*साचा आणि मूर्ती*
शतकोटी रसिक : मराठी गौरवपर्व
हे दोन शब्द वाचल्यावर माझ्या समोर श्रीदेवी भागवतातील अश्विनीकुमार, च्यवनऋषी आणि त्यांची पत्नी सुकन्या ह्या तिघांची कथा उभी राहिली.
अश्विनीकुमार तर हे एका साच्यातून काढल्यासारखे होते पण ते जेव्हा सुकन्येच्या अभिलाषेपायी च्यवनऋषींना पण त्या दोघांसारखेच रूप आणि आवाज देतात आणि सुकन्येच्या पातिव्रत्याची परीक्षा घेतात तेव्हा ती देवीच्या आशिर्वादाने नदीतून एकसारखे रुप घेऊन बाहेर आलेल्या तिघांमधून च्यवनऋषींना म्हणजे तिच्या पतीला बरोबर ओळखते.
तात्पर्य काय साचा हे बाह्य रुप आहे अंतरंगातील मूर्तीला ओळखायला अंतःकरणातील प्रेरणाच कामी येते.
एकदा आम्ही साताऱ्याला जातं होतो तेव्हा रस्त्याच्या कडेला पालं होती तिथे ती बाई त्या साच्यात चून्याचे आणि रंगाचे पाणी ओतायची, अशा कितीतरी कृष्णाच्या एकसारख्या दिसणाऱ्या मूर्त्या तिथे उभ्या होत्या. ज्याचे रंग अगणित होते त्याला एका साच्यात घालून त्या बाईने कमाल केली होती.
अर्थात तिने केलेला साचा इतका सुरेख होता की तो मनमोहन स्मित हास्य चेहर्यावर ठेवूनच जन्माला येतं होता.
त्या मूर्त्या तयार झाल्या की तो साचा बिचारा दुर्लक्षित हौऊन बाजूला पडला होता.
शेवटी मूर्ती हाती आल्यावर साचा काय कामाचा?
दुनियेचा नियम तिथेही लागू होता : काम झालं की तुमचं महत्त्व संपलं. असो.
गणपती उत्सवाच्या वेळी पण एकाच साच्यातून निघालेले एकसारखेच गणपती आपण बघतोच फक्त रंग वेगवेगळे असतात. ढाचा एकच! पण आपला भाव महत्वाचा असतो.
म्हणजे साचा, मूर्ती आणि भाव(मनातला) एकमेकांशी निगडित आहे का? तर मला वाटतं आहे. कारण भाव एक झाला की ती मूर्ती आपलीशी वाटायला लागते. कितीतरी भक्त भगवंताच्या मूर्तीसमोर बसून बोलतांना दिसतात. ते सामान्य माणसासाठी मात्र अगम्य आहे.
(गणपतीच्या मुर्त्यांचे भाव वाढले आहेत हे पण आपण ऐकतो.तो हा भाव नाही.)
मूर्तीकार मूर्ती बनवतो तेव्हा फक्त एकच मूर्ती बनवतो. छिन्नी, हातोडा घेऊन त्याला हवे तसे भाव आणि आकार येईपर्यंत. पण मला वाटतं साचा या गोष्टीचा शोध लागल्यावर त्याची कला थोडी दुर्लक्षित झाली असेल का?
ज्या मूर्तीला तयार करायला कित्येक महिने लागायचे ती मूर्ती एका साच्यातून लगेच जर तयार होतं असेल तर मग कौशल्याचं मोल काय राहील? हा प्रश्न मनात उद्भवतोचं.
जुळी मुले ही कधी कधी एकाच साच्यातून काढल्यासारखी दिसतात.
खरंच साचा आणि मूर्ती विचार केला तर साच्यातून कितीही एकसारख्या मूर्त्या काढा जोपर्यंत ती मूर्ती समोरच्याचा मनाचा ठाव घेत नाही तोपर्यंत तिचे महत्व शुन्य आहे.
सुंदर मूर्ती निर्माण व्हायला साचाही सुंदरच असायला हवा.
पण मनात विचार येतोच की आपल्यासारख्या करोडो सजीव मुर्त्यांना बनवणारा तो मूर्तीकार असा कोणता साचा वापरतं असेल की त्याची प्रत्येक मूर्ती वेगळी दिसते? डोक्याला मुंग्या येतात? मग साच्याचे महत्त्व काय उरले?
आणि मुख्य म्हणजे त्याच्यासारखं मूर्तीत जीव ओतायची किमया त्याची मूर्ती बनवणाऱ्या माणसाला कधी साधेल का?
की फक्त आपण साचा आणि मूर्ती हा च खेळ खेळत राहणारं आणि तो वर बसून त्यात सुखदुःखाचे मिश्रण ओतत राहणार, कधी कमी तर कधी जास्त आणि
मूर्ती तडकते, भंगते की एकसंघ राहते याची परीक्षा घेत मजा बघणार.