ट्यूनिंग...


नलिनी ने अजेयकडे बघितले आणि त्याने मान डोलावली.
बागेत जाऊन दोन कढीपत्याच्या काड्या घेऊन आला आणि ओट्यावर ठेवल्या.

दहा मिनिटांनी परत किचनमध्ये आला, नलिनी ने उपम्याला एक दणकून वाफ आणली होती आणि उपम्याचा घमघमाट सुटला होता. लगेच त्याने टेबलवर तीन पाण्याचे ग्लास आणि ताटल्या, चमचे आणून ठेवले.

निखिलने पुस्तक बाजूला ठेवलं आणि तो पण टेबलवर खायला येऊन बसला.

निखिल दुबई ला नोकरी करत होता. प्रचंड हुशार! एकुलता एक! आल्यापासून तो बघत होता की त्याचे आईबाबा न बोलता बरोबर एकमेकांना मदत करत होते. आईने टेबलवर बसून लिस्ट करायला घेतली की बाबा बरोबर कपाटातून दोन पिशव्या काढायचे. पाकीट घेतलं की निघायचे, फाटकाचा आवाज आला की आई लगेच सामान घ्यायला जायची! त्याला आश्चर्य वाटतं होतं त्या दोघांचे ट्यूनिंग पाहून! तो पण संभ्रमात पडला होता.

न बोलताही दोघे एकमेकांना जाणून घेत होते. हे त्याच्यासाठी फारच नवीन होते. तू तू मी मी करणारी आपली पिढी! किती खोटा खोटा अहंकार जोपासते. समर्पण म्हणजे काय ते यांच्याकडून शिकावे.
आई अर्थार्जन करतं नव्हती यात तिला कधी कमीपणा वाटला नाही आणि बाबांनी ही त्यांच्या नोकरीचा टेंभा कधी मिरवला नाही. संसारात दोघेही एकमेकांचा मान राखून होते.

त्याला एकदम अनघाची आठवण आली. ते दोघे वेगवेगळे राहात होते मागच्या महिन्यापासून! खरंतर हे सांगायलाच तो भारतात आला होता. काहीतरी चुकतंय का?माझंही?

त्याला अनघाची परत परत आठवण येत होती.तीव्रतेने! तितक्यात मोबाइलची रिंग वाजली. तो पटकन एका ओढीने उठला, अनघाच होती.

दोन क्षण शांततेत गेले.

कसा आहेस?

ठीक आहे.

आई - बाबा?

ते पण ठीक आहे.

त्यांना नाही सांगितले मी अजून काही!

मी पण तूला तेच सांगायला फोन केला होता, आपण विचार करुयात का?

हो
मलाही तेच म्हणायचे होते.

कधी येतो आहेस?

हा काय उद्याच!

लब्बाड आहेस! असं म्हणत
तिकडून अनघाचा खळखळून हसण्याचा आवाज आला आणि तो सुखावून गेला.

ह्यालाच ट्यूनिंग म्हणतात का?

वर्षा हेमंत फाटक, पुणे

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »