झोपाळा

झोपाळा

माझी घरातील आवडती जागा!
अर्थात झोपाळा म्हणजे एक सुंदर अंगाई,आईच्या स्पर्शाची उबदार जाणीव!
आईच्या मांडीवर डोके ठेवून हळूहळू झोका घेण्यात काय सुख असत ते ज्याने अनुभवले तोच जाणे.
झोपाळा, बंगळी,पाळणा,झूला आणि लहान असतांना झोळी!अशी कितीतरी नावे आहेत या झोपाळ्याची.
प्रत्येकाचे नामकरण हे पाळण्यातच होत.अर्थात आईने केलेल्या दोन हातांच्या पाळण्यात बाळ किती निश्चितपणे झोपत नं!

पण घरातल्या झोपाळ्यापेक्षा मावशीच्या शेतात गांगजीने लावुन दिलेल्या दोन झाडांमधल्या झोपाळ्याची मजा काही औरच,कारण कितीही जोरात झोका घ्या,पूर्ण मोकळे आकाश! मागे पुढे भिंतींचा अडथळा नाही. मुक्त श्वास घ्या! कदाचित म्हणून च श्रावणात झूले बांधत असतील. माहेरवाशिणी घरी आल्यावर त्यांना मुक्त आणि बंधनरहीत आयुष्याचा आनंद देण्यासाठी.
तसेच मावशीकडे अकोल्याला गेले की काका झोपाळ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस आणून द्यायचे आणि आम्ही राणीसारख आरामात बसून प्यायचो.थोड्यावेळाकरता तो झोपाळा म्हणजे राजसिंहासनच वाटायच.कारण झोपाळा लहान असल्याने मी आणि मावशीच बसायचो.दोघेही भाऊ आजूबाजूला उभे असायचे.भालदार-चोपदार!

झोपाळा जसा पुढेमागे जात असतो तसं आयुष्यात ही कधी आपण मागे जातो, हरतो पण जस रेटा देऊन झोपाळा पुढे नेतो तसच आयुष्य ही पुढे नेता आल पाहिजे.मग उंचावर यश दिसून येत.

पण आत्ताचे मोठमोठाले रोलरकोस्टर पाहिले की जीव दडपतो.हा पण झोपाळ्याचाच एक प्रकार पण भयावह! कधी उलटातिलटा फिरवणारा,कधी अधांतरी थांबवणारा,तेव्हा आपल्या घरचाच झोपाळा बरा वाटतो.

राधाकृष्णाचे झोपाळ्यावरचे फोटो पाहीले कि मन प्रसन्न होते.न ऐकलेल्या मुरलीचे स्वर कानी पडायला लागतात आणि त्या स्वरांच्या झोक्यावर आपण अलगदपणे स्वार होतो.

आईकडे असलेला चैत्रगौरीचा चांदीचा छोटासा पाळणा मला खूप आवडतो.

थोडक्यात काय तर झोपाळ्यावर बसून घेतलेला उंच झोका जसा मनाला आनंद देऊन जातो,आकाशाला गवसणी घालायची स्वप्ने दाखवतो. ही उभारी,उंच झोका घ्यायची, प्रत्येकीच्या मनात असूदे एवढीच इच्छा!

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »