लता ही काय भाजी आहे कि काय आहे? तेजस चा पारा चढला होता. त्याने ताट भिरकावून दिले. मालती ताई आतून धावत आल्या आणि लेकाला शांत करायला लागल्या. त्यांना वाटल आता सून पण रडणार पडणार तिला ही सांभाळायला हव. असा विचार करून त्या आत गेल्या तर लता छान पैकी पेपर वाचत वाचत जेवत होती.
मालतीबाई आश्चर्याने तिच्याकडे बघत होत्या. काहीतरी बोलायचं म्हणून त्या तिच्या जवळ गेल्या तर ती म्हणाली, “आई मला समजवण्यापक्षा तुमच्या मुलाला समजावून सांगा कि जे अन्न त्याने सांडवल आहे ते त्यालाच आवरून ठेवायच आहे”. अजून एक धक्का!!
पाटलांची सून अस बोलते. ही तर फक्त 10 वी शिकलेली आणि आपण बीए केल. कोण जास्त शिक्षित?
पण आपण गरीबा घरची लेक आणि हिचा बा दहा गावची जमीनदारी असलेला. फरक तर राहाणारच.
त्यांनी मुकाट्याने फडक घेतल आणि सगळं पुसून काढल.
तेवढ्यात दाजीसाहेब आले आणि त्यांना अस पुसतांना पाहून विचारलं “आज काय भाजीत मिठ कि तिखट काय कमी होत?”
दाखवला वाटतं सूनबाईंना हिसका आमच्या चिरंजीवानी?
आठवत का तुम्ही कशा भेदरल्या होत्या कोकरावाणी!! आम्ही असच ताट फेकून मारल होत तुम्हाला!! आणि हसायला लागले.
मालतीबाई काहीच नाही बोलल्या.
मुलाच लग्न होऊन 8 दिवस पण झाले नव्हते. त्यांना घरात तमाशा नको होता.
रात्री परत सूनबाईंचा आवाज आला. दारु पिऊन रूममधे यायच नाही म्हणून ती दम देत होती नवऱ्याला.
मालतीबाईंना पहिल्याच रात्री गिळलेली ओकारी आठवली. नंतर आयुष्यभर दुःख ही गिळायला शिकल्या. आज सगळं आठवत होत त्यांना.
त्या परत आत जाऊन पडल्या. तितक्यात जोरजोरात आवाज आला. दाजीसाहेब जिन्यावरून गडगडत खाली पडले होते आणि बेशुद्ध झाले होते.
डोक्यावर मार लागला होता. जीभ लुळी पडली होती. ते काय बोलायचे ते फक्त मालतीबाईंनाच समजत होत.
तेजस जोरात ओरडला आई लक्ष कुठे आहे तुझ? बाबा तुला हाक मारतात आहे. नाही रे ते हाक मारणार त्यांच काही अडत नाही माझ्यावाचून. खर तर त्यांना कळल होत कि दाजीसाहेबांना भूक लागली आहे पण त्या नाही गेल्या. आपण दोन दोन दिवस उपाशी राहिलो. काय झालं आपल्याला? मग राहतील कि दाजीसाहेब दोन तास उपाशी आणि त्या स्वतःशीच भेसूर हसल्या.
खोलीत दाजीसाहेब अँ अँ करत जोरजोरात ओरडत होते आणि रेडिओ वर गाण सुरू होत “जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर”.
मालतीबाई शांतपणे वाती वळत होत्या.