गुलाबी शरारा

गुलाबी शरारा

मध्यंतरी सगळीकडे एका गाण्यावर विविध प्रकारच्या रील्स तयार होत होत्या आणि सगळीकडे फिरत होत्या. माझ्या मैत्रिणीला या रिल्स बघायला फारच आवडतं. तिच्यामुळे हे गाणे कळले. चुनरी तेरी..... गुलाबी शरारा!
मुख्य म्हणजे प्रत्येक रील्समध्ये प्रत्येकाला वाटतं होतं की तोच/तीच खूप छान नाचतात आहे. मला तर सर्वांच्या नाचाच्या अ‍ॅक्शन सारख्याच वाटतं होत्या. तिने आम्हाला जवळपास 8/10 रिल्स दाखवल्या त्या गाण्यावरच्या. नवरा-बायको, मित्र - मैत्रीण, आई-मुलगी सर्वांचे रील्स होते. आणि फक्त एका मिनिटांचे किंवा त्याहुन कमी म्हणजे भाजी कशी झाली तर एक कण चव पाहून सांगायची हा प्रकार!
मला वाटलं हे गाणे दोनच ओळींचे आहे. तिने माझी कीव करतं मला पूर्ण गाणे दाखवले.

मी तिला म्हणाले की मी आज नाहीतरी गुलाबी ड्रेसच घातला आहे आणि तुळशी बागेत चालतांना, वाट काढतांना तशाही वेड्यावाकड्याच अ‍ॅक्शन होतात, तू कर रील! जरा वेगळ्या अ‍ॅक्शन दिसतील! तूझा व्हिडिओ फेमस होईल तर ती लगेच तयार झाली आणि..... विचारु नका राव! किती लाईक्स! लोकांनी लोकेशन कुठले म्हणून विचारले तिला!(माॅडेलचे नाव कोणीच नाही विचारलं)
गुलाबी शरारावर इतक्या वेगळ्या आणि सुंदर स्टेप्स कोणी पाहिल्याच नव्हत्या हो!
म्हणजे आम्ही रील करुन, शॉपिंग करून, मिसळ पाव खाईपर्यंत आम्ही फेमस झालो होतो.
नंतर तिचं लक्ष मोबाईलमध्ये होतं, मी शहाण्या मुलीसारखे तिला अच्छा म्हणाले कारण ती आता दुसर्‍या दुनियेत रमली होती.

पण तिला 'अच्छा' म्हणतांना मला अच्छा तो हम चलते हैं हे गाणे आठवले आणि मन अचानक तुलना करायला लागले, गुलाबी शरारा आणि या गाण्याचे!
अच्छा चे प्रत्येक कडवे, ओळ त्या शब्दावर अभिनय आहे.
किसीने देखा तो नहीं तुम्हें आते
नही मै आई हूँ छुपतेछुपाते
देर कर दी बडी
जरा देखो तो घडी
ओहो
मेरी तो घडी बंद है
ते शब्द अप्रतिम! अभिनय लाजवाब! म्हणजे आपण गाणे ऐकतो आणि बघतो पण! आनंद घेतो त्या गाण्याचा!

कवायत नसते त्यात आणि हिडीस, किळसवाणे हावभाव पण नाही. निखळ आनंद मिळतो.

उडा है किसलिए तेरा रंग गोरी
हमारी पकडी गई है देखो चोरी

तिथे उभी असलेली तीन माणसे, त्यांच आशा पारेखकडे बघणे, तिची घाबरल्याची अ‍ॅक्टींग! राजेश खन्नाच्या चेहर्‍यावरचे भाव! सगळ धमाल आहे! दिग्दर्शक कोण आहे आठवत नाहीये.
सिनेमा जरी पाहिला नसेल तरी या गाण्यातून एक गोष्ट समोर येते. ती भावते, समजते.

असेच दुसरे गाणे तेरी रबने बना दी जोडी 'सुहाग' मधले!
गाणे सिनेमातील प्रसंगाला अनुसरून लिहिलेले आहे. प्रत्येक शब्द ऐका आणि त्यावरची या चौघांची एकमेकांना दिलेली प्रतिक्रिया बघा! चेहर्‍यावरील भाव सुंदर! अभिताभ, रेखा, शशीकपूर आणि परवीन बॉबी यांनी कमाल केली आहे. गीतकार, दिग्दर्शक, संगीतकार सगळेच महान!
काही गाणी ऐकायला आवडतात पण काहीच गाणी ऐकायला आणि बघायलाही आवडतात.
माझी ही दोन्ही गाणी खूप आवडती आहे.

सौ वर्षा हेमंत फाटक
11/ 5/2024

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »