मोह म्हणजे इच्छा, आसक्ती. एखादी गोष्ट हवीच अशी वाटणारी मनाची अवस्था!
मला आठवत लहान असतांना काश्मीर ला गेलो होतो. हॉटेल च्या रुमवर बाहेरच्या बाजूला सगळीकडे लाल गुलाबाचा वेल पसरला होता. रोज इच्छा व्हायची फुलं तोडायची पण ते चुकीचे आहे हे पण कळायचं. पण एक दिवस आमच्या ट्रिपमधल्या मुलीने 2 फुलं तोडलीच. आला तो माळी धावत पण नंतर रागावून सोडून दिले तिला. तिच्या आईने टूर मँनेजरलाच झापले.
मी आईला सांगितले कि मलाही तोडाविशी वाटली होती ती फुलं,पण तुझ्या धाकाने नाही तोडली मी. आई हसली आणि म्हणाली “नाही तोडलीस न! यातच सगळं आलं. मोहात नाही पडलीस ते बर झालं”
पण आपल्या घरची फुलं तर अग्रवाल काका,त्या येवले काकू रोज तोडतात न, मग त्यांना नाही का मोह?
आई म्हणाली अग ते आपल्याला विचारून तोडतात न! मग चोरी कशी होईल ती?
त्या मुलीने न विचारता फुलं तोडली. म्हणून ती चोरी झाली.
नकळत आईने एक धडा दिला. तो रूजत गेला खोलवर. जी गोष्ट आपली नाही त्याकडे ढुंकूनही बघायच नाही.
मोहाची बहिण म्हणजे मत्सर. या दोघीही हातात हात घालून हिंडत असतात. एखादी गोष्ट मला नाही मिळाली तर मी ती दुसऱ्याला ही मिळू देणार नाही. ही भावना त्यातूनच जन्माला येते आणि मग ओघाने गुन्हेगारीही! असो.
अर्थशास्त्रात ‘सीमांत उपयोगिता सिध्दांत’आहे. एखाद्या गोष्टीचा जसाजसा आपण उपभोग घेत जातो तसतशी तिची उपयोगिता/ महत्त्व कमी होत जातं. एक पैठणी मग दूसरी, मग तिसरी, चौथी.
पहिली पैठणी मग आपण कामवालीला देऊन टाकतो. उपयोगिता शुन्य !
पण याचा अर्थ आपण मोहातून सुटलो का? तर नाही, शेजारणीची कांजीवरम खुणावत असते. ही आपल्या सारख्यांची गत तर ‘नाहीरे’ गटाच काय होत असेल?
मोह हा गुन्ह्याची ‘जननी’ आहे अस मला वाटतं.
इथे आल्यावर माझी एक मैत्रीण माहेरी जातांना नेहमी मला चावी देऊन जायची. तिच्या कडच्या झाडांना पाणी घालायला. पण एक वर्ष आम्ही दोघीही एकदमच माहेरी जाणार होतो. तर तिने नाही दिली चावी इतर कोणाला. मला म्हणाली तू फक्त झाडांना पाणी घालशील आणि चालली जाशील पण इतर जणी घरात फिरतील. इथे तिथे काय आहे ते बघतील मला नाही आवडणार ते.माझा नाही विश्वास इतरांवर!
हा पण एक प्रकारचा मोहच झाला न!लोकांच्या घरात डोकावून पहायचा.
मी माझीच पाठ थोपटली आणि आईला thanks म्हणायला फोन लावला.
एकदा माझी वहिनीऑफिस मधुन अचानक घरीआली तर तिची बाई आरामात तिच्या बेडवर झोपून TV पहात होती. गँसवर मस्त दूधाचा चहा ठेवला होता. नंतर वहिनीने तिला कामावरून काढून टाकले.
गरीबी वाईट असते हेच खरं.
बऱ्याच डाईबेटीस झालेल्या लोकांना गोड खावस वाटतं. हा पण मोहच आहे न!
परस्त्रीच्या मोहापायी रावणाला सगळं गमवावे लागले. ध्रुतराष्ट्राच्या मुलाच्या मोहापायी महाभारत घडले. शंभर मुलं असून शेवटी निपुत्रिक राहिला.
शेवटी काय एखादी गोष्ट करु नये म्हटल कि ती करावीशी वाटणं हा मोह आहे.
अहो, सीतामाईपण या मोहातून सुटली नाही, आपण तर सामान्य माणसे आहोत. कधीतरी मोह हा होणारच फक्त तारतम्याने तो पूर्णत्वास नेला कि सुटलो मोहाच्या तावडीतून!!