बिबट्या आणि काल्पनिक संवाद

बिबट्या आणि काल्पनिक संवाद
बिबट्या ए बाळा काय करतोस? ये इकडे! काय उद्योग केलेस रे?

काही नाही बाबा!

अरे मग ते वनविभागाचे कर्मचारी तूला पकडायला का आले आहेत? बाहेर ये बघू!

मी नाही येणार बाहेर! बिबट्या म्हणाला.

अरे ये कोल्हे वकिलांना मी फोन केला आहे. बेल लगेच मिळेल. आत्ता बाहेर नाही आलास तर एन्काऊंटर करतील रे! बाबा बिबट्या काळजीने बोलला.

ओके डॅड!

बिबट्टया मग्रुरीतच बाहेर येतो.

तितक्यात एक वाघीण आतून बाहेर येते.

बिबट्या आई आई करुन तिला चिकटतो.

वनविभागाचे कर्मचारी चकित होतात.
वाघीण शांतपणे म्हणते की त्यांचे इंटरकास्ट मॅरेज आहे. ताडोबाच्या जंगलात ते दोघे भेटले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले.

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना लक्षात येतं की बिबट्याच्या अंगावर काळेपिवळे पट्टे ही आहेत आणि म्हणूनच त्यांच कन्फ्युजन झालं होतं.

ते बिबट्याला पिंजऱ्यात बंद करणार तितक्यात कोल्हे वकील आलेच.

आम्ही नरभक्षक आहोत आणि आमचं ते च खाद्य आहे. तुमच्यातील लोक नाही का शेळ्या मेंढ्या, कोंबड्या मारुन खातात आम्ही कुठे तुमच्यावर खटले भरतो? तसेच आम्ही प्राणी नाही मिळाला तर माणसांवर हल्ला करतो. चूक काहीच नाही यात! इथे आधी घनदाट अरण्य होतं. आता सिमेंटचे जंगल आहे. आम्ही कुठे राहायचे? तुमच्या इथे कितीतरी माणसे अपघातात जीव गमावतात. कोणाला तुम्ही लगेच पकडता? ते तर दारु पिऊन गाडी चालवतात. आम्ही जगण्यासाठी शिकार करतो. आमचं रिझन व्हॅलीड आहे.
कोल्हे वकील ठामपणे चार पायांवर उभे राहात बोलले.

वाघिण बाईंच्या नजरेत कौतुक पाहुन ते भरून पावले होते.

वनविभागाचा चतुर नावाचा कर्मचारी पुढे आला आणि म्हणाला की
इथे मानवाचे नियम चालतात. आम्ही मोठेपणा दाखवून तुम्हांला रो हाउस राहायला दिले कारण तुम्ही करार केला होता की एकाही मनुष्याचा बळी जाणार नाही. पण परवा तुमच्या मुलाने एका म्हातार्‍यावर हल्ला केला.

अहो, तो जीवाला खूप कंटाळला होता म्हणून मी त्याला सोडवले.
बिबट्या लगेच उत्तरला.

आणि काल एका दहा वर्षांच्या मुलावर हल्ला केला. ते का? चतुरने विचारले.

अहो वडिलांनी मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून तसाही तो मुलगा आत्महत्या करणारच होता मग मीच शिकार केली त्याची.
कोल्हे वकील चकीत होऊन बिबट्याचा युक्तिवाद ऐकत होते. त्यांचे आसन डगमगतांना त्यांना दिसतं होतं.

चतुर म्हणाला की लोकांना मुक्ती द्यायला तू काही परमेश्वर नाहीस. तूला शिक्षा ही होणारच.

कोल्हे वकील म्हणाले की तुम्ही आमच्या लोकांची जंगलात येऊन मजा म्हणून शिकार करता, हस्तिदंतासाठी हत्तींना मारता, औषधांसाठी नागाला मारता, घर सजवण्यासाठी तुम्हांला काळवीटाची शिंगे लागतात. किती प्राण्यांना तुम्ही मारता? आम्ही एक दोघां माणसांवर हल्ला केला तर लगेच आम्हांला प्राण्यांना शिक्षा! हा अन्याय आहे.

बिबट्या म्हणाला कि आत्ता जर माझी आई एक पाऊल जरी पुढे आली तरी तुमची सर्वांची पळता भुई थोडी होईल!

चतुर म्हणाला की प्राण्यांचा जीव घेणार्‍या लोकांना आम्ही वनरक्षक विभाग शिक्षा करतो तशीच शिक्षा माणसांचा जीव घेतला म्हणून तूलाही होईल. तुझे सुळे तोडण्यात येतील जेणेकरून तू माणसांवर हल्ला करणार नाही. आम्ही तूला अटक करत आहोत.

म्हणजे वर्षोनुवर्षे माझ्यावर खटला चालेल! मी तयार आहे. मी आरामात जेलमध्ये राहीन. बिबट्या आनंदाने म्हणाला.

तितक्यात एक मोठ्ठा ट्रक स्पीडमध्ये आला आणि वनविभागाच्या गाडीवर मागून जोरात आदळला. बिबटय़ा, चतुर आणि इतर दोन कर्मचारी जागीच ठार झाले, बाजुलाच उभे असलेले कोल्हे वकील गाडीचे चाक अंगावरून गेल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.

वाघीण आणि बाबा बिबट्याने कोणी
बघायच्या आधी त्यांना गुपचूपपणे रो हाऊसच्या मागच्या बाजूला नेऊन टाकले.

चार दिवसांची सोय झाली होती.

वर्षा हेमंत फाटक, पुणे

विषय सौजन्य : शतकोटी रसिक
(काल औंधमधे सकाळी बिबट्या दिसला)


- Varsha Hemant Phatak
« Prev Next » Share
Likes: 0 Views: 57