पडू आजारी मौज ही वाटे भारी....
आई असतांना या सर्व गोष्टींची मजा होती. मुख्य म्हणजे एक दिवस का होईना शाळेला बुट्टी मारता यायची. सर्दी, खोकला झाला की एखादा काढा प्यायला की बरं वाटायचं. ताप वगैरे आला की डाॅ. काण्यांकडे जाऊन औषधं आणायचे की एका दिवसात बरे व्हायचो. आजारपण ही सोप होत खूप कटकटी नव्हत्या. कधी आजारपण खूप लांबले आहे आणि खूप खर्च आला आहे असं ही नव्हते. पण या 15/20 वर्षांत सर्व बदलले. आजारपणाने पण कात टाकली, चांगलीच!
करोनाची लाट आल्यावर तर आजारपण हे एका समारंभासारखे झाले आहे कारण त्या हॉस्पिटलच्या बिलात एक साखरपुडा तर नक्कीच होईल.
आमच्या एका ओळखीच्या नातेवाईकाला करोना झाला. त्यांचे वय जवळपास ऐंशी होते. करोना टेस्ट पाॅझिटीव आली. डॉ नी एकलाखाचे पॅकेज सांगितले. ते नातेवाईक नाही म्हणाले. मी अजून जगून काय करु? कशाला एक लाख खर्च करायचे?
मग डॉ नी विचारले की तुम्ही किती खर्च करु शकता?
ते नातेवाईक म्हणाले की फक्त पंधरा हजार आहेत.
डॉ म्हणाले की या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जा आणि उपचार घ्या. तुम्हांला नक्की बरे वाटेल.
मरता क्या न करता?
ते तिथे गेले, पंधरा हजार भरले आणि पाचव्या दिवशी टुणटुणीत होऊन घरी आले.
काय बोलायचे सांगा?
एक डेंटिस्ट दाढेच्या रुट कॅनलचे पंधरा हजार सांगतो तर एक जण आठ हजार! मान्य आहे कॅपची क्वालिटी वेगवेगळी असेल पण इतका फरक बिलात?
काय समजायचे आपण? फक्त क्रेडिट कार्ड स्वाईप करायचे! बस! बरं दातदुखीपेक्षा मरण परवडले अशी स्थिती असते त्यामुळे पिटुकल्या दाताचे नखरे हजार! इन्शुरन्स कंपनी पण या दाताकडे कानाडोळा करते. असो बापडा! आलीय भोगासी!
सध्या हेल्थ इन्शुरन्समुळे तर आनंदीआनंद झाला आहे. अर्थात मोठ आजारपण आले तर फायदा होतोच. इन्शुरन्स महत्त्वाचाच! 100%!! पण ज्याच्याकडे नाही त्याची मात्र वाट लागते. सगळा खिसा रिकामा होतो. अक्षरशः एका आजारपणात लोकांची अख्खी जीवनपुंजी जाते. गरीबाला आजारपण परवडणारे नाहीच हा आता श्रीमंतांचा खेळ झाला आहे.
मी एकदा एका डेंटिस्ट ना विचारले की एवढाली फी एखाद्या गरीब पेशंटला परवडेल का? तो देऊ शकेल का?
ते म्हणाले की अजून तरी माझ्याकडे दात दुखतो म्हणून एकही गरीब पेशंट आलेला नाही किंवा कदाचित ते सरकारी हास्पिटलमध्ये जात असतील.
गरीबी माणसाला व्यवहारी आणि हुशार बनवते.
कोणत्या हॉस्पिटलमध्ये होतीस? हा एक प्रेस्टीज पॉईंट झाला आहे.
मिरवण्यात आता साडी आणि दागिन्यांनंतर दुर्दैवाने हॉस्पिटलचा नंबर लागतो.
माझ्या ओळखीच्यात एक जण अॅडमिट होते. ते अचानक पोटात दुखायला लागलं म्हणून हॉस्पिटलमध्ये गेले. पॉश हॉस्पिटल होत. 5 स्टारच्या थोबाडीत मारेल असे! सुरुवातीला एका डाॅक्टरने मोठ्ठी औषधाची लिस्ट दिली. 10/12 हजार झाले. ती आणली मग वरच्या मजल्यावर खोलीत जागा मिळाली परत तिथे दुसर्या डाॅक्टरने अजून एक लिस्ट दिली ती औषधे बारातेरा हजारांची झाली. आधीची पण तशीच! काय करणार 5स्टार हॉस्पिटल!
मग त्यांची मुलगी आली तिने सरळ मुख्य डॉ कडे तक्रार केली या सगळ्याबद्दल! फक्त 5/6 हजारांची औषधं आवश्यक होती. तिला फार्मसीमधून पैसे परत मिळाले कारण ती फार्मसी हॉस्पिटलचीच होती!! म्हणजे किती अलर्ट राहायचे?लक्षात नसते आले तर? पण परत आजारी पडल्यावर तिथेच गेले.
हौसेला मोल नाही हेचं खरं! समाजातील पतही महत्त्वाची!!
करोनाच्या वेळी एक औषध मिळत नव्हते तर बऱ्याच जणांनी ते ओळखीच्या संपर्कातून 10/15 हजार जास्त देऊन मिळवले आणि नंतर बरेच दिवसांनी समजले की त्याची गरजच नव्हती. कप्पाळ! म्हणजे पैशापरी पैसा गेला आणि विकतचं दुखणे!
थोडक्यात सध्याच्या काळात एखादा तरी विश्वासातील डॉक्टर ओळखीचा असणे गरजेचे आहे आणि ज्याप्रकारे मुलांच्या लग्नासाठी पैसे साठवून ठेवतो त्यापेक्षा आवश्यक स्वतःच्या तब्येतीला महत्त्व देऊन उपचारासाठी पैसे साठवणे आवश्यक झाले आहे.
नाहीतर पडू आजारी खिशाला कात्री भारी हे समीकरण खरं ठरणार!