भंगारवाला

भंगारवाला

बाई, आज सगळं घर मला देता कि काय?

नीलाने चमकून सदूकडे बघितलं.

तो मिस्किलपणे हसतं होता त्यांच्याकडे पाहून!

सद्या, मेल्या मस्करी सुचते रे तुला अशावेळी.
लहानपणी सारखा पाठीत धपाटा घालेन एक!एवढ शिकवल रे तूला पण शेवटी भंगारवाल्याचच काम करतो नं,हात मेल्या हो बाजूला!

सदा हसायला लागला.
त्याला माहित होत बाईंकडच भंगार म्हणजे पुस्तकच असणार. तो ते आनंदाने न्यायचा आणि गरीब मुलांना द्यायचा. सदा घरचा चांगला होता.हाताखाली 6/7 माणसं होती त्याच्या. बंगला होता मोठा.वरती-खालती चार मोठ्या रूम्स होत्या. भंगाराच्या व्यवसायाला त्याने आधुनिक रुप दिले होते.पण बाईंनी बोलावल कि तो स्वतः हाताखालच्या माणसांना घेऊन यायचा.

पण आज बाईंनी भांडी,बादल्या,बंब, टेबल,छत्र्या सगळ काढल होत भंगारात द्यायला. त्याला कळेनास झालं होतं.

घे रे हा कुकरपण!

बाई काय झालं हो?सांगान मला.
योगेश जसा तुमचा मुलगा आहे तसाच माझा मित्र पण आहे,मला सांगाल काय झालं ते?

अरे, तूझा तो मित्र मला मुंबईला त्याच्याकडे राहायला घेऊन चालला आहे, नेहमीसाठी!

मग जा की आनंदाने, एकट्या कुठे राहाता इथे! सदू म्हणाला.

"हो पण तुझ्या मित्राच्या घरात माझ्या सामानाला अजिबात जागा नाही आहे. एकही वस्तू आणू नकोस अशी तंबी दिली आहे त्याने.मला ही ठेवेल कुठेतरी कोपऱ्यात!"
नीला म्हणाली.

सदू काहीच बोलला नाही.
त्याच्या माणसाने सामान गाडीत भरलं आणि घेऊन गेला.

"सदू ,आज आईला भेटायला पाठव रे.एकदा योगेश कडे मुंबईला गेले कि लवकर येण होणार नाही माझं.आज आम्ही दोघीही भरपूर गप्पा मारू,आई इथेच जेवेल.
नक्की पाठव". नीला म्हणाली.

"काकू, आई नाही येणार आता!परवाच मी आईला व्रुद्धाश्रमात सोडून आलो".

नकळत नीलाचे डोळे भरून आले.

घर आणि मन दोन्ही स्वच्छ झाले होते.

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »