पुस्तक : एका सेलिब्रिटी डेन्टिसची बत्तिशी लेखक: डॉ. संदेश मयेकर

दात हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय! आयुष्यात एकदाही डेंटिस्टकडे न गेलेला माणूस खरंच खूप खूप नशिबवान! मी अतिशय कमनशिबी! माझं आणि दातांच पहिलेपासूनच वाकडं आहे. माझ्या डेंटिस्टच्या वाऱ्या सतत सुरु असतात. अशाच ठिकाणी अचानक 'एका सेलिब्रिटी डेन्टिसची बत्तिशी' हे पुस्तक मी बघीतले. प्रस्तावना : भारतरत्न लता मंगेशकर मान्यवरांमध्ये विद्या बालन, ऋतिक रोशन, अनिल कपूर, करण जौहर वगैरे वगैरे! मी उडालेच! नक्कीच वाचायला हवं हे पुस्तक! लगेच डॉक्टरांना विचारुन पुस्तक घरी वाचायला आणले आणि लक्षात आले की माहितीचा उपयुक्त खजिना आहे या पुस्तकात आणि विविधरंगी अनुभव अतिशय रंजकतेने मांडले आहेत. प्रत्येक लेखात अरे असं असतं का? हे तर माहीतच नव्हते. एका छोट्याश्या दातात काय काय दडलं आहे? कॅव्हीटी, रुटकॅनल, कवळी आणि अक्कलदाढ हे चार शब्द आपल्या परिचयाचे आहेत. पण अनेक सुंदर तारकांना मनमोहक हास्य प्रदान करण्याची ताकदही एका डेंटिस्टकडे असते हे समजले. सौंदर्य खुलवणे म्हणजे चेहर्‍यावर पावडर आणि ओठांवर लिपस्टीक लावणे या पलिकडे गेलेली मोहक दंतसौंदर्याची संकल्पना सामान्य माणसाच्या कल्पनेपलिकडची आहे. यासाठी फेमिना स्पर्धेतल्या तरुणीची गोष्ट बरंच काही सांगून जाते. कधी कधी वाटतं देवाने बत्तीस दात का दिलेत? पोट एक, डोक एक आणि दात बत्तीस? कशाला? डोकी तरी दोन द्यायची एक नाही चालले तर दुसरे उपयोगात येईल. पण हे दात एकदा किडतात, एकदा तुटतात, एकदा छिद्र पडतं. आणि त्यात ती अक्कलदाढ! हा माझा अत्यंत म्हणजे अत्यंत दिल के करीब असलेला विषय आहे. ती आडवी आली की संपलच! काय करायचे? पोटात गोळा! ऑपरेट कधी करायचे आणि का? या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे पुस्तकात मिळतील. आपण जे म्हणतो न की गरज नसतांना उगीचच माझी दाढ काढली त्यामागे एक शास्त्र असतं हे समजले. दात, चेहरा आणि मानेचे स्नायू यांचा संबंध आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या विविध समस्या वाचून तर मी आश्चर्यचकित झाले. कानात येणारा टिकटिक आवाज हा दाताशी संबंधितही असू शकतो हे वाचून नवल वाटले. खूप गोष्टी नव्याने समजल्या. ज्ञानात भर पडली आणि बरेच गैरसमज दूर झाले. डॉ. मयेकर यांची एमएस केल्याची गोष्ट वाचाल तर थक्क व्हायला होईल कारण स्वतःची प्रॅक्टीस इतकी चांगली चालत असतांना सलग तीन वर्षे परत ज्ञान मिळविण्यासाठी प्रयत्नशील असणे हे खरंच आदरणीय आहे. आजच्या विद्यार्थ्यांनी नक्कीच आदर्श ठेवावा. 'दंतवैद्यकशास्त्रातलं सौंदर्यशास्त्र' ह्या विषयाचा आवाका किती मोठा आहे हे पुस्तक वाचतांना जाणवतं राहतं आणि आपल्या सामान्य माणसाच्या दृष्टीने दाताचा उपयोग फक्त उदरभरण करण्यासाठी असतो या विचाराला छेद मिळतो. बत्तीस दातांच्या गुहेत काय काय दडलंय हे त्या गुहेत हात घालणारा डेंटिस्टच जाणो! अनुभवांचा खजिना डॉ. मयेकरांनी खुला केला आहे. एकेक अनुभव चकित करणारा! रंजक पद्धतीने अनुभव सांगितले आहे आणि त्यामुळे पुस्तक जास्त इंटरेस्टिंग झाले आहे. पुस्तकात डॉ. मयेकरांनी छोटे छोटे, उपयुक्त सल्लेही दिलेले आहेत. पेशंटसाठी आणि डेंटिस्टसाठी पण! यही है राईट चाॅईस या लेखात! अंगठा चोखण्याची सवय, नखे खाण्याची सवय त्याचे दुष्परिणाम वाचून आपण जास्त जागरूक होतो, धुम्रपान, कोला पिण्याची सवय या सर्व चुकीच्या सवयींचा उहापोह केला आहे. योग्य त्या टीप्स पेशंटना दिलेल्या आहेत. दातांचे आरोग्य आणि सौंदर्य टिकवण्यासाठी छान मार्गदर्शन केले आहे. एका साध्या कुटुंबातून आलेली व्यक्ती त्याला इतरांपासून काहीतरी वेगळे करायचे आहे या विचाराने प्रवृत्त होऊन एवढी नामांकित होते,अर्थात यश हे सहजासहजी कधीच मिळत नाही, खाचखळगे असतातच पण हा सगळा अचंबित करणारा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे. संग्रही ठेवावे असे हे पुस्तक आहे असं मला वाटतं. वर्षा हेमंत फाटक, पुणे



- Varsha Hemant Phatak
« Prev Share
Likes: 0 Views: 2