महिला दिवस मोठ्या उत्साहाने साजरा होतो. त्याच्यावर ताशेरे ओढले जातात.आई, बहीण, बायको आणि मुलगी खरंतर त्याच्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. या चौघींशिवाय त्याचं आयुष्य निरस आहे. 'ती' च्या कर्तृत्वाचा त्याला अभिमान आहे. जुन्या पुरुषप्रधान संस्कृतिचा 'तो' ही विरोधच करतो.
पण बायकोचं ऐकले तर बायकोच्या ताटाखालचे मांजर आणि आईचे ऐकले तर बावळट हे शेरे ऐकुन ऐकून 'तो' थकला आहे, कंटाळला आहे. 'ती' आणि 'ती' त्याचा हॅम्लेट करतात. त्याचं जगणं नकोस करतात तरी पण तो दोघींनाही खुश ठेवण्याचा मनापासून प्रयत्न करतो. बायकोला घरकामात मदत करतो, तिच्या पालकांचा आदर करतो, घर घेतांना दोघांच्याही नावावर घर घेतो,मुलांना सांभाळतो, 'ती' चा मान राखतो.
पण खरंच प्रत्येक वेळी स्त्रीच्या वाताहतीमागे एका पुरुषालाच जबाबदार धरायला हवे का?
तिच्यावर अन्याय करायला खरचं 'तो' लागतो? 'तो' च फक्त तिच्यावर अन्याय करतो? 'ती' तिच्यावर होणाऱ्या अन्यायात कधीच सामील नसते? हे 'ती' छातीठोकपणे सांगू शकते का? अन्याय आणि घाव फक्त शारिरीक अत्याचाराचेच असतात? फक्त एका जेंडरने दुसर्या जेंडरवर केलेले?
एका 'ती' ला जाळण्यासाठी 'ती' ने लावलेली काडी अन्यायकारक नसते का? एका 'ती' ने तिच्यावर ओतलेले राॅकेल ज्वालाग्राही नसते का?
नेहमी 'तो' च का?
तिच्यावरच्या अन्यायाची जाणीव त्यालाही आहेच. भरपूर गोष्टीत तडजोड 'तो' करतो आहे आणि त्याची शेखी अजिबात मिरवत नाही.' तो' बदलतो आहे.
फक्त त्याची पण आता एकच मागणी आहे,
'बेरोजगार' असणारा 'तो' 'ती' ला कमावतीला नवरा म्हणून चालणार आहे का?
'तो' जर घरी बसून घर आणि मुलं सांभाळायला तयार असेल तर??