एकदा अनिल आणि शाम दोघांची भूत आहे की नाही? तसेच देव आहे की नाही याबद्दल चर्चा सुरू होती आणि शेवटी 100 रु च्या पैजेवर ती चर्चा संपली.
अनिल चा भूताखेतांवर विश्वास होता आणि शाम चा देवावर विश्वास होता. दोघेही एकाच वाड्यात राहायचे त्यामुळे एकमेकांना कळू न देता दोघांनी ही आपापल्या परीने तयारी केली. शनिवारी शाम चे आई बाबा गावाला जाणार आहे हे अनिल ला कळल, त्यांनी ठरवले आज भूत अवतरलच पाहिजे. आज या शामला भूत दाखवायचच. तसाच विचार शामने केला. आज कालीमाता अवतरलीच पाहिजे, मला घाबरवतो का? त्याने पण कालीमातेचा पोशाख, नकली चेहरा, बाहेर आलेली जीभ. सगळं जमवल.
अनिल ने पण भूताचा वेश धारण केला, त्याला माहित होत की शाम खिडकी पाशी पलंगावर झोपतो, अनिल अंगणातून खिडकी पाशी आला आणि त्याच वेळी शाम पण अनिल ला घाबरवायला म्हणून कालीमातेचा वेश घेऊन माजघरातून पडवीत आला आणि खिडकीपाशी भूत पाहून त त प प करायला लागला आणि नेमके तेव्हाच भूताने वर पाहिले आणि साक्षात कालीमाता समोर बघून तो जोरात ओरडला आणि खाली पडला, पण भूताचा आवाज ऐकून कालीमातेला सगळं लक्षात आल. पण बाहेरून आलेले शामचे आईबाबा त्यांच्या घराशी भूत पाहून चक्कर येऊन पडले. आता मात्र कालीमातेची पाँवर संपली होती. त्याने पटापट सगळ्यांना उठवल, अनिल ला आणि आई बाबांना पाणी पाजल आणि शुद्धीवर आणलं.
नंतर भूताचे आणि कालीमातेचे काय हाल झाले असतील ते सूज्ञ वाचकांना कळलच असेल.