चोर चोर

चोर चोर

आज सकाळी पेपरमधे चोरी ची बातमी वाचली आणि ठरवलं आपण अनुभवलेल्या चोर्यांबद्दल लिहायचं.

मी ५/६ वर्षा ची असेन तेव्हा पण तो प्रसंग आत्ता पण मला जसाच्या तसा आठवतो आहे. शेजारच्या काकू कडून दुपारी मी आणि आई घरी आलो, बघतो तर काय! एक चोर दरवाजा उघडायचा प्रयत्न करतो आहे. आम्हाला अचानक पाहून तो घाबरला आणि पळाला. पण नेमके तिथे गुलाबाची ४/५ झाड होती. त्यांत त्यांचा पायजामा अडकला आणि तो जोरात खाली पडला. बाजूला वीट पडली होती. आई कसली भारी! तिने ती वीट उचलली आणि त्याला म्हणाली, ’उठलास तर हीच वीट तुझ्या डोक्यात घालीन‘. आवाज ऐकून आजूबाजूचे लोक आले. त्यांनी चोराला चोप दिला चांगलाच. पोलिस आले. नंतर आईचा फोटो पणआला होता पेपरमधे. लई भारी!!

दुसरा किस्सा बोहारणीचा! एकदा आमच्या कडे बोहारीण आली. आईने तिला नेहमी प्रमाणे जुने कपडे दिले आणि एक छोट्टस पातेल घेतल. एक तास घासाघीस करून. (मी या सगळ्या गोष्टी मिस करते आता) आणि त्या बोहारणीसाठी पाणी आणायला आई आत गेली. मी तिथे च अभ्यास करत बसली होती. त्या बाईने पटकन दोरी वर वाळत टाकलेला माझा नविन फ्राँक घेतला आणि जुन्या कपड्यात लपवला. मी जोरात ओरडून आईला सांगितले तशी ती घाबरली. पण कबूल करायला तयार नव्हती. मग आई तिला म्हणाली कि तुझ भांड परत घे आणि जुन्या कपड्यांचा गठ्ठा इथेच ठेवून जा. ही मात्रा बरोब्बर लागू पडली आणि माझा फ्राँक मला परत मिळाला.

नंतरची आठवण म्हणजे आमच्या घरी एक बाई अंगण झाडायला आणि सडा टाकायला यायची. ती कधीच घरात यायची नाही. बाबा रोज दाराच्या मागे पँट शर्ट लावायचे. मी तिथेच झोपली होती कारण थोडा ताप होता मला. गुगींतच होते मी. पण बघते तर काय हळूच येऊन ती बाई पँट च्या खिशातून पैसे काढत होती. मी बघतच होते पण ओरडण्याच्या ऐवजी मी तोंडावर घट्ट पांघरुण घेतले. अस का केल माहीत नाही. कदाचित ती आपल्याला मारेल की काय अशी भीती वाटली असेल कारण तेव्हा हिंदी सिनेमा पाहायला सुरुवात झाली होती. “सबूत खत्म करना पडता है” अस काही तरी आठवल असेल तेव्हा. पण आईला मात्र ती गेल्यावर लगेच सांगितले. आई ने आणि बाजूला राहणाऱ्या काकू ने त्या बाईला बाय -बाय केल. कारण त्यांच्या कडचे पण पैसे चोरीला गेले होते.

एकदा मी आणि आई-बाबा नेपाळ ला गेलो होतो. मार्केटमधे जातांना बाबांनी मला 100 नेपाळी रु दिले होते. एक लहान मुलगा सतत आमच्या बाजूला होता. भिकारी वाटत होता तो. पण नाही, तसं नव्हतं. आमचा अंदाज चुकला. त्यांने शिताफीने माझ्या पर्समध्ये हात घालून नोटा काढल्या. मी जोरात ओरडले आणि त्याचा हात घट्ट पकडला. तसा हाताला जोरात हिसडा मारुन तो पळाला पण 10 रु नेलेच त्याने.

ही गोष्ट मी सेकंड ईयरला असतांनाची आहे. उन्हाळा होताह कूलर लावला होता. मी, आई आणि ताई हाँलमधे झोपलो होतो आणि रात्री मला दिसल की खिडकीत कोणीतरी उभे आहे. मी हळूच दोघींना उठवल. ताईने लाईट लावला आणि खिडकी जवळ जाऊन बघितलं तर कोणीच नव्हते कारण खिडकी पाशी 7/8 गुलाबाची झाड रांगेत लावलेली होती आणि ते पण काटे असणारे देशी गुलाब. तिथे उभ राहायला जागाच नव्हती. मी मात्र अजूनही आईकडे गेली की हाँलमधे खिडकीकडे डोक करून झोपायचे टाळतेच.

नंतरची आठवण म्हणजे लग्नानंतरची. माझा मुलगा दीड वर्षाचा होता तेव्हाची. आम्ही MP त होतो. छिंदवाड्या जवळ. 2/3 दिवसांपूर्वीच तेथे दरोडा पडला होता. सगळ्यांचीच टरकली होती. त्यामुळे सगळेजण रात्री दार-खिडक्या बंद करून झोपायचो. त्या दिवशी पहाटे माझ्या मुलाला पाणी हव होत म्हणून उठले तर काय खिडक्या खडखड वाजायला लागल्या. अस वाटत होतं कि कोणीतरी खिडकीवर थापा मारतय. २/३ मिनिटे सुरू होत हे सगळ. मी हेमंत ला उठवेपर्यंत आवाज बंद झाले. किती तरी वेळ आम्ही जागे होतो. सकाळी कामवाली आली आणि ती सांगायला लागली कि ‘मँडम कल रात बहुत बड्डा earthquake हुआ न जबलपूर के पास. आज रेडिओ पर बता रहे थे. रात को हम सभी बाहर निकले. घर मे गये ही नहीं! ’कप्पाळ माझ! काय बोलणार? आमच्या काँलनीतल कोणीच बाहेर नाही पडले. त्यामुळे बाहेर चाहूल पण नाही लागली. लाईट नसल्याने TV पण नाही लावला. पण दरोडेखोर नव्हते या विचारानेच हुश्श झाले.

अशी ही चोरी ची गोष्ट इथेच संपवते. तुम्ही पण असेच अनुभव लिहा आणि इतरांना पाठवा.

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »