ललित लेख : माया


माया

आमच्या मावशींच्या मुलीचे लग्न होते. आम्ही त्यांना घरच्यासारखा व्यवस्थितअहेर केला कारण गेली 14/15 वर्षे त्या आमच्या कडे येतात. मला म्हणाल्या ताई तुम्ही लहान बहिणीसारखी माया करता माझ्यावर! माझेही डोळे भरून आले.

खरंच ही माया काय असते?
ऐश्वर्य, संपत्ती, मोह, आभास की मावशी म्हणतात तसं प्रेम, जिव्हाळा?

खरी माया दाखवणारी तर ती जगदंबा आहे आणि तो श्रीकृष्ण! त्यांच्या मायेपुढे आपण नतमस्तक! आदिमायेची रुप अनेक आहेत. ती जी माया निर्माण करते तिच्यासमोर सारे निष्प्रभ.ती जगत् जननी आहे. तिची माया सर्व चराचरावर आहे. ती अनाकलनीय आहे.

पांडवांसाठी मयासुराने बांधलेली मयसभा कोण विसरणार? मायावी शक्तीत असूर निपूण होते.ही मायाच एखाद्या चांगल्या माणसाला राक्षस बनवू शकते कारण ही एक वृत्ती आहे.

कलियुगात सामान्य माणूस सतत जी माया जमवतो तिचं काय? तो ज्या मायेच्या लोभात पडतो त्याला अंत नाही.
ही माया खऱ्याचं खोट आणि खोट्याचं खरं करते. आपल्याला संभ्रमात पाडते.
लांड्यालबाड्या करुन जमवलेली माया समाधान देते का? ती माया जमवतांना माणूस नक्की काय विचार करतो? एक पिढी, दुसरी पिढी, तिसरी पिढी किती पिढ्यांसाठी माया जमवून ठेवायची? हिच्या मोहातून कशी सुटका करून घ्यायची? एकेकावर इडी लागली की समजतं किती माया जमवली आहे ते! सगळं काळबेर बाहेर येतं. आपण थक्क होतो. ही माया माणसाला रसातळाला नेणारी आहे. हिच्यापायी माणूस स्वार्थी, लालची होतो.

तिसरी माया जी आई आपल्यावर करते ती. तिला तोड नाही. ह्या मायेला पारखे झालेले कमनशिबी म्हणावे लागतील. ही मायाही आगळीवेगळी. ही माया मिळाली तर एखादा गुन्हेगार ही सत्शील होऊ शकतो, वाट चुकलेला परत घरी येऊ शकतो.
ही माया मुक्याप्राण्यांवर, वंचितावर, दिनदुबळ्यांवर केली तर खरंच जग सुंदर होईल, आभासी, मायावी न वाटता खरोखरंच जगायला योग्य असे होईल.


Ai ने निर्माण होणारे जग 'माया' च असेल का?

वर्षा हेमंत फाटक, पुणे

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »