लेख:- स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी साहित्य पुस्तक : मराठी साहित्य : विमर्श आणि विमर्शक लेखक:- डॉ. व. दि. कुलकर्णी (वर्षा हेमंत फाटक


स्वातंत्र्योत्तर काळात साहित्यात बदल होत गेले ते चित्रित झालेला डॉ. व. दि. कुलकर्णी यांचा हा एक अभ्यासपूर्ण लेख आहे. थोर साहित्यिक, समीक्षक डॉ. व. दि. कुलकर्णी यांच्या विचारविमर्शातून साकारला आहे.

स्वातंत्र्योत्तर काळात स्वराज्याचे सुराज्य करताना समाजातील प्रत्येक घटकात बदल झाले तसे वाङमयातही झालेत. ब्रिटिशांच्या सत्ता काळात मुद्रणकला, टपालखाते,रेल्वेखाते,छपाई यात आमुलाग्र बदल झाले आणि मुख्य म्हणजे शाळांमधून इंग्रजी विषय सक्तीचा केला गेला. अप्रत्यक्षरित्या याचा फायदा साहित्य क्षेत्राला झाला.
इंग्रजी भाषा आत्मसात केल्यामुळे पाश्चात्य साहित्याचे नवे दालन खुले झाले होते. शेले, वर्ड्स वर्थ मराठी माणसाला आकर्षित करत होते. साहित्यातील सामाजिक संदर्भ बदलत होते. भारतात तसेच महाराष्ट्रात आधुनिक साहित्याचा उगम झाला. केशवसुतांनी नवविचारांची तुतारी फुंकली तर गोविंद देवलांनी संगीत शारदेसारखे नाटक लिहिले. त्यामुळे बदलाचा प्रारंभ झाला होताच.

डॉ. व. दि. कुलकर्णी यांच्या मते स्वातंत्र्योत्तर काळात नवसाहित्य व नवयुगाची सुरूवात मर्ढेकरांनी केली. मनातील स्वाभाविक विचार किंवा मनाला केंद्रीभूत ठेवून साहित्यनिर्मितीची सुरूवात मर्ढेकरांमुळे झाली. ' सौंदर्य आणि साहित्य ' हे पुस्तक लिहुन साहित्यशास्त्राची विशाल दृष्टी त्यांनी रसिकांना दिली. प्रभाकर पाध्ये,रा.भा.पाटणकर यांसारख्या बिनीच्या लेखकांनी या ग्रथांचे परिशीलन करूनच सौंदर्यशास्त्रातील महत्वाची ग्रंथसंपदा लिहिली.

या पुस्तकात सगळ्याच आकृतीबंधामधे कविता,कथा, एकांकिका, नाटक, लोकनाट्य, चरित्र,ललित यात मनाला भावलेले,मनाला पटणारे,न पटणारे यांचा वेध घेतला आहे . अनेक कवी, साहित्यिक, नाटककार यांच्या साहित्याची ओळख आणि वैशिष्ट्ये यांवर सुंदर उहापोह या लेखात आला आहे. समाजाचा अंतर्वेध आणि साहित्यावर त्याचे उमटणारे सांस्कृतिक, सामाजिक आणि वैचारिक परिणाम यांचा घनिष्ठ संबंध असतो.
डॉ. व. दि. कुलकर्णी यांची प्रतिभा आणि अभ्यासपूर्ण शैली हा लेख वाचतांना जाणवत राहते.

स्वातंत्र्य मिळाले तरी ते पूर्णपणे आनंददायी नव्हते. फाळणीच्या जखमा हृदयात घर करुन होत्या. दुसरे महायुद्ध, रक्तपात या घटना प्रत्येकाला विद्ध करत होत्या.
पृथ्वीची फुलांची परडी
तिरडी झाली..
पांचाली विवस्त्र झाली.....
मर्ढेकरांच्या या ओळी तेव्हाची दारुण, दयनीय समाज अवस्था प्रतित करतात.
मर्ढेकरांची कविता वैश्विक भान जपणारी होती त्यात मोक्षवादाची भावना जवळपास नव्हतीच.
मर्ढेकरांच्या या कविता सामान्य माणसाची तेव्हाची मनोवस्था दर्शविणाऱ्या होत्या.

डाॅ. व. दि. कुलकर्णी यांनी बा. सी. मर्ढेकरां बरोबर विं. दा. करंदीकर यांचाही उल्लेख केला आहे. पु. शि. रेगे, इंदिरा संत, मंगेश पाडगावकर यांनी प्रेम आणि निसर्गरम्य कवितेचा आविष्कार घडवला अर्थात इतर विषयांवरचे काव्य पण अनुचित आणि अर्थपूर्ण होते हा उल्लेख ते आठवणीने करतात. स्वातंत्र्योत्तर काळातील कवितेचे सिंहावलोकन त्यांनी अतिशय उत्तम रीतीने केले आहे.

'माझ्या मना बन दगड' ही करंदीकरांची कविताही
सामाजिक अशांतता आणि अस्वस्थताच दाखवते. स्वातंत्र्यानंतरही समाजात असंतोष होताच.फाळणीचे दुःख ओले होते. जखमा ताज्या होत्या आणि मुख्य म्हणजे स्वातंत्र्य मिळाले की सर्व आलबेल होईल ह्या भावनेला सुरुंग लागला होता. धर्म, जात ही दुफळी विचारवंतांना टोचत होती, साहित्यावरही त्याचा प्रभाव आणि उद्रेक दिसत होता, समाजाचे प्रतिबिंब साहित्यातून उमटत होते. कविता समाजमनाला भिडणाऱ्या होत्या.
पु. शि. रेगे, अनिल,वसंत बापट, शान्ता शेळके, नारायण सुर्वे, बा.भ. बोरकर आणि कुसुमाग्रज ह्या सर्वांनी
समाजाला कवितासन्मुख केले.
वसंत बापट यांनी विं. दा. करंदीकर व मंगेश पाडगावकर यांच्या सोबत कवितेचे वाचन करुन तिला सामान्यांच्या हृदयापर्यंत नेली.

माडगूळकरांचा 'जोगिया', वसंत बापट यांचा 'धारानृत्य' पाडगावकरांचा 'जिप्सी' ज्यात प्रामुख्याने प्रेमाच्या आणि निसर्गाच्या अविष्काराचे चित्र दिसले. मला इथे अजून एका कवितेचा उल्लेख करावासा वाटतो आहे ती म्हणजे वा. रा. कान्त यांची 'नागासाकीचे अंध'. ही दाहक वास्तव दाखवणारी कविता! ही कविता मन विषण्ण करते. थोडक्यात दोन्ही महायुद्धाचे पडसाद कवितेतून उमटत होते.
स्वातंत्र्योत्तर काळात कवितेचा चेहरामोहरा बदलत होता. नवीन साज लेवून ती वेगळ्या रुपात रसिकांना मोहवत होती.

ज्याप्रकारे कविता विविधअंगानी, ढंगाने समोर येत होती त्याचप्रकारे साहित्यातही उलथापालथ होत होती. वैचारिक, सामाजिक आणि राजकीय साहित्य जन्माला येत होते. माडगूळकर, पु. भा. भावे, कुसुमवती देशपांडे, गो. नी. दांडेकर, दुर्गाबाई भागवत, जी. ए. कुलकर्णी यांच्या कथांचा एक वेगळा बाज वाचकांना आकर्षित करत होता. साहित्यात नविन परंपरेचा पायंडा पडला होता , कथाकारांची नवीन पिढी जन्माला येत होती. युद्धकथा आणि देशभक्तीपर कथाही उत्स्फूर्ततेने साकारत होत्या. विज्ञाननिष्ठ, तत्त्वज्ञान, तार्किक विषयांवर कथा, लघुकथा निर्माण होत होत्या.
कथेचे नवे नवे आयाम आकारास येत होते. कल्पनेला पंख फुटून ही नवकथा अधिक व्यापक, अधिक गुंतागुंतीची, अनेक भावना प्रगट करणारी होती.

व. दि. कुलकर्णी यांच्या निरीक्षणानुसार १९४८ ते १९६० हा कालखंड मराठी कथा - कवितेचा काळ होता इथे कादंबरी हा प्रकार थोडासा मागे पडला होता.
अर्थात रणजित देसाई, ना. स. इनामदार यांच्या ऐतिहासिक कादंबर्‍या वाचकांना आकर्षित करत होत्या.
दुर्दम्य आणि आनंदी - गोपाळ या कादंबरीचा उल्लेख करावाच लागेल.
असीम इच्छाशक्ती असलेल्या या दोन्ही व्यक्तींचे चरित्र पुढील पिढीसाठी आदर्श असेच होते.
साहित्य हे नुसतेच मनोरंजनाचे साधन नसून त्यातून घेण्यासारखे, शिकण्यासारखे बरेच काही असते. देशाच्या स्वातंत्र्याबरोबर साहित्यिकांचे विचार, ललित निबंधाचा आकार, स्फुट लेखन यातही परिवर्तन घडत गेले.

स्वातंत्र्योत्तर काळात स्त्री वर्गाशी संबंधित असलेल्या बऱ्याच वाईट प्रथांवर कोरडे ओढले गेले. अन्यायाचे, पुरुषी वर्चस्वाचे पडसाद कथांमधून साकारले जाऊ लागले. कुठेतरी साहित्यातही समाजमनाचे, समस्येचे विवेचन व्हायला लागले. नवजाणीवा देणाऱ्या कथांना एक आयाम अरविंद गोखले यांनी दिला. साहित्यिकांनी लघुकथा आणि मनोविश्लेषणावर भर दिला.
ना. सी. फडके, खांडेकर यांची तंत्रनिष्ठता त्या काळात टीकेचा विषय झाली होती. कथेला कथेचे अंग असावे, तंत्रशुद्धता महत्त्वाची नाही हा एक विचार पुढे येत होता. वास्तव जीवनाचे चटके तर कधी कल्पनेतील रम्य जगणे यावर साहित्यिक व्यक्त होत होते. निरनिराळ्या कल्पनांनी, आशयांनी मराठी साहित्य समृद्ध होतं होते. साहित्याची नवीन दालने उघडत होती. वाचक सूजाण होत होता. नवनिर्मिती साहित्याला सर्वांगांनी स्पर्श करत होती.
काही साहित्यिकांच्या निर्मितीत स्वप्नरंजन,कल्पनाविलास, भडकपणा आणि काहीशी कृत्रिमता होती तर काही साहित्यिक हे अनुभवांना डोळसपणे शब्दबद्ध करत होते. समाजातील जळजळीत वास्तव शब्दांच्या फटकाऱ्यात सामोरे येत होते. समाजमनाचा आरसा त्यांच्या साहित्यातून प्रतिबिंबित होत होता.
दलित साहित्याच्याही मनोभूमिकेचे दर्शन होत होते. नामदेव ढसाळ आणि भालचंद्र नेमाडे प्रसिद्धीस येत होते.

मराठी नाटकेही कात टाकत होती. समाज ढवळून निघत होता. शृंगारिक नाटकांचे पेव फुटले होते.
अर्थात इतिहास, सामाजिक आशय असणारी नाटकेही प्रेक्षकांना आपलीशी वाटत होती. तेंडुलकरांचे 'घाशीराम कोतवाल' , 'गिधाडे' तर चिं. त्र्य. खानोलकर यांची 'एक शुन्य बाजीराव' आणि 'अवध्य' ही नाटके आगळीवेगळी होती. समाज मनाची पकड घेत होती. 'जय जय गौरीशंकर' , 'कट्यार काळजात घुसली' ही संगीत नाटके प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत होती. लोकनाट्य ही बाळसे धरु लागले होते. सामाजिक आशयाचे भान जपणारी लोकनाट्य एक प्रभावी संदेश देत होती.

डाॅ. व. दि. कुलकर्णी यांच्या मते नवीन लेखकांच्या पिढीत वाडःमयीन उद्रेक जास्त जाणवतो. पण त्यांच्या मते स्वातंत्र्योत्तर काळात आर्थिक विषमता, भेदभाव, नव उत्पादक श्रीमंत वर्ग, सामाजिक परिवर्तन या घटकांवर विविध तऱ्हेचे साहित्य निर्माण होणे आवश्यक होते पण तसे झाले नाही.
डॉ. व. दि. कुलकर्णी यांना प्रकर्षांने जाणवलेली गोष्ट म्हणजे तरुण पिढी ही मराठी साहित्याबाबत उदासिन आहे, साहित्यापासून फारकत घेते आहे आणि मराठी भाषेसाठी ही अत्यंत खेदाची बाब आहे.

वर्षा हेमंत फाटक, पुणे
9850959480

- Varsha Hemant Phatak





« Prev