कथा : अनुभव


"माझ्यानंतर तुझं कसं होणार ग बाई!"
सुधाकर राव हसत हसत कमलाताईंना म्हणाले.

"माझं काही अडत नाही तुमच्यावाचून, कळल का?" त्या ठसक्यात म्हणाल्या.

"म्हणजे मी वर गेलो तर चालेल का तूला?"

" त्यात न चालण्यासारखं काय आहे? तो देव काय मला विचारुन तुम्हाला नेणार आहे होय? तो कुठे कोणाचं ऐकतो, पाठवेल त्या रेड्याला आणि घेऊन जाईल तुम्हांला!"

" पण मग तूला वाईट नाही वाटणार?"

" हो खुप वाटेल. पण तो रेडा येणारच. त्याला मेल्याला वाईट वाटायला हवं ना आपली ताटातूट करतांना. माझं मेलीच काय घेऊन बसलात! माझ्यासाठी कुठे कोणी वटसावित्रीचे उपवास केले?" त्या मिश्कीलपणे म्हणाल्या.

" यावर्षी मी पण करणार वटसावित्रीचा उपवास"

" कोणासाठी? त्या कॉलेजमधल्या नीलूसाठी? करा हो करा! गचकली ही असेल ती एखादेवेळेस!"

" आता मात्र हद्द झाली हं. मी करणारच वटसावित्रीचा उपवास !" सुधाकरराव चिडून म्हणाले.

" दोन तासात दहादा खाता! उगाचच काहीतरी फॅड! या पोहे खायला!"

" नको आहे मला! तुझ्या तेराव्यालाच खाईन. दे पिशवी आंबे घेऊन येतो"

" घ्या तिथेच जागेवर तर आहे पिशवी. सगळं आयते हवे. मी गेल्यावर कसं होणार कोणास ठाऊक?
"आठ दिवस हाॅस्पिटलमध्ये होते तर घराची वाट लावली. आवरतांना नाकी नऊ आले माझ्या".

सुधाकरराव रागाने उठले आणि पिशवी घेऊन बाहेर पडले.

समोरच गजरेवाला दिसला. त्यांनी जास्त पैसे देऊन एक मोठा गजरा विकत घेतला.

शेपटा लांब ना! तिथेही नवऱ्याला खर्चात पाडा!
ते स्वतःशीच पुटपुटले.

तितक्यात मोबाइल वाजला. पिशवीतून मोबाईल काढतांना त्यांचा अचानक तोल गेला. पडता पडता वाचले ते. पण सावरले कसेबसे!

घेईपर्यंत रिंग बंद झाली. मी गेल्यावर कसं होणार हिचं? पंधरा पंधरा मिनिटांनी फोन करते आणि आव तर झाशीच्या राणीचा आणते.

अर्ध्या तासाने घरी आले तर दारात शेजारचे २/३ जण उभे होते. ते धावतच आत गेले.
कमलताई कॉटवर निचेष्ट पडल्या होत्या.
कमलाताईंना परत हार्ट अ‍ॅटॅक आला होता. डॉक्टरांच्या नजरेत त्यांना सगळं दिसून आलं.

सुधाकरराव हमसून हमसून रडायला लागले.

अग, कितीही सतत मृत्युबद्दल बोलून एकमेकांची मन पक्की केली, मनाची तयारी केली, सतत बोलून बोलून मरणाची भीती घालवली तरी वास्तव खुप वेगळं असत गं! पचायला कठीण!
भीती मरणाची नव्हती ग तुझ्याशिवाय जगायची होती.
तूला नाही समजणार!
तू का आधी गेलीस माझ्या?
पोरकेपणाचा अनुभव मी घेतो आहे.

सुधाकररावही तिथेच कोसळले.

वर्षा हेमंत फाटक, पुणे

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »