खेळ!

परवा बाहेर गेले होते. रस्त्याच्या बाजूला दोन मुलं चक्क नाकतोड्याच्या पायाला दोरा बांधून गोल गोल फिरवत होते. मी ओरडले अरे काय करता, सोड त्याला!

बहुतेक मराठी भाषिक नव्हते. पण बाजूला भाजी विकायला बसलेला माणूस म्हणाला कि ताई हे रोजचेच आहे त्यांचे! कधी उंदीर तर कधी पाल! मी आणि मैत्रीण थक्क झालो. मी परत फिरले आणि हिंदी त ओरडले त्याच्यावर!

नाक पुसत, हसत म्हणाला मर गया। मर गया। खेल रहा था उसके साथ!

माझं रक्तच खवळलं! मैत्रिणीला म्हणाले कि याच्याही पायाला दोरखंड बांधते आणि फिरवते यालाही!
ती म्हणाली कि जरा चूप बस न! आजूबाजूला बघ जरा कोणती वस्ती आहे ते!
डोक्यावर पडली आहेस का?

तरी वाटतंच राहिले की मी जर दोन मिनिटे आधी त्या मुलाला थांबवले असते तर? ही अ‍ॅक्शन घेतली असती तर! त्याचा हा खेळ थांबवला असता तर?

नाकतोडा वाचला असता.

आणि घरी आल्यावर टीव्हीवर दिल्ली ची बातमी वाचली! कारमध्ये स्फोट!
हा भयानक खेळ कोण थांबवणार? कधी? कसा?कसचा द्वेष धुमसतो आहे?

आपल्यासाठी खेळ हा आनंदाचा भाग असतो. पण असले खेळ करणारे, ह्या दुष्टांना काय आनंद मिळतो?

जेव्हा कोणी रडीचा डाव खेळायचा तेव्हा आपण त्याला खेळातून बाहेर काढायचो! हाकलून द्यायचो. इथे कोणाकोणाला बाहेर काढणार? कधी हाकलून देणार? सामान्य माणसाच्या जीवाशी सहजपणे खेळणारे नराधम यमसदनाला कधी जाणार?

हा खेळ थांबवायची ताकद कोणात आहे?की खेळ आता हाताबाहेर चालला आहे? खेळणारा मनमानेल तसा खेळणार! जितके जास्त जीव जातील तितका खेळातला आनंद जास्त!

आपणही आता फक्त मूक प्रेक्षकाची भूमिका निभावणार, शांतपणे, तटस्थ वृत्तीने हा खेळ पहात राहाणार आणि मुंबईकरांप्रमाणे आता दिल्लीकरांच्या सहनशीलतेचेही कौतुक करणार!

मृत्युचा खेळ खेळणाऱ्यांना शिक्षा पण मृत्युदंडाचीच हवी ही इच्छा मनात जागत ठेवणार!

वर्षा हेमंत फाटक, पुणे


- Varsha Hemant Phatak
« Prev Share
Likes: 0 Views: 2