अनुभव आणि दृष्टीकोन

अनुभव आणि दृष्टीकोन
अनुभव अतिशय व्यापक शब्द आहे. जन्मापासून मरेपर्यंत काहीनाकाही अनुभव प्रत्येकाला येतंच असतात. कधी सुखावणारा तर कधी दुखावणारा! तो अनुभव चांगला किंवा वाईट कसाही असू शकतो पण जेव्हा त्या अनुभवाने आपला दृष्टीकोनच बदलतो तेव्हा मात्र मनुष्य त्यावर मनापासून विचार करायला लागतो.कारण कोणतीच व्यक्ती सहजासहजी स्वतःत बदल करत नाही पण एखादा अनुभव जगणे शिकवून जातो आणि कायमचा लक्षात राहतो.

एखादा छोटासा प्रसंग असतो. सध्याच्या जगात मेसेजेस ला अभिप्राय देणे हा जागतिक पातळीवरचा विषय झाला आहे - -- हा खरंतर अतिशय किरकोळ प्रसंग आहे. पण कोणी त्या प्रसंगाकडे अगदी आणिबाणी लागली आहे या नजरेने बघतो तर कोणी त्या अभिप्रायाकडे शंभरवेळा उपोषणाला बसणाऱ्या माणसाप्रमाणे बघतो, महत्व शुन्य!
मी लिहीले, झाले! माझ्या जवळच्या माणसांना ते आवडले पण लिहीणारी व्यक्ती ज्या माणसांना आयुष्यात कधी बघितलेच नाही त्यांच्याकडून खूप अपेक्षा करत राहते. ती बाई आहे की माणूस हे ही माहित नसतं. दुर्दैवाने हे घडतं आहे सोशल मिडीयावर! आपल्या पिढीचा दृष्टीकोन वेगळा आहे पण नवीन पिढी बळी पडते आहे. अनुभवाची कमतरता! माणसांशी प्रत्यक्ष संपर्कच नाही. एका लाईक्स ने मुली फसतात आहे. स्तुती एवढी स्वस्त झाली आहे का ?

किती लाईक्स आल्या त्याची काळजी!
हर फिक्र को धुएँ मे उडाता चला गया।
पण ही फिक्र उगीचच असेल तर? नाही आले लाईक्स! ठीक आहे.
एखादा आपल्या मेसेजेस ला डावलतो. आपण लगेच पॅनिक मोडमध्ये जातो. रस्त्यावर चालतांना एखादा ओळख दाखवत नाही.कटवतो! आपण दुर्लक्ष करतो. पण सोशल मिडीयावर? छे! सहनशक्ती पणाला लागते. तो जीवावर बेतलेला प्रसंग असतो.

पण प्रत्येकाने हा विचार केला तर किती बरं होईल की आपल्याकडूनही त्या व्यक्तीला असा अनुभव आला आहे का? आपणही असे वाईट अनुभव लोकांना दिले आहेत का? आपणही कोणाला दुखावले आहे का? कोणाला निराश केले आहे का? थोडा विचार केला तर कदाचित आपलाही दृष्टीकोन सुधारेल, व्यापक होईल आणि नाते अजून सुदृढ होईल.
दृष्टीकोन बदला जग बदलेल.

मध्यंतरी हुंडाबळीच्या दोन तीन केसेस घडल्या. बराच उहापोह झाला. मुलींच्या घरच्या पैशावर नजर ठेवणार्‍या नराधमांना शिक्षा व्हायला हवी हे प्रत्येकाचे मत होते पण हुंडा न घेण्याचा दृष्टीकोन बाळगणारे किती जण होते? किती मुली होत्या? ह्या अनुभवातून कोण काय शिकणार? पालक, मुलगी आणि मुलगा ह्या तिघांचा दृष्टीकोन बदलला तरच काहीतरी घडेल पण फक्त हुंडा घेणाऱ्याला (मुलगी मेली तरच! दुर्दैवाने) शिक्षा व्हायला हवी हे पुरेसे नाही आहे. वाईट अनुभव आला कि सगळे जागे होतात तोपर्यंत?
दुसऱ्या अनुभवाची वाट बघायची! अजून एक बळी! दुर्दैवाने असले अनुभव पोकळ असतात.

थोडक्यात अनुभव आणि दृष्टीकोन या अत्यंत नाजूक गोष्टी आहेत. कोण कोणत्या अनुभवातून काय घेईल आणि कसा दृष्टीकोन तयार होईल हे सांगता नाही येणार.

पण कधीतरी वाटतं की अनुभव अगदीच टाकाऊ असला तरी दृष्टीकोन सकारात्मकच हवा!

वर्षा हेमंत फाटक, पुणे
(विषय सौजन्य : शतकोटी रसिक)


- Varsha Hemant Phatak
« Prev Next » Share
Likes: 0 Views: 57