आज माधवरावांनी परत तिच्या खोलीचं दार रात्री ठोठवलं होतं. त्या आवाजाचा आता रेवतीने धसकाच घेतला होता. दिवसभर त्यांची नजर तिचा मागोवा घ्यायची. सतत तिला न्याहाळत असायचे पण सासूबाई आणि मोठी जाऊ घरात आजूबाजूला असायच्या त्यामुळे ती तग धरुन होती पण अब्रू वाचवतांना नाकी नऊ आले होते. कुठेही बोलायची सोय नव्हती. संपूर्ण घरातच काय गावात त्यांचा दरारा होता. सहा फूट उंची, करारी डोळे, गव्हाळ रंग आणि हातात जाडसर मूठ असलेली काठी! बोलायला लागले की समोरच्याची मान वर करुन बघायची हिंमत नसायची. एका वर्षांपूर्वी रेवती लग्न होऊन या घरात आली होती. माधवरावांचा लहान मुलगा केतनशी तिचे लग्न झाले होते आणि साप चावल्याचं निमित्त होऊन तिचा नवरा गेला होता. ती आता एकटी पडली होती. माहेरची अतिशय गरीबी होती त्यामुळे माहेरून कोणीही तिला घेऊन जायला आले नव्हते. सासुबाईंनी तिला ही अडगळीची खोली राहायला दिली होती. तसं म्हटलं तर तिला फारसा त्रास नव्हता. पण जसा नवऱ्याचा 14 वा झाला आणि सासऱ्याचे नवीन रूप तिच्या समोर आले. ती फारशी शिकलेली नव्हती दहावी पास झाली होती परंतु दिसायला सुरेख होती त्यामुळे या जमीनदारांच्या घरात तिचं लग्न झालं होतं. तिचा नवरा अतिशय सज्जन होता. पण दुर्दैवाने आज ती विधवा झाली होती. सासर्यांचं वागणं पाहून तिला धडकीच भरली होती. सतत ती नजर तिचा पाठपुरावा करायची. आज तिने सासुबाईंना हिंमत करून सगळं सांगायचं ठरवलं होतं परंतु सकाळी उठल्याउठल्याच सासूबाईंनी सांगितले की घरचे सगळेजण शेजारच्या गावात लग्नासाठी जाणार आहेत. तिला येता येणार नाही. घरी ती आणि सासरे दोघेच राहणार होते. तिला काय घडणार हे लक्षात आलं. सासूबाई आणि जाऊ बाई बाहेर जायच्या आधीच हिने दोन कपडे आणि स्वतः जवळ जे पैसे होते ते पैसे घेतले आणि घराबाहेर पडली. तिला माहीत होतं एक बस दुसऱ्या गावाला जायला नऊ वाजता शेताच्या रस्त्याने जाते. ती त्या मार्गाने जायला निघाली तेवढ्यात तिच्या लक्षात आलं की सासुबाई आणि जाऊ बाई सुद्धा त्याच बसने जाऊ शकतात तेव्हा मात्र ती काही एक विचार न करता समोर दिसेल त्या रस्त्याने चालत निघाली. तिच्याच नादात ती किती वेळ चालत होती ह्याचं तिलाही भान नव्हते. फक्त सासऱ्यापासून दूर जाणे आणि स्वतःची इज्जत वाचवणे हा एकच उद्देश होता. ती भराभर चालत होती आणि अचानक ठेच लागून पडली. दोन माकडं समोर बसली होती. माकडांनी तिच्या हातची पिशवी ओढायचा प्रयत्न केला. ती घाबरली होती. तितक्यात कुठून तरी एक दगड आला आणि माकड पळत सुटले. तिने मागे वळून पाहिलं तर एक म्हातारा माणूस काठी घेऊन माकडांच्या मागे येत होता. त्यांनीच बहुतेक माकडांना दगड मारला होता.
काय ग पोरी कुठे निघालीस?
तिला पोरी या शब्दाची शिसारी आली होती कारण तिचा सासरा तिला अशीच हाक मारायचा.
तिने पदर सावरला आणि म्हणाली काही नाही घरी चालले होते.
अगं पोरी, हा तर स्मशानाचा रस्ता इकडे कुठे चाललीस?
ती काहीच बोलली नाही.
"ये माझ्यामागे मुकाट्यानं", म्हातारा म्हणाला.
तिने म्हाताऱ्याकडे रोखून बघितले. तो खाली बघून झपझप चालत होता. ती म्हाताऱ्याच्या मागे मागे गेली. कारण आता संध्याकाळ होत आली होती. कुठेतरी आसरा घेणे गरजेचे होते. ते चालत चालत स्मशानात आले. दोन चिता अर्धवट जळत होत्या. बरीच माणसं आजूबाजूला उभी होती. तिने चेहरा लपवला. म्हाताऱ्याच्या मागे त्याच्या खोपटात गेली. बाजूला पडलेला दगड तिने लक्षात ठेवला होता वेळ पडली तर म्हाताऱ्याच्या डोक्यात ती तो दगड घालणार होती. तितक्यात एक पाच सहा वर्षाची मुलगी झोपडीतून बाहेर आली. आबा आबा म्हणत म्हाताऱ्याला बिलगली. तिला जरा सुरक्षित वाटलं. म्हाताऱ्याने तिला पाणी दिले. ही गटागटा पाणी प्यायली. लहान मुलगी तिच्याकडे उत्सुकतेने बघत होती नकळतपणे तिने त्या मुलीला जवळ घेतले. तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि उठून तिला बाहेर घेऊन गेली. चिता जळायला लागली होती त्यामुळे आजूबाजूची माणसे आता घरी जायची घाई करत होती. स्मशान रिकामे झाले होते. तिने आजूबाजूला पाहिले. तिथे बऱ्यापैकी झाडे होती. एक दोन मुलं आजूबाजूला खेळत होती. दोघांच्याही अंगावर फक्त चड्डी होती. ही नुसतीच त्या मुलांकडे पाहत बसली. मांडीत लहान मुलगी आता झोपली होती. तितक्यात म्हाताऱ्याने घरातून रॉकेल आणले आणि त्या दोन्ही चितांवर ओतले. चिता आता धडाडून पेटल्या होत्या. म्हाताऱ्या बाबांनी त्या चितेवरच विडी पेटवली आणि चितेतलं एक लाकूड घेतलं आणि झोपडी बाहेरची चूल पेटवली चुलीवर मोठा गंज ठेवला. बाजूच्या ड्रमातलंच पाणी घेतलं त्यात टाकलं. झोपडीच्या आतून एक डबा आणून त्या डब्यातले तांदूळ त्यांनी त्या चुलीवरच्या मोठ्या पातेल्यात टाकले. भात रटारटा शिजत होता. पंधरा मिनिटांनी तिला आणि त्या लहान मुलीला म्हाताऱ्याने जेवायला बोलावलं. कितीतरी दिवसांनी ती समाधानाने जेवली होती. आता रात्र होत आली होती पण का कोणास ठाऊक या स्मशानात तिला अजिबात भीती वाटत नव्हती. तिचा जीव शांत झाला होता. काही न बोलता तिने तिथलीच राख घेतली आणि तो गंज आणि तिघांच्या ताटल्या घासून टाकल्या.
म्हातारा म्हणाला, पोरी त्या झोपडीत जाऊन झोप. मी इकडे झोपतो. ती निमुटपणे त्या लहान मुलीला घेऊन झोपडीत जाऊन झोपली. सकाळी उठून तिने सगळं अंगण स्वच्छ केलं. काल रात्रीच्या दोन्ही चिता जळून शांत झाल्या होत्या. चार-पाच माणसं राख सावडायला आली होती. लहान मुलीला पाहून काही लोकांनी तिच्या हातात पैसे दिले लहान मुलीने ते पैसे म्हातार्याला नेऊन दिले. कालची ती दोन लहान मुलं परत खेळायला आली होती. आज ती पण त्या दोन लहान मुलांशी बोलली. तितक्यात एक बाई धावत धावत त्या मुलांकडे आली आणि त्यांच्या हातात एक प्लास्टिकचा डबा दिला आणि घाई घाईत परत जायला निघाली. तिच्याकडे लक्ष जाताच आश्चर्याने विचारले,
कोण ग तू?
आधी नाही पाहिलं तुला कधी. म्हातारा लगेच आला आणि म्हणाला की माझी पोरगी हाय ती!
"तुझ्या पोरीला तर सासरच्यांनी जाळून मारलं नरे आबा! ही कोणती पोरगी?"
म्हातारा म्हणाला की जशी तू माझी पोरगी आहेस तशी ती बी माझी पोरगी आहे. त्या मुलांची आई तोंडभरून हसली आणि तिला म्हणाली सुखी रहा ग बये! माझ्या या वात्रट पोरांकडे लक्ष दे. मी येते दुपारी.
ही हो म्हणाली आणि मनापासून हसली.
दुपारी तिने चार भाकऱ्या थापल्या. तिघेही नीटपणे जेवले.एक भाकरी त्या दोन मुलांना दिली. दुपारी ती शांतपणे बसली होती तेवढ्यात म्हातारा तिथे आला. त्याच्या हातात पेपर होता आणि पेपर मध्ये तिचा फोटो आला होता.
म्हातारा म्हणाला की तूच हाय नव!
ती म्हणाली की ती मी नाही, ती दुसरीच कोणीतरी आहे.
म्हातारा हसला आणि तो पेपर त्याने जळत्या चितेत टाकला. ती आता निश्चिंत झाली. आता ती इथे स्मशानात रमली होती. आज मात्र अघटीत घडलं होतं. म्हाताऱ्याची नात खेळता खेळता चिते जवळ गेली होती आणि तिचा पाय गरम राखेवर पडला आणि पूर्ण भाजला होता. लहान जीव कळवळला होता, जोरजोरात ती रडत होती. म्हातारा तिच्या पायावर पाणी ओतत होता पण डॉक्टर कडे घेऊन जायला पैसेच नव्हते. तितक्यात अजून दोन मृतदेह आले. म्हाताऱ्याला उशीर झाला म्हणून ती लोक ओरडायला लागली. हिचा जीव गलबलला. हिने त्या लहान पोरीला उचललं आणि दवाखान्याकडे धाव घेतली. डॉक्टरांनी तिला औषध दिली. घरी आल्यावर म्हाताऱ्याने विचारले की पोरी पैसे कुठून आणलेस? ती म्हणाली घरून निघताना मी थोडे पैसे घेतले होते आणि माझ्या सोन्याच्या बांगड्या पण आणल्या होत्या, माझ्या नवर्याने केलेल्या. तिने सोन्याच्या चार बांगड्या म्हाताऱ्या कडे दिल्या. म्हातारा म्हणाला की तूच ठेव त्याला काही नको. ती काहीच बोलली नाही निमुटपणे तिने म्हाताऱ्यासमोरच गादीच्या खाली त्या बांगड्या ठेवल्या.
लहान मुलगी आता जरा शांत झाली होती. म्हाताऱ्याच्या डोळ्यात पाणी होतं. तिला म्हणाला, " माझ्या मुलीला तिच्या सासरच्यांनी हुंड्या पायी मारून खाल्लं. ही माझी नात आहे. असं वाटतं की गरिबीत ही पण अशीच मरणार! माझ्यासोबत".
ती म्हणाली, "असं नाही होणार मी मेहनत करीन आणि हिला शिकवेन आणि तुम्हालाही सुखात ठेवीन". म्हातारा हसला. काहीच बोलला नाही.
तिने चुलीवर भात चढवला. पोटभर जेवून तिघेही सुखाने झोपले होते.
आज म्हाताऱ्याला गावात कुठेतरी जायचे होते म्हणून म्हातारा सकाळीच बाहेर गेला. थोड्यावेळ ती झोपडीच्या बाहेर बसली ऊन लागायला लागलं म्हणून आत गेली. तितक्यात दारावर तीच टकटक ऐकू आली. तिचा जीव दडपला. थरथरायला लागली ती. परत तीच टकटक आणि आता तर आवाजही तोच होता. तिने दार उघडायच्या आधीच दरवाजावर लाथ बसली. झोपडीचं दार किती वेळ तग धरणार होतं? सासऱ्याला पाहून ती हादरली.
पळून आलीस घरातून?
कालच तूला त्या डाक्टरकडे पाहीलं आणि तूझ्या मागावर आलो.
"तो घाणेरडा थेरडा चालतो तूला आणि मी नाही?"
त्याचे ते बोलणं ऐकून ती शहारली पण इलाज नसल्याने त्यांच्यासमोर गयावया करायला लागली. पण माधवरावांनी तिच्या पदरालाच हात घातला तशी तिने चवताळून बाजूला पडलेली म्हाताऱ्याची लाकड तोडायची कुऱ्हाड घेतली आणि माधवरावांच्या डोक्यात हाणली. एका क्षणात तो नराधम जमिनीवर कोसळला. तिने तसंच त्याला ओढत ओढत बाहेर आणलं आणि जी चिता अर्धवट जळत होती तिच्यावर फेकले. कुठून तिच्या अंगात एवढी शक्ती आली होती देवालाच माहीत! तिने आतून राॅकेलचा कॅन आणला आणि अख्खा कॅन ओतला त्या धडावर! धगधगत्या चितेकडे ती विमनस्कपणे पहात होती.
थोड्यावेळाने म्हातारा घरी आला तर त्याला चिता जळतांना दिसली. काल रात्रीची चिता अजून कशी जळते आहे हे बघून तो आश्चर्यचकित झाला. झोपडीत आला तर सांडलेले रक्त, तिचा विदीर्ण चेहरा, रक्ताळलेली कुऱ्हाड पाहून काय समजायचे ते समजला.
कोण होता ?
सासरा!
असं म्हणत ती पचकन थूंकली!
म्हाताऱ्याने चितेवर अजून थोडी लाकडे टाकली आणि भरपूर रॉकेल ओतले. नंतर राख घेऊन कुऱ्हाडीचे पाते स्वच्छ करत बसला.
- Varsha Hemant Phatak