मागच्या आठवड्यात वाई ला जायचा योग आला. थोडासा पाऊस पडला होता. त्यामुळे प्रसन्न वाटत होत. ह्यांनी पण कार जरा हळू चालवायला सुरुवात केली. बाहेर पहात पावसाची मजा घेत आम्ही चाललो होतो. तितक्यात आम्हाला कौलारू घरं दिसली आणि त्या अंगणात मस्तपैकी लालभडक जास्वंद आणि बाजूला गुलाबी कण्हेर गच्च फुलली होती. माझ्या तोंडून उतस्फूर्तपणे निघाल, ’so lucky! एवढी फूले!’ आम्ही (म्हणजे मी) फोटो काढायला खाली उतरले. तेवढ्यात तिथे एकच गलका ऐकू आला. बाई पडली, विहिरीत बाई पडली. सगळी धावाधाव सुरु झाली. बरेच लोक जमा झाले. ते ओरडण्याचे आवाज ऐकून हे पण गाडीतून बाहेर आले. तेवढ्यात पोलिसही आले आणि आम्ही तिथून निघालो.
गाडी जरी समोर जात होती तरी मी मात्र बरेच वर्षे मागे गेली. ही जास्वंद आणि कण्हेर, ती विहीर अस काहीस मी अनुभवल होत, बघितलं होतं.
माझी मैत्रिण सीमा जगताप, घराजवळच राहणारी. एक बसकी चाळ होती. आमच्या काँलनीच्या बाजूला. तिथे एका खोलीत सीमा, तिचे आई-बाबा, 3 लहान बहिणी आणि एक 8/10 महिन्याचा भाऊ असे राहायचे. 3 री पासून आमची मैत्री होती. ती ला कँरम खूप आवडायचा. आम्ही थोडावेळ खेळत नाही तर तिची आई तिला लहान भावाला सांभाळायला बोलवायची. मग मी पण त्याच्याशी खेळायची. बाबा दर शनिवारी आम्हाला दोघींना स्कूटर वरुन शाळेत सोडायचे तेव्हा ती खूप आनंदी असायची. तिचे बाबा रोज दारू पिऊन घरी यायचे आणि तिच्या आईला आणि तिला मारायचे. सीमा ला पण फुलांची खुप आवड होती.
तिने तिच्या दाराच्या बाजूला जास्वंद आणि कण्हेर लावली होती. गणपतीत तिची आई रोज छान छान हार करायची.
काही दिवसांनी मात्र माझ्या आईने मला तिच्या कडे जायचं नाही म्हणून सांगितले. तिला मात्र आई घरी येऊ द्यायची. सीमा ने पण मला तिच्या घरी नंतर कधीच बोलावले नाही. का ते माहित नाही.
पण एक दिवस मी माझं पूस्तक आणायला तिच्याकडे गेले तर बाहेर खूप गर्दी होती. सगळे जण म्हणत होते कि जगताप बाईने विहिरीत रात्री उडी मारली आणि लेकरासोबत जीव दिला. दोघांच प्रेत फुगून वर आल होत. मी समोर जाणार तितक्यात माझी आई आली आणि मला घरी घेऊन गेली.
सीमाची आई गेली आणि तिचा लहान भाऊ पण मेला हे मला कळलं होत. मला खूप वाईट वाटतं होत पण तिला कस भेटायच हे नव्हत माहीत. आज मागे वळून पाहताना वाटत कि खरच तिला तेव्हा माझी गरज भासली असेल का? की लहान बहिणींना आधार देतांना स्वत:ला आधार हवा आहे हेच ती विसरली असेल? नंतर ती दिसली पण नुसतीच हसली, आज तिच हसण आठवल कि माझ्या मनात कालवा कालव होते.
…तेव्हढयात माझ्या मुलीने विचारलं आई ती बाई ok असेल न ग! मी हो म्हणाले आणि कार मधल्या गणपती च्या मूर्ती ला नमस्कार केला.