉलनीत एका चोराला लोकांनी चोरी करतांना पकडलं आणि खुप मारलं. पोलीस आले आणि त्या चोराला पकडून घेऊन गेले. पण त्या चोराची आई आणि बायको मात्र गयावया करत पोलिसांच्या मागे येत होत्या . "साहेब तुरुंगात नका टाकू माझ्या पोराला" अशी विनवणी त्या चोराची आई करत होती. सगळे म्हणत होते की तुरुंगाची हवा खाल्ली की होईल सरळ!
पण खरचं तुरुंगातून बाहेर पडल्यावर समाज त्या व्यक्तीला परत त्यांच्यात सामावून घेईल? एक लेबल चिकटल असतं, कैद्याच! तुरुंगाची हवा खाऊन आलेला!
सुधारण्याची आशा मनात बाळगून बाहेर आलेल्या कैद्याला वेगळाच अनुभव येतो. लोकांच्या नजरेतला संशय त्याला विद्ध करतो, तो परत पेटून उठतो, गुन्हे करत सुटतो आणि परत तुरुंगात जातो. हे चक्र सुरुच राहते. एखाद्याला फाशी पण होते.
*थोडक्यात काय तर गुन्हा केला की शिक्षा होणारच! गुन्हा करायच्या आधी दहावेळा विचार करा* हाच तर संदेश तुरुंग देत नसेल?

पण मला वाटत तुरुंगातून भोगून आलेल्या शिक्षेपेक्षा समाज देतो ती शिक्षा जास्त कडवी असते आणि ती असायलाच हवी!

तुरुंग आला की कायदे आलेत, नियम आलेत पण कितीतरी जण ते नियम धाब्यावर बसवतात. मोठ मोठ्या गुंडांना तुरुंगात स्पेशल ट्रीटमेंट मिळते. काही गुंड तर तुरुंगातूनच त्यांचे काळे धंदे चालवतात.
आजकाल तुरुंगातून जामिनावर बाहेर आलेल्या लोकांचे जंगी स्वागत होते.
इडी, सीबीआय, फाॅरेन्सिक रिपोर्ट, जामीन हे शब्द काॅमन झाले आहेत.तिहार,अर्थर रोड, येरवडा जेल ही नाव सहज उच्चारली जातात.

आजकाल गुन्हेगारांची मानसिकता काय असते, कशी असते यावर बरीच चर्चा होते. बाल गुन्हेगारीकडे एका वेगळ्या दृष्टीने बघितले जाते. पण एखाद्या गुन्ह्यात बाल गुन्हेगार हाच क्रूरकर्मा असतो पण फक्त वय कमी असल्याने तो तुरुंगात जाण्यापासून वाचतो, तेव्हा संताप येतो. पण मला वाटत जी व्यक्ती समाजात राहून समाजविघातक काम करते त्या व्यक्तीसाठी तुरुंग हीच एकमेव योग्य जागा आहे.

पण एखाद्याला त्याचे घर म्हणजेच तुरुंग वाटतं असेल तर! माझा एक मित्र त्याच्या पिताश्रींना जेलर म्हणायचा. कडक शिस्त! जमदग्नि चा अवतार! त्यांची बायको पण सतत घाबरूनच असायची त्यांना.
सतत घरात आरडाओरडा! हे हुकुमशाहा! ते वारल्यावरच काकू सुटल्या. मित्र कधी कधी म्हणतो की आमच्या बापाने आमच बालपण खराब केल! एवढा राग! नवलं वाटतं. एखाद्याच्या मनात शाळा ही तुरुंग असते तर एखाद्या स्त्रीसाठी सासर म्हणजे तुरुंग असतो. मनासारखे काहीच करता येत नसेल तर अजून काय वाटणार? माझ्या सारख्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये राहणे म्हणजे तुरुंगात राहाण्यासारखे वाटते.
थोडक्यात काय मना विरुद्ध ज्या ठिकाणी राहावं लागतं ती जागा म्हणजे तुरुंग ही तुरुंगाची साधी सोपी व्याख्या आहे. एखाद्या द्वाड मुलाला आईने खोलीत कोंडले तर थोड्यावेळासाठी ती खोली म्हणजे तुरुंगच असतो त्या लहान जीवासाठी!

तुरुंग आणि स्वातंत्र्याचा इतिहास यांचा खूप जवळचा संबंध आहे. लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात गीतारहस्य हा महान ग्रंथ लिहीला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी
जेलच्या चार भिंतीतल्या अत्यंत प्रतिकूल वातावरणात, हाल अपेष्टा झेलत आणि अतिशय नाजूक तब्येत असतानाही याच काळकोठडीत 'कमला' सारखं अतिसुंदर महाकाव्य लिहिलं.
भगतसिंग, आझाद, मंगल पांडे आणि कितीतरी अनामवीरांनी तुरुंगात जाऊन इंग्रजांकडून अतोनात छळ सहन केला आहे.पण देशभक्तीचा वसा सोडला नाही. अर्थात स्वातंत्र्यवीरांनी हा तुरुंग आनंदाने स्वीकारला होता.

हिटलरच्या छळछावणीला इतिहास कसा बरं विसरेल?

नाॅट विदाऊट माय डॉटर हे पुस्तक वाचतांना तुरुंग म्हणजे काय याची स्पष्ट कल्पना येते. चार बंदिस्त भिंती म्हणजेच तुरुंग नाही तर एखाद्याची जरब, दहशत हे पण तुरुंगच आहे. जिथे जीव घुसमटतो, तडफडतो तो तुरुंगच!
फक्त इथे अपराध्याला शिक्षा न मिळता भलत्याच कोणाला तरी मिळते. चोर सोडून संन्याशाला सूळी असला प्रकार!

पण काही अभागी जीवांना मात्र जग हेच तुरुंगासारखे वाटायला लागते तेव्हा ते आत्महत्या करुन या जग नामक तुरुंगातून त्यांची सुटका करतात तेव्हा मात्र हळहळ होते.

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »