आनंदाची किल्ली

काल माझ्या मावशीने ७/८ जुने फोटो मोबाईलवर आम्हांला सगळ्या भाच्यांना पाठवले. माझी आई, आजी, सगळ्या मावश्या, बाबा, काका सर्वांचे हसतमुख फोटो पाहून मनात आठवणी दाटून आल्या. आई धरून सहा बहिणी आणि दोन भाऊ. किती मोठी फॅमिली पण सगळे आम्ही अजूनही एकमेकांच्या संपर्कात आहोत.काल आईचा एक फोटो बघितल्यावर जाणवलं की अरे आई अशी पण दिसायची! लहानपणी मजेत जगतांना आईकडे कधी निरखून बघितल्याचं आठवतच नाही. आपण आपल्याच धुंदीत असतो. फोटो पाहिल्यावर डोळे भरून आले.

काल मावशीने फोटो पाठवल्यावर क्षणात विचार चमकून गेला की आपले असे फोटो कोण कोणाला पाठवणार? अर्थात जवळची आठवण काढतीलच पण असा अल्बम मांडीवर घेऊन मायेने हात फिरवत फिरवत कोण फोटो बघणार आणि कोण पाठवणार एकमेकांना?
खरंतर बऱ्याच फोटोंवर सुरकुत्या पडल्या होत्या.
मग ही कोण ती कोण? अरे ही ती आहे! मला वेगळीच वाटली! तू न बधीर आहेस! एवढही ओळखता येत नाही! सगळे एकमेकांना म्हणून झाले, ही 'ती' च आहे की नाही यावर वादावादी झाली आणि परत निर्णयासाठी मावशीला फोन झाला. परत गप्पा झाल्या.

काल मावशीने आम्हाला सगळ्यांना कनेक्ट केलं परत एकमेकांशी! सगळ्या परत जुन्या आठवणीत रमलो.
आनंदाची किल्ली रेखा मावशीने पाठवली होती. आठवणींचे कुलुप उघडल्यावर आनंदाचा खजिना सापडला. किती गप्पा मारल्या, किती आठवणी निघाल्या, कितीतरी जणं विस्मरणात गेली होती. परत जिवंत झालीत! आमच्यापुरती!
फोटोची किमया!

एकतर आता सगळे डिजिटल आणि दुसरे म्हणजे प्रत्येकाला एकच अपत्य! सगळं संकुचित झालं आहे.
फोटो पाठव म्हटले की लिंक पाठवून द्यायची. किती एकमेकांशी जोडलेले असतात माहीती नाही.
अल्बममध्ये फोटो फिजीकली आपल्या हातात असतात. त्यावरून आपला हात फिरला की मनात वेगळीच भावना येते.
ती भावना लॅपटॉपच्या स्क्रीनवर नाही येतं हे खरं आहे. सरकवत जायचे फोटो नुसते! बास!

बरेचजण म्हणतात की अलबम शेवटी धूळखात पडतात , फोटो पण धूसर व्हायला लागतात. होऊ दे. केव्हातरी त्या अलबमवरची धूळ झटकतांना आपल्या ही आठवणींना उजाळा मिळेल. किंबहुना त्या फोटोतली प्रत्येक माणसाच्या आठवणी निघतील आणि एक/दोन तास रम्य आठवणीत जातील.
पण हा विचार मी करते आहे, आपली पिढी अशा अल्बममध्ये रमते आहे. पुढची पिढी रमेल का? का तिथेही फास्ट फास्ट! एक नजर फिरवली की झालं!

मग मनात विचार आला की खुपतं काय आहे? डिजिटल फोटो की आठवण आली म्हणून आपले फोटो एकमेकांना पाठवणारी माणसं कोणीच राहाणार नाही ही वस्तुस्थिती ?

खरंतर एकदा वरती गेल्यावर कोण आपली आठवण काढेल किंवा नाही काय फरक पडणार आहे ?
पण आत्ता जिवंत असतांना तर मी तो अनुभव घेऊ शकते. सोडून गेलेल्या जिवलगांना नक्कीच आठवू शकते.

आज जवळपास १०० फोटो मी प्रिंटसाठी दिले आणि त्याचा सुंदर अलबम करणार आहे. काय सांगावे म्हातारपणी माऊस क्लिक करता येणार नाही पण अलबमची पाने तर नक्कीच पलटवता येतील.

वर्षा हेमंत फाटक, पुणे
रिपोस्ट!


- Varsha Hemant Phatak
« Prev Share
Likes: 0 Views: 2