मैत्रीने शिकवलेले कटू काही.....


मैत्री आणि कटू हे समीकरण पचनी पडायला जरा कठीण आहे. कारण मला वाटतं मैत्री ही गोड किंवा जास्तीत जास्त खारट, आंबट असते पण कडू नसते किंवा नसावी. अर्थात प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे!
प्रत्येकाची मैत्रीची कल्पना ही वेगळी असते. कोणासाठी मैत्री म्हणजे सर्व काही!
मित्र म्हणाला तसे वागायचे! हवी ती मदत करायची तयारी मैत्रीत असते. मग जान गेली तरी बेहतर! अर्थात अशी मैत्री मिळायला भाग्य लागतं. पण मिळते. त्यासाठी स्वतःतही बरेच बदल करावे लागतात.
मुख्य म्हणजे अपेक्षा करणे सोडून द्यावे. मग तुम्ही म्हणाल त्या मैत्रीला काय अर्थ उरला?
पण खरी मैत्री या अपेक्षांच्या ओझ्याने वाकली नसतेच मुळी तर ती हे ओझे हलके करते. अडचण दिसताक्षणी मैत्रीचा हात पुढे येतो आणि अपार आनंदाचे आपण धनी होतो. सुखाचा निर्झर वाहू लागतो. कधी कधी गालबोट ही लागतं या मैत्रीला पण दोन्ही बाजूंनी खरी मैत्री असेल आणि ती टिकवायची मनापासून इच्छा असेल तर मैत्रीची गाडी रुळावर येते आणि अजून सुसाट धावायला लागते.

माणसाच्या वैयक्तिक, सामूहिक जीवनात मैत्रीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मैत्री जपणं ही अर्थातच एक नाजूक गोष्ट आहे. विचार, संस्कार, आर्थिक परिस्थिती, स्वभाव या गोष्टींचा जसा मैत्रीचा पूल बांधण्यात सहभाग असतो तसाच मैत्रीला तडा जायलाही याच गोष्टी कारणीभूत ठरतात पण यावर मात करुन जो मैत्रीच्या मुक्कामी पोहचतो तो जिंकतो. सुखद मैत्र कमावतो आणि आयुष्याभर सुखी होतो. तिथे कटू असे काहीच नसते.

एक अनुभव सांगते. आमची एका जोडप्याशी नवीन नवीन ओळख झाली होती. एक दोनदा घरी पण भेटलो होतो पण खूपही अशी जवळीक निर्माण झाली नव्हती. एक दिवस मला अचानक सकाळी तिच्या नवर्‍याचा फोन आला की तिचे वडील भारतात हार्ट अ‍ॅटॅक ने गेले आणि त्याला आॅफिसमध्ये जाऊन काही फाॅरमॅलिटीज पूर्ण करायच्या होत्या. मी लगेच तिच्याघरी गेले. आपले जे संस्कार असतात त्याप्रमाणे तिला दोन्ही वेळेला जेवायला नेऊन दिले. सतत रडत होती. तिला समोर बसून खायला घातले. दुपारी आम्ही थोड्यावेळ बोर्ड गेम खेळलो. काय करणार तिचं मन रमवणे भाग होते. तिच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. खरंतर आम्हांला ही फार वाईट वाटतं होतं. दुर्दैवाने त्यांचा व्हिसा यायला दोन दिवस वेळ लागला. मग मी तिला घरी बोलावले, संध्याकाळी तिचा नवरा घरी आल्यावर मग दोघेही आमच्याकडे यायचे, काहीतरी खाऊन घरी जायचे. दोन दिवसात आमची छान मैत्री झाली. दोन दिवसांनी ते दोघे दिल्लीला गेले.
पण मला तेव्हा धक्का बसला जेव्हा तिच्या आईचा मला भारतातून फोन आला की आपने मेरी बेटी के लिये बहुत कुछ किया। आज के जमाने में कोई किसीकी इतनी मदद नही करता! बहुत बहुत धन्यवाद!

मी म्हणाले की ये तो सब लोग करते है। मैनें ज्यादा कुछ नहीं किया।

तरी पण दहा वेळा माझे आभार मानले. मलाच कानकोंडे झाले.

आणि नंतर जेव्हा मला माझ्या मुलीच्या वेळी प्रेग्नंसीत त्रास झाला तेव्हा ही मैत्रीण रोज सकाळी ब्रेकफास्टला काही तरी घेऊन यायची आणि मला प्रेमाने खायला घालायची. मी फक्त दोन दिवस तिला मदत केली होती पण तिने ती लक्षात ठेवली आणि माझा त्रास कमी होइपर्यंत रोज काहीतरी वेगळं खायला घेऊन यायची. आपली कोणीतरी काळजी करतं आहे हीच भावना महत्वाची असते.
अशीच मैत्री बहरते.
मी या बाबतीत खरंच नशिबवान आहे.

हिंदी सिनेमातील जय-वीरुची मैत्री म्हणजे माइलस्टोन आहे. हिंदी सिनेमात मैत्रीसाठी प्रेमी किंवा प्रेमिका कुर्बान करणारे महानुभव पाहिले की मात्र आश्चर्य वाटतं. (संगम, साजन)
मैत्री श्रेष्ठ की प्रेम हा वादाचा मुद्दा होऊ शकतो त्यामुळे जास्त नाही बोलतं यावर!

मैत्रीत कटू अनुभव नक्कीच येत असतील ते प्रत्येक नात्यातच येतात पण मग तेव्हा ती खरी मैत्रीच नव्हती असे म्हणून सोडून द्यायचे कारण खरी मैत्री ही गोड असते, जपणारी असते.

वर्षा हेमंत फाटक, पुणे

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »