ललित लेख : तोडीस तोड

तोडीसतोड


हा विषय वाचल्यावर प्रथम डोळ्यासमोर आले ते कर्ण आणि अर्जुन!

तोडीस तोड! तुल्यबळ असणे म्हणजे दोन्ही योद्धे किंवा विरोधी समसमान असणे. त्यांच्यात हारजीत कोणाची होईल याचा अंदाज न लागणे.
नाहीतर कधी कधी असे होते की दोघांपैकी एक अगदीच लेचापेचा असतो आणि दुसरा एकदम ताकदवर! त्यामुळे कोण जिंकणार हे सहज ओळखता येतं पण तोडीसतोड असणारे प्रतिस्पर्धी शेवटपर्यंत लढतात. म्हणजे नुसतेच शारीरिक दृष्ट्या बरोबरीचे असणे नव्हे तर अजून काहीतरी हवं असतं....

कारण हे अजून काहीतरी खास असते जे तुमची 'जीत' निश्चित करतं.

ती नशिबाची साथ असू शकते, एखाद्या भक्कम व्यक्तीचा आधार असू शकतो किंवा तुमची पूर्वजन्मीची पुण्याई असू शकते जी तुम्हांला तुमच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा काकणभर सरस ठरवते आणि तुम्हांला जिंकून देते.

कर्ण अर्जुन तोडीस तोड होते पण अर्जुन जिंकला कारण सर्वपरमात्मा कृष्ण त्याचे सारथ्य करत होता. कर्णाला मिळालेला शाप आणि बऱ्याच गोष्टी त्याची हार व्हायला कारणीभूत ठरल्या.

तसेच आत्ताचे उदाहरण घेतले तर स्टेफी ग्राफ आणि मोनिका सेलेस एकमेकांच्या तोडीसतोड होत्या पण दुर्दैवाने चाकू हल्ला होऊन सेलेसची उत्तम कारकीर्द संपली. 20 वर्षापर्यंत तिने आठ प्रमुख एकेरी विजेतेपद मिळविले होते.
सारे जग हळहळले. स्टेफी ग्राफ खूप समोर निघून गेली अर्थात ती पण तेवढीच उत्तम खेळाडू होतीच पण मग सेलेस ही उत्कृष्ट होतीच की! काय घडतं नक्की? कधी कधी काही प्रश्नांची उत्तरे नशिबावर सोडायची का?

स्मिता पाटील आणि शबाना आझमी यांचा अभिनय तोडीसतोड होता. एकीला झाकावं आणि दुसरीला काढावं.
उंबरठा, चक्र आणि बाजार मधला स्मिता पाटील यांचा अभिनय जबरदस्त! आज त्या असत्या तर अभिनय क्षेत्रातील कित्येक मानाचे तुरे त्यांच्या शिरपेचात असते. पण.....काळाने त्यांना संधी नाही दिली. दुर्दैवाने त्या अवेळी हे जग सोडून गेल्या.शबाना आझमीची अभिनयाची घोडदौड सुरु राहीली. उत्तम प्रतिस्पर्धी गमावल्याचं दुःख मात्र शबाना आझमींना नक्कीच असेल.
अशा बरीच उदाहरणे देता येतील.

अकबराच्या दरबारात मात्र बिरबलाच्या तोडीसतोड कोणीही नव्हता. बिरबल एकमेवाद्वितीय होता.

तोडीस तोड असणाऱ्या बरोबर स्पर्धा करतांना जाम मजा येते. लहानपण आठवा! आपलीच मैत्रीण 1/2 मार्कांनी पहीला नंबर आणते आणि आपला दुसरा नंबर येतो. तेव्हा वाईट नाही वाटतं कारण तिची मेहनत आपण बघितली असते पण जेव्हा एखादी बुद्दु मुलगी काॅपी करुन पहिली येते तेव्हा मात्र संताप येतो.

तुल्यबळ, तोडीसतोड व्यक्तीकडून झालेली हार काहीतरी शिकवून जाते. त्यांच्या अनूभवातून आपण समृद्ध होत जातो.
खोटारडी, हुशारीचा आव आणणारी व्यक्ती डोक्यात जाते.

थोडक्यात तोडीस तोड, तुल्यबळ माणसं आपल्या आजूबाजूला असतील तर आपलीही नक्कीच प्रगती होते, आपल्याला चांगलं शिकायला मिळतं. फक्त इर्षा, द्वेष न करता उदार मनाने सगळं स्विकारता आलं पाहिजे. नम्र होऊन वावरता आलं पाहिजे.

मग आपणही त्यांच्या तोडीस तोड होऊ शकतो.

वर्षा हेमंत फाटक, पुणे

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »