देवाचिये व्दारी
विसावु क्षणभरी।
आम्ही प्रवासाला निघालो होतो. थोडा आराम करायला त्या देवळात विसावलो. मुलांच खाण झालं. 4/5 मुलं आजूबाजूला येऊन बघत होती. पण आम्ही दुर्लक्ष केले.
तितक्यात एक माणूस तिथे आला आणि त्याने सुंदर रंगबिरंगी फुगे आणले आणि त्या मुलांना दिले. माझी मुलगी पण धावतच गेली. तर तो माणूस नाही म्हणाला. हिरमुसली होऊन परत आली बिचारी. बाकीची मुल पण तिला आता चिडवायला लागली. फुगे खरच खूप सुंदर होते.
आम्ही रागारागाने निघून गाडीत बसलो. तसा तो माणूस धावत मागे आला आणि हळूच एक फुगा माझ्या लेकीला दिला. बाईसाहेब लगेच हसल्या.
मी म्हणाले तेव्हाच दिला असता तर काय झालं असत?
मँडम बोलू का दोन मिनिटं?
मी या डँमवर सिक्युरिटी गार्ड आहे. तुम्ही शहरातील लोक इथे येता.काही काही खाता पण या मुलांचा विचार करता का? तुम्हाला अस खातांना पाहून ते अजून नाराज होतात.गरीबी वाईट असते ताई. तुम्ही गेले कि ही पोर ती वेफर्स ची पाकिट उलटी करून चाटतात.कोक च्या बाटलीतल्या एकेका थेंबांसाठी भांडतात.
मग मी काय करतो तुमच्या सारखे लोक आले कि त्यांना फुगे देतो. मग जी गोष्ट तुमच्या जवळ नाही ती त्यांच्या जवळ असते. मग त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलतो.मी मुद्दामूनच तुमच्या मुलांना फुगा देत नाही. तुमच्यातले काही महाभाग एका बिस्किटाच्या पुड्यात एक फुगा मागतात. कारण तुम्हाला तुमच्या मुलांचा आनंद हवा असतो.
मला माहित आहे हा क्षणिक आनंद आहे. आभाळच फाटल तर ठिगळं कुठे लावणार?चालायचचं!!
अस म्हणून तो निघाला.
आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिले.प्रवासात मुलांसाठी आणि नातेवाईकांना द्यायला जो खाऊ घेतला होता तो आम्ही त्या मुलांना दिला.
निघतांना माझ्या मुलीजवळ भरपूर फुगे होते. हे सांगणे न लगे.