तू

तू

खरच काय गरज होतीन आपल्यासारख्या सामान्यांना बनवायची?बर नुसत तयार करुन शांत बसला का तर नाही! डोक पण दिले आणि मन नावाची अतिशय तकलादू,बिनकामाची गोष्ट ही दिली. नुसत मन देऊन शांत बसायच तर नाही, भावभावना दिल्या आणि दुसऱ्याच दुःख पाहून होणारी वेदना पण दिली. ताटातूट आणि शेवटी प्रियजनांचा अवेळी होणारा म्रुत्यु पण दिला. एवढस ह्रदय कसे सोसणार या मोठ्या यातना? ते तरी थोड मोठ्ठ द्यायचं तर ते मुठीएवढ दिलस! थोडातरी विचार करायचा न!आल मनात बनवली माणसं!
बर त्या दुःखावर उपाय काहीच नाही. एखादा कोसळतो आहे तर कोसळू दे, तूला त्याच काहीच सोयरसुतक नसत.तू मस्त मजा घेत असतो. नवस वगैरे नी काही होत नाही आणि प्रार्थनेनी पण. आमचा जिवलग सोडून जातो तो जातोच!
तेव्हा खूप राग येतो रे तूझा! अस वाटत फाडफाड बोलाव तूला, बोलते पण, तू ऐकतो का ते माहीत नाही. पण अश्रूंच्या वाटे मन हलके होते पण आठवणी मात्र पापणीतच साठून राहातात. कारण काय मी कितीही आकांडतांडव केला,विनवण्या केल्या तरी तू थोडीच ऐकणार आहेस?
तू असामान्य, सर्वश्रेष्ठ आहे. प्रत्येकाच नशीब लिहीण्याचा हक्क आहेन तूला आणि तू लिहीलेल म्हणजे काळ्या दगडावरची रेघ,कोण बदलणार?
सगळे म्हणतात नशिबात असत तेच होत.मग मी ठरवते तूझी नाही नशिबाची पूजा करायची,त्यालाच नवस बोलायचे पण मला ठाऊक आहे ते नशीबसुद्धा तूझ्याच आधीन आहे.तूझ्या हाताच्या बोटावर तू त्याला आणि इनडायरेक्टली आम्हाला हवं तस नाचवतो.
कधीतरी मनापासून वाटत की तूझ्यापासून पण कोणीतरी अगदी जवळच दूर जाव,त्याच्या विरहात तू पण तडफडाव आणि दोन अश्रू तूझ्या ही डोळ्यातून यावे.
विरहाचे दुःख तू ही अनुभवावे किंवा मग ही धरती,ही मानवजात निर्माण करण्याचा जो प्रपंच केला आहेस न तो सोडून तू शांत बसाव.
म्रुत्युची भीती नाही वाटत रे पण तो येण्याआधी एखाद्याला केमोथेरपी, रेडिएशन,आँपरेशन, किडनी फेलिवर या भयंकर गोष्टी भोगायला लावतोस न त्याचा जाम राग येतो मला आणि त्या नातलगांचा विचार कर न जे आपल्या प्रियला कणाकणाने मरतांना बघतात.
एकदाचा काय तो सोक्षमोक्ष फटकन लावत जा नं.गंमत बघत बसतोस रे तू!
म्हणून म्हणते कि विश्वनिर्मितीचे खेळ सोडून दे किंवा खेळायचाच असेल तर आमच्यासोबत येऊन,आमच्यातला एक होऊन खेळ.
तू पण सुटशील आणि आम्ही पण!

हिसाब बराबर!

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »