कविता : बोलून जातो आपण काही

कविता


*बोलून जातो आपण..*
आणि घडते काही बाही

सूटलेला बाण आणि शब्द
मागे कसे घेता येई।
केली जाते सारवासारव
शब्दांची मग पेरणी होई।
बोलून जातो आपण...
आणि घडते काहीबाही

मन सदा खात राही
पश्चाताप सारखा मनी होई।
का केली आगाऊपणे
बोलायची आपण घाई।
बोलून जातो आपण...
आणि घडते काहीबाही

नव्हता उद्देश चुकीचा
समजवता नाकी नऊ येई।
दिसता दुरावा नजरेत
काळजाचे पाणी होई।
बोलून जातो आपण ...
आणि घडते काहीबाही

गैरसमजाची ती छोटी चूक
दुखवून मित्रा जाई।
वितुष्टाचा मोठा डोंगर मनी
उगाचच आकारा येई।
बोलून जातो आपण...
आणि घडते काहीबाही

बघून समोरच्याचा रागरंग
म्हणा लगेच साॉरीबिरी।
शब्द असले चुकीचे जरी
भावना तर होती खरीखुरी।
बोलून जातो आपण...
आणि घडते काहीबाही

शरीरावरचे व्रण जाती
शब्दांच्या जखमा राहती उरी
शब्द आहेत मोलाचे
जपायचे आहेत घरी - दारी
बोलून जातो आपण...
आणि घडते काहीबाही

वर्षा हेमंत फाटक, पुणे

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »