आज सकाळी पोळ्या करताना हातावर वाफ आली आणि मी जोरात ओरडले. नवरा आणि मुलगा लगेच धावत आले. सगळे सोपस्कार झाले. बोट दुखत होतच. पेपर आला “रुपकुंवर” ला सती जाऊन 32 वर्ष झालीत. मन विषण्ण झाल. एवढा छोटासा चटका बसला तर मी जोरात ओरडले तर स्वतःला जाळून घेणाऱ्यांना काय होत असेल? आणि तिला तर साक्षात चितेवर ठेवल. जिवंतपणी!! खरच एखादी स्त्री मनापासून तयार होत असेल या गोष्टीसाठी? जीवाचा थरकाप होतो.
मी अस वाचल होत की सती जाणाऱ्या स्री ची हत्ती वरुन मिरवणूक काढायचे. कदाचित तिला जाणवून द्यायला कि ती खूप मोठे कार्य करते आहे ते. तिला जेव्हा चितेवर ठेवायचे तेव्हा उदबत्त्या आणि धूप लावायचे जेणेकरुन जिवंत माणसाच्या जळण्याचा वास लोकांपर्ऱ्यंत जाऊच नये. जोरजोरात ढोल बडवायचे कारण तिचा आवाज कोणापर्ऱ्यंत पोहचूच नये. शेवटच्या क्षणी एखादी चा विचार बदलला ही असेल? कोण ऐकणार होत?
मंजू सारडा केस आणि तंदूर केस सगळ्याना आठवेल.
पद्मावतीची कहाणी तर सर्वांनाच माहित आहे. देहाची विटंबना होऊ नये म्हणून त्यांनी आहूती दिली. कधी कधी वाटत हेच तर कारण हाच तर विचार सती जाणाऱ्या स्त्रिया करत नसतील? आजूबाजूच्या नराधमांपासून स्वतःला वाचवायचा हा एकच मार्ग त्यांना योग्य वाटत असेल. मंजू सारडा केस आठवली की वाटत कोणती स्त्री चितेवर जाते आणि कोणती घरात राँकेल च्या ज्वाळात मरते. मरण सारखच. तर काहीच्या देहाचे तुकडे तंदूर बनवण्याच्या यंत्रात टाकले जातात. आज प्रकर्षांने आगरकर, सावरकर, राजाराम मोहन राय यांची आठवण येते आहे आणि त्यांना सांगावस वाटत कि तुम्ही सती प्रथा बंद केली पण आजच्या राक्षसांनी तिला वेदीवर चढवायचे नविन-नविन मार्ग शोधून काढलेच. परत या. आम्हाला तुमची गरज आहे. 🙏