आंबाप्रेम

आंबाप्रेम
आजच आंब्याची पेटी आणली आणि तो मधूर वास घरात दरवळला आणि मला भूतकाळात घेऊन गेला.

आम्ही लग्न झाल्यावर २/३ वर्षे मध्यप्रदेशात होतो. तिथे खूप प्रकारचे आंबे मिळतात.
घर अतिशय सुंदर, पुढेमागे अंगण असलेले. अंगणात करवंद, फणस आणि आंब्यांचे झाड होते.

एक दिवस सकाळी उठले तर मंद मंद सुवास आला. अंगणात जाऊन बघते तर आंब्याच्या झाडापाशी तो वास येत होता. थोडं नीट बघितले तर एक पांढरट/पिवळसर तूरा आंब्याच्या झाडावर दिसला. मी खुप खुश झाले. तो आंब्याचा मोहोर होता. मग छंदच लागला. रोज उठून बघायची मी. ३/४ दिवस बाहेर फिरायला जायचे होते तर जीव होत नव्हता त्या झाडाला सोडून जायचा.

घरी आले तर आंबा मस्त मोहरला होता. एक दोन बाळकैऱ्या पण लागल्या होत्या. झाडाची पोपटी पाने आता गडद हिरवी झाली होती. अजूनही कोवळी असलेली काही लुसलुशीत पाने झाडाची शोभा वाढवत होती.

एक दिवस अचानक जोराचा वारा सुटला, अवकाळी होतं. मी मनोमन प्रार्थना केली की त्या कैऱ्या तग धरु दे. पडु नको देऊ.
आणि खरंच वादळ थांबले.

माझ्यासारख्या विर्दभातल्या व्यक्तीसाठी घरी आंबा येणं हे फार मोठे अप्रुप होते. हळूहळू कैऱ्या मोठ्या व्हायला लागल्या. एक दिवस शेजारच्या काकूंनी दोन कैऱ्या मागितल्या. माझा चेहरा बघण्यासारखा झाला होता पण चार कैऱ्या दिल्या त्यांना. एक मात्र घरी देवासमोर ठेवली.
डाळ केली.

आता आंब्याने त्याचा मूळचा रंग सोडून केशरी रंग ल्यायला सुरवात केली होती.
आज हा हिरवा तर कधी तो पिवळा! कधी पानाआड लपायचा तर कधी धीटपणे समोर येऊन मला वेडावून दाखवायचा.
एकदोघांनी तर बाजूच्या फणसाच्या झाडाशी मैत्री केली होती.
दोन सर्वार्थाने भिन्न मित्र गळ्यात गळे घालून गुजगोष्टी करत असल्याचा भास व्हायचा.

फणस एवढा मोठा पण त्याने कधीही त्या आंब्याला बाजूला केले नाही. त्याची जागा सुरक्षित ठेवत प्रेमळपणे फणसही मोठे होत होते.

फणस मात्र मुळापासून लगडलेले होते, सहजपणे हाताला यायचा आणि हा आंबा मात्र सिंहासनावर बसल्या सारखा वरती असायचा. पार मान दुखवायचा!

आणि मग काही दिवसांनी अजून घमघमाट सुटला. लोकांच्या सल्ल्यानुसार आंबे खाली काढले. मस्त पिकले होते.

आम्ही श्रीमंत झालो होतो.

वर्षा हेमंत फाटक, पुणे


- Varsha Hemant Phatak
« Prev Next » Share
Likes: 0 Views: 46