योग दिवस हा माझ्या आयुष्यात योगायोगानेच येतो. एखादा चांगला मित्र WA वर आठवण करून देतो कि आज योग दिवस आहे.पण त्याचा मेसेज येईपर्यंत आमचा पोटोबा झालेला असतो आणि योगासन अनशापोटी करायची असतात नं. निदान दोन तास तरी पोट रिकामे हवे. पण आम्हाला आमच्या पोटाची खूप काळजी,त्यामुळे आम्ही ते कधीच रिकामे ठेवत त्यामुळे योगा करण्याचा योग जुळतच नाही. मग ही म्हणते,”अहो खाली जाऊन फिरून तरी या”. पण तोपर्यंत आमचं स्नान आटोपलेले असत. त्यामुळे कशाला ती घामाची चिकचिक म्हणून अस्मादिकांच परत राहूनच जातं. पण याचा अर्थ असा नाही कि योगा आमच्या विरोधी पक्षात आहे. आम्ही पण लोकांना योगा करण्यास प्रोत्साहन देतो, योगा न केल्याचे परिणाम काय होतात हे आमच्या तुंदिलतनूकडे पाहून सोदाहरण स्पष्ट करतो. योगातच जग आहे हे तरुण पिढीला समजावून सांगतो. आमच्यासारखे लेटमार्क मिळू नये म्हणून कळकळीने लोकांना सकाळी लवकर उठण्याचे फायदे सांगतो. वडापाव खात खात का होईना लोकांना तेलकट/तूपकट खाऊ नये याचे धडे देतो. समाजकार्यात आम्ही कुठेच मागे नाही.
शरीरापेक्षा मनाची ताकद मोठी असते. हे आमचे ब्रीदवाक्य. पण शेवटी त्या मनाने दगा दिलाच आणि शरीराची साथ सोडलीच.
आम्ही स्वर्गात वगैरे गेलो पण लक्ष मात्र खालीच होतं.
After 13 days(माझा तेरावा /चौदावा)
एक मित्र : किती वेळा सांगितल होत वडापाव खाऊ नको म्हणून!पण ऐकेल तर शप्पथ!एकवेळ त्या वाळुच्या कणातून तेल निघेल पण याच्या अंगातून घामाचा एक थेंब निघेल तर खरं!
दुसरा मित्र: फेविकाँलच्या अॅड सारखा सतत खुर्चीला चिटकून बसायचा आणि चहा ढोसायचा नुसता! संपल सगळ.अरे त्याच्यामुळे मला ही सवय लागली चहाची!
(बच्चमजी गप्पा मारत टाईमपास कोण करायचं माझ्यासोबत? आत्ता समोर येऊन जाब विचारला तर 'भूत' दिसलं म्हणून गर्भगळित होशील).
आमचे सख्खे शेजारी: तोंड चालवण्यापेक्षा हात/पाय चालवले असते तर बर झालं असत. माणूस बरा होता हो तसा!
दुसरा शेजारी : कधीही चालायचे नाही. सदानकदा बुडाखाली Activa!
ती नसती तर जरा active तरी राहिले असते. गेले बिचारे!
मंडळींनो वरती बसून ऐकतो आहे सर्वांच बोलणं !!अजून काय पुरावा देऊ??
रामदेव बाबा की जय!
(आणि हो मेल्यानंतर पण चौदा दिवस आत्मा घरापाशी फिरत असतो बरं)