मी माझी…

मी माझी…

आज एका लग्नाला जायचं होत. 12 चा मुहूर्त होता. मुलांचे डबे भरून झाले होते. ओटा आवरता आवरता डोक्यात साडी कोणती नेसायची हे विचार सुरू होते.
आंघोळ झाली आणि कपाटासमोर उभी राहिले. अरेच्चा मेंदी लावायची राहिलीच कि केसांना (हाताला नाही). साडी प्रेस करायची राहिलीच होती. हिरवा रंग ठरवला होता आमच्या ग्रुपनी. लाँकर मधून दागिने काढायच लक्षात होत पण तेव्हाच अहोंचे दोन मित्र भजी खायला आलीत. वाजले कि 12!! मग उन्हात कुठे जायच म्हणून राहूदे म्हटल आणि आता चिडचिड होत होती.

रागात गाऊन अडकवला, मोबू off केला आणि चक्क ताणून दिली.
पण तिथे ही स्वप्नात आली कि मीच माझ्या. मस्त हिरवी कांजीवरम लाल काठ असलेली नेसले होते. त्यावर बकुळीच्या फुलांचा तीन पदरी हार. तोडे आणि केसांना मेंदी पण होती. व्वा छान दिसतो आहे कि आपण.

पण ती माझी छबी होती. ती बोलायला लागली.

पत्रिका येऊन किती दिवस झालेत ग?

7/8 झाले असतील.

मग इतके दिवसात साडी प्रेस करायला, कलर करायला, दागिने बँकेतून काढायला अजिबात वेळ नव्हता का? कि आळशी पणा?

तस नाही ग छबे. मुलाचा प्रोजेक्ट live जाणार होता आणि मुलीची परीक्षा होती. मग त्यांच नको का बघायला? तिला सतत खायला लागत ताज ताज. मुलाला चहा हवा असतो. मग वेळ जातो कि नाही?
कधी बाई दांडी मारते. मग खूप पुरत. मग मी म्हणते राहूदे, जाउदे.

छबी म्हणाली हेच राहूदे, जाऊदे सोड आता. मुलीला नेसायची असती तर करून दिली असती न साडी प्रेस? बरोब्बर वेळेत दागिने काढून आणले असते. हो न? मग स्वतःसाठी तसच कर न.

हो ग छबे पटल बाई तुझ. पण आता काय उपयोग?

परत तेच. 8 च वाजले आहेत. नवऱ्याला पाठव साडी प्रेस करायला. अर्जंट हवी आहे म्हणा. द्या 50रु जास्त. तयार झाली कि मुलाला सांग गाडी काढ म्हणा. बँकेत थांब 10मिनिटं. दागिने काढ. गाडीत बसून घाल आणि सांग त्याला कार्यालयात सोडायला. कळल का? छबी म्हणाली.

आई ए आई काय बडबड करते आहे. सकाळी सकाळी इतकी गाढ झोप लागली का? मुलगा आणि अहो माझ्याकडे विचित्र नजरेने बघत होते.
मी ताडकन उठले कपाट उघडून साडी अहोंना दिली आणि ताबडतोब प्रेस करून आणायला सांगितली. ब्युटीपार्लर वालीला फोन लावला. ताबडतोब ये केसांना कलर करायचा आहे. 200रु जास्त घे.

मुलाला 10:30 ला कार काढून सोडायला सांगितले आणि मी स्वतः भोवती एक छानशी गिरकी घेतली आणि बागेत मोगरा तोडायला गेली.
कांजीवरम वर गजरा हवाच न!!

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »