तू, तुम्ही आणि आपण व्हर्सेस You

तू, तुम्ही आणि आपण व्हर्सेस You
एका मुलीने तिच्या बाबांना ए बाबा! तू असे का करतोस? तूझा बाबा पण असाच वागायचा का तुझ्याशी? असा प्रश्न विचारला आणि तिथे उपस्थित असलेला बाबाचा 'बाबा' खवळला.
काय ग? बापाला ए म्हणून काय हाक मारतेस? तुझ्या बरोबरीचा आहे का तो?
काही मान, बोलायची पद्धत आहे की नाही? आजोबा जरा चिडले होते. आजी मात्र शांत होत्या.

अहो, जमाना बदलला आहे! जरा दुर्लक्ष करा!
ए काय आणि अहो काय? कुठे फरक पडतो? प्रेम तर आहे कायम! नातं थोडीच बदलणार आहे?
आजोबा काही बोलले नाहीत पण त्यांना काही ते पटले नव्हते.

पण खरंच आजची इंग्रजाळलेली पिढी जेव्हा तू म्हणून हाक मारते, वयाचा विचार न करता तेव्हा ते थोडफार खटकतंच!
आपली पिढी वय बघून संबोधायची!
तू, तुम्ही आणि आपण हे शब्द जपून आणि योग्य रीतीने वापरले जायचे.
एखादी आदरणीय व्यक्ती असेल तर नकळतपणे 'आपण' असं कराल का? आपल्याला काय वाटतं? हे शब्द यायचेच.

अर्थात असाही विचार करणारा एक प्रवाह आहे की यामुळे डिस्क्रिमिनेशन निर्माण होतं. मग एकेरी किंवा तू हाक मारली की अपमानास्पद वाटतं. एकाला अरे कारे आणि दुसर्‍याला आपण तापण हे चूकीचेच आहे. त्यापेक्षा You बरा! सर्वजण सारखेच! सर्वसमावेशक!
दोन्ही बाजू योग्यच आहेत पण ते इथे आपल्या देशात नको वाटतं. कुठेतरी आपले संस्कार आड येतातच आणि ते का सोडायचे?

मध्यंतरी एकमेकांना नावाने हाक मारायची फॅशन आली होती. त्यात चूकीचे काहीच नाही पण आमच्या पिढीने स्वतःच्या नवऱ्याला कधी नावाने हाक मारली नाही तर दुसरीच्या नवऱ्याला काय नावाने बोलवणार? तेव्हा भाऊजी, वहीनी, ताई, दादा हे नावासमोर लावून हाक मारायचो.
पण एक मात्र होतं की जी बायको 'अहो' म्हणून हाक मारायची तिचाच नवरा बरोबर मागे वळून बघायचा ! त्या अहोत पॉवर होती.

थोडक्यात सांगायचे म्हणजे आपल्या मराठीत तू, तुम्ही आणि आपण हे तीन शब्द महत्वाचे आहेत. ते You सारखे सर्वांना एकाच तराजूत नाही तोलत तर प्रत्येकाला आदराने वागवतात.तो मान कमवायचा असतो! उगीचच 'आपण' हा शब्द फुकटात मिळत नाही त्यामागे कर्तृत्व असतं ते येरागबाळ्याचे काम नव्हे. अर्थात काही काही वेळेस एखादा माणूस फक्त वयाने मोठा आहे म्हणून त्याला आदरार्थी संबोधायचे हे पण पटतं नाही. शेवटी प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात.

गोष्टी बदलत असतात. बदल हा आवश्यक आहे.
त्यामुळे आता ए बाबा, ए आजोबा ऐकायची सवय करायला हवी कारण पुढची पिढी हा ही प्रश्न विचारणार आहे की ए आई *तू* असं कर आणि ए आजी *तू* असं कर पण 'आजोबा *तुम्ही* असे करा म्हणजे She ला मराठीत मान नाही का? की फक्त He च महत्त्वाचा?
परत He आणि She चा लढा सुरूच राहणार.
की आई जवळची म्हणून ए आई आणि बाबा दूरचा म्हणून' अहो/ओ बाबा'. म्हणजे आदर प्रेमाला दूर लोटतो का? You च बरा की काय?

शेवटी तू, तुम्ही आणि आपण या शब्दांचा प्रयोग कुठे करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे असे म्हणून सोडून द्यायचे का?
आणि शेवटी परक्या You ला सर्वांना एकाच पातळीवर आणून ठेवतो म्हणून डोक्यावर घेऊन नाचायचे का? संबोधन खरंच एवढे महत्त्वाचे आहे का?

कधीतरी वाटतं की हा भाषेचा प्रभाव नाही तर संस्कारांचा आहे जे भाषेच्या हातात हात घालून चालतात पण भाषा बदलली तरी स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात.

वर्षा हेमंत फाटक, पुणे


- Varsha Hemant Phatak
« Prev Next » Share
Likes: 0 Views: 22