हकनाक

हकनाक

हकनाक

आज भूशी डॅमच्या अपघातात पाच लोक वाहून गेलेत. कोणीतरी पूर्ण व्हिडिओ बनवला आहे. असो. कितीवेळा तेच तेच बोलायचं? मोबाईलचा उपयोग मदत मागण्यासाठी पण नक्कीच केला असेल हा पण विश्वास मनात कुठेतरी आहे. माणुसकीवरचा विश्वास गमावून कस चालेल? झाडाच्या फांद्या तोडून वाचवण्यासाठी मदत करणारे पण होते, त्यांची धडपड पण दिसत होती. आरडाओरडा, किंचाळ्या सगळं त्या व्हिडिओ त ऐकू येतं आहे.
ते दृश्य हादरवून टाकणारे होते. काय प्रत्येकाची मनस्थिती असेल? आपलं माणूस आपल्या डोळ्यासमोर वाहून जातं आहे आणि आपण काहीच करू शकत नाही. कदाचित अजून 4/5 मिनिटांनी आपणसुद्धा दिसेनासे होऊ. ही कल्पना थरकाप उडवणारी आहे. मागे उरलेल्या, पाण्यात पाय रोवण्याचा प्रयत्न करत उभ्या असलेल्या लोकांना काय वाटल असेल त्या क्षणी? दुःख की भीती? आपणही कदाचित असेच वाहून जाऊ आणि दुर्दैवाने तसेच झाले. ते फार वाईट झालं.
आज पेपरमध्ये फोटो पण आले आहेत.
खरं सांगू मी पण त्या न पाहिलेल्या लोकांसाठी रडले. स्विमिंग शिकतांना नाकातोंडात गेलेले पाणी आणि गुदमरलेला श्वास कसा विसरणार? 3 फूटातून 4 फूटात गेल्यावर काय होतं सुरवातीला, हे पोहण्याची सुरवात करणाऱ्यांना चांगलेच माहित असेल आणि इथे तर राक्षसासारखा अक्राळविक्राळ पाण्याचा प्रवाह! कुठे टिकाव लागणार? नको ते घडलंच.

जुनी माणसं म्हणायची पाण्याला ओढ असते. ती ओढ कालचा व्हिडिओ पाहून समजली.
त्यांचे काय चुकले, कसे चुकले हा भाग अलहिदा!

पण आपण जिवंत असणारी माणसं कोणत्या चूका टाळू शकतो हा धडा नक्कीच मिळेल या भयानक घटनेतून! की परत पुढच्या वर्षी पहिले पाढे पंचावन्न!

सत्यवानाचा जीव वाचवणारी आधूनिक सावित्री म्हणजे सावधानता आहे! सतर्क राहून यमाला आपल्या जवळ येऊ न देणारी! काय घडू शकतं या शक्यतेचा सारासार विचार करणारी आणि मग धाडसी पाऊल उचलणारी! ही सतर्कता नामक सावित्री नक्कीच आपली काळजी घेईल.

पावसाळी सहल ही आपल्या जवळच्या लोकांच्या मनात आनंदाचे दान देणारी असावी, त्यांच्या आयुष्यातील सुखाचे क्षण हिरावून घेणारी नक्कीच नसावी. काळजावर घाव देणारी नसावी.

मृत्यू कधीनाकधी येणारच पण आजकाल पावसाळा आला की त्याची सावली गडद झाल्यासारखी वाटते.

वर्षा हेमंत फाटक, पुणे

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »