संन्यास

संन्यास

आज पहिल्यांदाच नाशिकला स्वामी योगेश यांच प्रवचन होत.पण त्यांनी फक्त जवळचे लोक आणि काही पत्रकार यांनाच बोलावल होत.मात्र शहरातील सगळी नामांकित मंडळी हजर होती.

स्वामींनी बोलायला सुरवात केली.त्यांची ओघवती वाणी सगळे मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. मग ते म्हणाले कि त्याग हाच जीवनाच आधार आहे. त्यातच सगळं सुख आहे.

एक तरुण उभा राहिला आणि म्हणाला,
"मी काही विचारलं तर चालेल का स्वामी?"

स्वामी हो म्हणाले.

"त्याग म्हणजे नक्की काय?"

"एखाद्या गोष्टीचा मोह होत असेल तर तो तिथेच सोडणे आणि मोहावर विजय मिळवण",स्वामी म्हणाले.

"तो मोह सोडणे कि ती गोष्ट जिचा मोह झाला तिला सोडणे?"तरुणाने विचारलं.

"म्हणजे? तुला काय विचारायचं आहे मुला?"
स्वामी म्हणाले.

"मला अस विचारायचे आहे कि एखाद्या व्यक्तीने लग्न झाल्यावर विचार केला कि त्याला वैवाहिक जीवनाचा त्याग करायचा आहे,तर त्याने काय करायला हवं? बायको- मुलांना सोडून द्यायच?कारण त्याला आता संसार करण्यात राम वाटतं नाही म्हणून??
मग बायका-मुलांनी पण संन्यास घ्यायचा का?जबरदस्तीने?",तरुणाने विचारलं.

सगळे जण त्या तरुण मुलाकडे आश्चर्याने पहात होते.

स्वामी म्हणाले,"अस काही आवश्यक नाही आहे,
ती स्त्री तिचं आयुष्य जगूच शकते.तिचा आनंद कोणी हिरावून नाही घेत आहे".

मग त्या तरुणाने विचारले,"स्वामी आपली भारतीय संस्कृती आहे – जिथे एका स्त्री साठी तिचा नवरा हेच जग असत आणि तो सोडून गेला कि समाज तिला जबाबदार धरतो.तेव्हा तिने तिचा आनंद कसा शोधायचा?मुलांना कसं वाढवायचं?आर्थिक बाजू कशी सांभाळायची?मग त्या कुटुंबाने उपाशीपोटी मरायच का?"

"हे तर होणारचं!प्रत्येक जण आपल नशीब घेऊन या जगात आला असतो."
स्वामी म्हणाले.

तरुणाने परत विचारलं,"पण का?एखादा स्वामी संन्यास घेण्याआधी बायको आणि मुलांची सगळी सोय करून संन्यास नाही घेऊ शकतं का?"

आता हळूहळू लोक पण त्या तरुणाच बोलण ऐकायला लागले होते.

स्वामींनी त्या तरुणाकडे बारकाईने बघितले आणि अचानक त्याला विचारले, "तुझ्या वडिलांच नाव श्रीनिवास त्रिपाठी आहे का?"

हो !! तुम्हाला कसं कळलं?

स्वामी किंचीतसे हसुन म्हणाले,
"बेटा संन्यास घेऊन 15 वर्ष झाली. जो आनंद शोधायला घराबाहेर पडलो तो तर नाही सापडला पण आत्ता तुझ्याशी बोलतांना लक्षात आल जे शोधायला बाहेर पडलो ते घरीच होत. तू बोलण वडिलांच घेतल आहे आणि चेहरा आईचा!"

"म्हणजे तुम्ही मला ओळखल तर!!",तरुणाने विचारले.

"हो बेटा!मी ओळखल तूला मगाशीच.तू माझाच मुलगा आहे. मी लोकांना आनंद दिला पण माझा आनंद मी गमावून बसलो".

लोक आता स्वामींकडे आश्चर्याने पहात होते.

स्वामी सगळ्यांना उद्देशून म्हणाले,
"मला सगळ्यांना सांगायचं आहे कि संसार की संन्यास हे विवाहाआधीच ठरवा.
कुटुंबाला दुःखांत लोटून संन्यास अजिबात घेऊ नका.मी संन्यास घेतल्यानंतर रोज रात्री मला मुलांची आठवण यायची.कदाचित त्यांच्यावर अन्याय केल्याची जाणीव जास्त तीव्र होती. पण परत संसारात जायला लाज वाटत होती. मी शरीराने कुटुंबापासून दूर गेलो होतो पण मन तिथेच अडकले होते. आज ते मोकळे झाले. मला खरा आनंद माझ्या मुलाच्या रुपाने गवसला.संन्यास घेतांना दहावेळा विचार करा".

एवढे बोलून स्वामी थांबले
आणि स्वामींनी मुलाला जवळ घेतलं.
"चल आज मी परत घरी येणार आहे",स्वामी म्हणाले.

तो तरुण म्हणाला," स्वामी तुम्ही तेंव्हाही अविचाराने निर्णय घेतला होता आणि आत्ताही घेत आहात.15 वर्षांपूर्वी समाजाने आमची कीव केली आता संन्यास सोडून तुम्ही परत संसारात आला तर हसे होईल. आता हीच पदवी बाळगा, संन्याश्याची".

एवढे बोलून तो तरुण मागे वळूनही न पहाता निघून गेला.

स्वामींच्या नशिबी आज खरा संन्यास आला होता.

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »