काल की परवा एका गायकाने कार्यक्रमात साॉरी कॉन्सर्टमध्ये हाताची नखे कापली, त्याच्याच बरं (रास माहीत नाही) पण हाताची नस कापून घेतल्यासारखी ती बातमी सर्वदूर पसरली. मी ती बातमी वाचली आणि खो खो हसत सूटले. नवरा माझ्याकडे विचित्र नजरेने बघत होता, शेवटी मी त्याला विचारले की नखं कापली का नाहीतर आॅफिसमध्ये मिटींग घेता घेता कापा!! तुमच्या मिटींगला वजन येईल. ती बातमी वाचून नवरा दळण आणायला गेला. माझ्या ट्रोलींगची भीती वाटली असेल.
आत्तापर्यंत गायकांना पाणी पिताना, क्रिकेटपटूंना केळी खाताना बघितले होते पण गायकाला गाणे म्हणतं नखं कापतांना नाही बघितले. मग त्यावर म्हणे तो खूप ट्रोल झाला. काहीतरी विचित्र केल्याशिवाय ट्रोल होतं नाही म्हणे. मी विचार करायला लागले की काय केले म्हणजे ट्रोल होता येईल? हाताने मॅगी खातांना की खाता खाता डोक्यातल्या उवा काढतांना! काय हरकत आहे एका हातात माईक धरायचा (नाहीतरी गाणं तर तोंडानीच /घशातून म्हणतो) आणि दुसऱ्या हातात फणी घेऊन केस विंचरायचे! नखं काढण्यापेक्षा सोप्प!
परवा दोन मुले उंच धबधब्यावरुन उडी मारतांना खाली पडली आणि मेली. एकजण जखमी आहे पण कसा जगेल माहीत नाही. किती अवयव धड असतील? देव जाणे. एका विवाहीतेने तिच्या २आणि ६वर्षाच्या मुलींना पहिले विष पाजले आणि त्या मेल्याची खात्री झाल्यावरच उडी मारून जीव दिला. ही बातमी सीरियसली घेण्यासारखी नाही आहे का? का या गोष्टी त्या माऊलीने सर्वांसमोर करायला होत्या? कदाचित तिच्या दुःखाला वाचा तरी फुटली असती. तीन जीव वाचले असते.
किंवा अशा बातम्या इतक्यांदा वाचतो की त्याच महत्त्वच उरलं नाही, ट्रोल व्हायला काहीतरी वेगळंच करावं लागतं. आत्महत्या ही काॅमन गोष्ट झाली आहे. खूप विवाहीता आत्महत्या करतात, त्यात एवढं काय? पण गातांना गायकाने नखं कापली तर करा चर्चा! नाविन्यतेच कौतुक!
म्हणजे उद्या शंभर टक्के मतदान झालं तर......
मी ट्रोल करणार!!