दुसरी बाजू

दुसरी बाजू

सकाळ चे बरोब्बर 8 वाजले आणि बेल चा आवाज ऐकू आला. हुश्श झाल. शोभा बाई आल्या होत्या.

गेले 12/13 वर्षे त्या आमच्याकडे कामाला आहेत. गोरापान रंग, मोठ्ठ लाल कुंकू, अंबाडा आणि छान धुतलेली साडी पाहूनच प्रसन्न वाटायचं. काम पण स्वच्छ आणि तोंड बंद. इकडच तिकडे सांगण नाही. त्यामुळे मी पण खुश होते आणि मुख्य म्हणजे वेळेवर येणार. उशीर होणार असेल तर फोन करायच्या.

पण पहिल्यांदाच यावेळेस न सांगता आल्या नव्हत्या. 3 दिवस झाले होते. मी ४/५ वेळा फोन केला पण फोनही घेत नव्हत्या .मी पण जरा काळजीतच होते.
दार उघडत नाही तर रडायलाच लागल्या. ताई माझ्या मुलीने लईच वंगाळ काम केल हो. 3 दिवस झाले आम्ही पोलिस चौकीत होतो हो.

काय झाल एव्हढ शोभा बाई?

ताई ती शेजारच्या मुलासंगट पळून गेली. फोन पण बंद आहे तिचा. तिच्या नवऱ्याने पोलिस कंप्लेट दिली ताई. काय करू काही समजत नाही. मलाही काय बोलाव समजेना. मी त्यांना चहा दिला, थोडावेळ बोललेआणि मग त्या भांडी घासायला गेल्या.

माला त्यांच्या मुलीच नाव. 10 /12 वर्षे झाली असावी तिच्या लग्नाला. 3 पोरी आणि चौथा मुलगा. एक किंवा दीड वर्षाचा असेल तिचा मुलगा. 2/3 वेळा परत आली होती. मग नवरा येऊन घेऊन गेला. नवरा 11 /12 वर्षांनी मोठा होता तिच्यापेक्षा. सासू पण खूप मारायची बिचारीला. पण संसार करत होती. सतत शोभाबाईंना तिच टेन्शन असायच. पण हे मात्र भलतच काहीतरी केल होत मालाने.

शोभाबाईं काम झाल्यावर निघून गेल्या. आता काही त्या 3/4 दिवस येणार नव्हत्या. पण दुपारी फोन आला कि ताई मी उद्या येते आहे. माला परत आली आहे.

दुसऱ्या दिवशी आल्या तर सांगायला लागल्या ताई माला परत आली ती तडक नवऱ्याच्या घरी गेली आणि सासूने आणि नवऱ्याने तिला बेदम मारल होत. सगळ तोंड सुजल आहे ताई. पोटची पोर आहे ताई घरात घेतली पण ज्याच्या बरोबर पळून गेली त्याच्या सोबतच राहिली असती तरी चालल असत पण परत आली आणि ते ही नवऱ्याच्या घरी गेली पहिले. माझ्या कडे आली असती तर काहीतरी मार्ग काढला असता. आता काय मोडला तिचा संसार. ज्याच्या सोबत पळून गेली त्याच्याशी लग्न लावून दिल असत पण आता काय हातात काहीच नाही उरल. मलाही वाईट वाटत होत पण शेवटी ज्याच त्यालाच सहन कराव लागत न. त्यांचा मुलगा पण वायाच गेला होता आणि आता हे दु:ख. पण मला त्यांच एकीकडे कौतुकही वाटत होत. पोरीला शिव्या घालत होत्या पण सांभाळूनही घेत होत्या.

2/3 दिवस परत आल्या नाहीत. त्यांना आता खोली बदलायची होती कारण सगळीकडे बदनामी झाली होती न! मग 2/3 मी दुसऱ्या बाईला बोलावल. शीतलला.
या बायकांना एकमेकींच सगळ माहीत असत त्यामुळे मी उगीचच तिच्याशी बोलायला गेले नाही. कारण शोभा माझ्याकडे जवळपास 11/12 वर्षे काम करते आहे. म्हणून मी काहीच त्या बाबतीत शीतलशी बोलले नाही. पण चुकून तिची कपबश्या विसळायची वेळ आणि माझी भाजी फोडणी ला घालायची वेळ नेमकी एकच आली.
मग काय!! सुरु

ताई शोभा आणि मी न दूरच्या नात्यात आहोत.

हं

ती आणि तिचा नवरा पळून आले होते.

हो माहीत आहे ग मला. 8 दिवस बिचारे दोघेही नुसते केळी खाऊन जगत होते. सांगितल मला एकदा शोभाने. कोणीही मदत नाही केली त्यांना. मी अस म्हणून विषय बंद करायचा प्रयत्न केल.

पण शीतल म्हणाली,
कोण करणार मदत? लग्न झाल्यावर 8 व्या दिवशीच तिच्या लहान दिरासोबत पळून आली होती शोभा. तिच्या खऱ्या नवऱ्याने आत्महत्या केली हो ताई!! झाडाला फास लावून!! माझा लांबचा भाऊ होता तो. आता काय बाता मारते ती!!

मी यांत्रिकपणे भाजीकडे पहात होते. काय बोलणार होते मी? तेवढ्यात ती लादी पुसायला बाहेर गेली.

एखाद्या माणसाबद्दल आपण काय कल्पना केली असते आणि तो काय निघतो. आणि शीतल खोट बोलत नव्हती हे कळत होत मला.

मला शोभाबाईंचे चे शब्द आठवले. ताई ज्याच्या बरोबर पळून गेली त्याच्याशी लग्न लावून दिल असत न आम्ही तिच!!!
खरच माणूस प्रत्येक वेळी स्वतःला योग्य ठिकाणीच बघतो. शोभाने जे काही वर्षांपूर्वी केल होत ते तिला योग्य वाटत होत.
तिच्या मते मालाने परत येऊन चूक केली होती आणि शीतलच्या मते शोभाने तर गुन्हाच केला होता.

प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असतेच. प्रत्येक जण आपापल्या परीने तसा वागत असतो आणि त्या गोष्टीच समर्थन देखील करत असतो.

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »