कविता : संसार
संसार
काहीही न करता फक्त श्रेय
देणे खुपच सोपे असते
संसार नेहमी तिचाच असतो हा
कांगावा तुझी पळवाट असते
संसार असतो दोघांचा
निभवते मात्र एकटीच ती
तुझ्या ही वाटचे श्रम करतांना
गलितगात्र होते ती
भांड्याच्या आवाजात लपवते
तिचा दबलेला आवाज
आणि हुंदका ती
घरची मर्यादा सततच जपत असते ती
असते प्रेमाची आणि किंचीत
सन्मानाची भुकेली ती
अपेक्षाभंग होताच स्वतःला
निमूटपणे समजावते ती
गृहीत धरले तिला तू
सहजच समजून घेते ती
तुझ्याच परिघात सामावून
स्वतःला संयमित करते ती
वर्षामागून वर्ष जातात
रहाटगाडा ओढत राहते ती
तिचे आणि तुझेही वार्धक्य
अलगदपणे जपते ती
जाणीव होते अस्तित्वाची तिच्या,
सोडून जाता तूला ती
ठायीठायी का रडशी आता
व्यापून उरली सर्वस्वात तुझ्या ती
संसार खरंच रे तिचाच होता
तिनेच तो निभावला,
जिद्द तिचीच होती ती,
गोड गैरसमज तूझाच होता
वर्षा हेमंत फाटक, पुणे
- Varsha Hemant Phatak
« Prev
Next
»