माझ्या लहान भावाची अमित ची तेरवी होती. माझा भाऊ अचानक किडनी फेल्युवर होऊन दोन दिवसात गेला पण. काहीच कळल नाही कोणाला काय झाल ते. माझी 14 दिवसांपूर्वी डिलिव्हरी झाली होती. सगळेजण बाळाला बघायला इंदोरला येणार होते. अमित तर नंतर राहाणार होता आणि मग त्याच्याच सोबतीने मी माहेरी येणार होती. पण सगळ अस विचित्र घडल होत कि कोणाला काही सूचतच नव्हत.
आम्ही तिघ भावंडं. मी मधली. मला एक मोठा भाऊ नितीन आणि जो वारला तो अमित. लहान असल्यामुळे तो माझा जास्त लाडका. त्याची सगळी गुपित मला ठाऊक असायची. माझ्या लग्नात सगळ्यात जास्त धमाल अमितने केली होती. त्याचा आवाज पण अगदी खर्जातला होता. थोडा घोगरा होता. आम्ही कुठुनही त्याचा आवाज ओळखायचो.
आणि आज माझा लाडका भाऊ या जगात नव्हता. मी त्याच्या शेवटच्या दर्शनाला पण नाही जाऊ शकले. कारण माहेर आंबेजोगाई च आणि सासर इंदोर ला. अंतर खूप होत. माझा मोठा मुलगा ही ४ थी त होता. त्याची पण शाळा बुडली असती म्हणून आम्ही दुसरे बाळंतपण सासरी केल. पण आता मला आई-बाबांना भेटायचच होत. सगळे नाही म्हणत होते पण मला कोणतीतरी गोष्ट ओढत होती. मला आंबेजोगाई ला जायचच होत. मी तेरवीला गेलेच. सगळ्यांचा रोष पत्करून मी माहेरी आले होते.
पूजा संपत आली तशी मला ताई म्हणून हाक ऐकू आली. आम्ही सगळे चमकलोच. कारण हा आवाज अमितचा होता. तोच खर्जातला आवाज!! मी ताडकन उठले आणि बाहेर जाऊन पाहिले तर परत तोच आवाज. ताई! मी वळले तर सगळेजण माझ्या मोठ्या भावाकडे बघत होते. तो मला नेहमीच नावाने हाक मारतो. शुभा अशी. पण आत्ता त्याच्या तोंडून अमित बोलत होता.
ताई कशी आहेस? मला भेटायला आलीस न? बाळाला आण न तुझ्या इथे. मला बघायच आहे त्याला. आई सगळ ऐकत होती. कुठुन तिला धीर आला काय माहित? तिने पटकन बाळाला बाहेर आणल. त्याने बाळाकडे पाहिल आणि माझ्याकडे पाहून आम्ही एकमेकांना करायचो तशी अंगठा वर करून खूण केली. आम्ही सगळे स्तब्ध!!
निःशब्द!!
तेवढ्यात नितीन दादाने त्याच्या नेहमीच्या आवाजात मला हाक मारली शुभा पाणी दे ग. आम्ही सगळेच त्याच्याकडे बघत होतो. त्याला आम्ही काय झाल ते सागितलं पण त्याला काहीही आठवत नव्हत.
5/6 मिनिटात चमत्कार झाला होता. आमची भावा-बहिणीची ओढ अमितला इथे घेऊन आली होती आणि दोघांना/ तिघांना भास होऊ शकतो पण 14/15 लोकांना एकदम तर भास नाही होऊ शकत न? नंतर मला कधीच नाही दिसला तो. पण ते जे घडल ते १००% खर होत. मला आणि माझ्या बाळाला भेटायची ओढ त्याला लागली होती . अजून काय?