आता हा विचार मनात आला म्हणजे मी रिकामटेकडी आहे असे नाही बर का!
मग विचार आला घडा म्हणजे डोक ते पण रिकामे असेल तर कस होणार?
रिकामा वेळ ज्याच्याकडे तो सर्वांच्याच नजरेत हास्यास्पद ठरतो.
अरे, तो तर रिकामाच असतो.काहीच करत नाही.
पण आता हा विचार *तिच्या* बाबतीत पण व्हायला लागला.
मुलगी काय करते?
घरीच असते.या *च* चा मला फार राग येतो कारण याचा माझ्याशी पण कुठेतरी संबंध आहे.
मी विचार करायला लागले (वेळ भरपूर होता नं).मग मीच रिकामी आहे हा विचार मनात पिंगा घालायला लागला,चिडचिड व्हायला लागली आणि मी ताडकन उठले.मी रिकामी नाही, स्वतःला ठणकावून सांगितले. पण मग तू काय करते आहेस?
मी कथा लिहीते,कविता करते.हो पण तरी तू बऱ्यापैकी रिकामी असते.पाहुणे हवे तेव्हा तुझ्या घरी येतात. तू त्यांना व्यवस्थित पुण्यात हिंडवते. त्यांच्या आवडीचे खायला करते.नवऱ्याला दिवसातून मागेल तेव्हा चहा देते,मुलीला हव तेव्हा खायला करते,वेळ पडली तर तिला इंजिनिअरिंग चे मँथ्स पण शिकवते,मैत्रिणीच्या मुलीला अर्थशास्त्र पण शिकवते.
मग हे सगळ चांगल आहे कि.......
माशी कुठे शिंकते आहे?
लोक तूला ग्रुहित धरतात आहे याच वाईट वाटत आहे कि अजून काहीतरी मनात खदखदत आहे.
हो !काल कामवाली म्हणाली कि ताई उद्या थोड उशीरा आलं तर चालेल का? शेजारच्या ताईंना घाई आहे, तुम्ही तर घरीच असतात(कदाचित तिला पुढे *रिकाम्या*)हा शब्द म्हणायचा असेल.
मग नवऱ्याला एक मेसेज टाकला.
त्याचा पाच मिनिटांत फोन मी घरी यायला निघतो आहे. तोपर्यंत किशोरकुमार ऐक.
मला कळेना हा आत्ता आँफिस सोडून घरी कशाला येतो आहे.
पाच मिनिटांत ताईचा फोन
काय करते म्हणून.
मी म्हणाले ,"बिझी आहे आत्ता,नंतर बोलते".
उगीचच फुशारक्या मारल्या.
नंतर परत दादाचा फोन.
त्याला ही तेच सांगितले.
दहा मिनिटांनी मुलाचा फोन.
"आई काय करते?"
"अरे तू आत्ता जागा कसा?
झोपला नाहीस?तिकडे रात्रीचे 12 वाजले असतीलनं".मी विचारले.
"असू दे ग,गप्पा मारायला फोन केला".
तेवढ्यात बेल वाजली.
समोर नवरा उभा,"अग काय झालं अचानक तूला?"
"मला काही नाही,मी बरी आहे."मी म्हणाले
"काही नाही?" नवरा आता चिडला होता.
"अग तूझा मेसेज वाच."नवरा म्हणाला.
त्यात काय एवढे?
घरी लवकर या असाच तर मेसेज केला आहे.पण लगेच याल अस नव्हत वाटलं.
"माझे आई नंतरचा मेसेज वाच". नवरा त्याच्या खऱ्या रुपात येत होता.
**मला घनदाट जंगलात हरवल्यासारखेअतिशय एकटे एकटे वाटते आहे, नशिबाने दिलेले दुःखाचे घाव डोंगराएवढे आहे, सुखाचा कवडसा हे स्वप्न उराशी बाळगून मी अंतिम प्रवासाची तयारी करते आहे*
मी तो मेसेज वाचून खो-खो हसायला लागली,
"अरे, माझ्या एका मैत्रिणीला कथेचा शेवट हवा होता म्हणून मी तिला लिहून दिला पण चुकून तो मेसेज तूला गेला.
नवरा मला खाऊ कि गिळू असा पहात होता, तेवढ्यात ताई ,दादा, वहिनी सगळे आले आणि मग मात्र हास्याचे कारंजे उडाले.
माझं रिकामपण तर गेलच आणि आपल्या माणसांची पारखं ही झाली.