भय इथले.... तालिबानी सावट : प्रत्यक्ष अनुभव लेखक : आतिवास सविता


अफगानिस्तान या देशाबद्दल प्रत्येकाला थोडी उत्सुकता, थोडी भीती आहे. खासकरून तिथे राहणाऱ्या लोकांबद्दल! इतक्यात अफगाणिस्तानने जगाच्या नकाशावर ठसा उमटवायला सुरवात केली आहे.
अचानक हे पुस्तक दिसलं आणि शीर्षक वाचून उत्सुकता निर्माण झाली.
वाचायला सुरुवात केली पण सुरवातीला मला हे पुस्तक खुपच रुक्ष वाटलं जणुकाही निर्विकार चेहरा करून एखादा वार्ताहर माहिती सांगतो आहे. थोडसं वाचून झाल्यावर पुस्तक बाजूला ठेवलं. (कारण दुसरं पुस्तक *वनवास* होतं) असं वाटलं की अभ्यासाचे पुस्तक वाचते आहे. फक्त माहिती आणि माहिती च मिळत होती. अर्थात ती अतिशय उत्तम होती. अनुभव तर सच्चे होते मग नेटाने वाचलं आणि खरं सांगायचं तर प्रचंड प्रमाणात आपल्याला अफगाणिस्तानची माहिती मिळते. खरोखरच अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिले आहे.
नंतर मात्र दोन दिवसात पुस्तक वाचले. लेखिकेच्या लिखाणाची स्टाईल नंतर आवडली. उगीचच अलंकारिक भाषा किंवा एकासाठी एक उदाहरण असं काही नाही आहे. कारण ती जे जगतं होती, अनुभवत होती ते आपल्या सर्वसामान्य लोकांपेक्षा खूप वेगळं जग होतं.

दरी आणि पाश्तो या तिथल्या भाषांची थोडीफार ओळख वाचकाला होते. तिथल्या निवडणूकांचा अभ्यास लेखिकेने केला आहे. लोया जिरगा ही एक प्रकारची सभाच आहे. त्यात विविध विषयांवर चर्चा होते. स्त्रियांचा सहभाग ही असतो पण दुसरीकडे त्या लिहीतात की एखाद्या कुटुंबातील सदस्याने गुन्हा केला असेल तर त्या कुटुंबातील कुमारी मुलगी दुसर्‍या कुटुंबातील प्रौढ व्यक्तीला द्यायची.
हे वाचून अफगानिस्तान बद्दलच्या कल्पनेला जराही धक्का बसला नाही. म्हणजे अधिकार कोणते दिले गेले हा प्रश्न उरतोच.

हल्ला आणि हल्ल्यानंतर ही दोन्ही प्रकरण नक्कीच वाचा.
मला लेखिकेच आवडलेल वाक्य म्हणजे *युद्ध फक्त शस्त्रास्त्र, रणनीती आणि शौर्य यांची साहसकथा नसते तर ती दुःख, अश्रु, शोषण, अन्याय आणि हतबलता यांचीही अविरत गाथा असते*.
अनुभव आल्यावर निघालेले शब्द आहेत.

सार - ए-पूल आणि ज्वाझ्जान या दोन प्रातांतील अनुभव अफगाणी स्त्रिया त्यांच्या पायावर उभं राहून अर्थाजन करतात हे वाचून आनंद होतो पण नंतर हा क्षणिक टिकणारा आनंद लेखिकेसोबत आपल्याला ही दुखावून जातो, उदास करतो. आयुष्याची शाश्वती नाहीच!

निरोप आणि निवडणूका आणि पुढची वाटचाल ह्यात वास्तव, धर्म, मदत करणाऱ्या देशाची मानसिकता की स्वार्थीपणा या गोष्टीचा उहापोह केला आहे.
भारत, पाकिस्तान, अमेरिका आणि चीन हा लेख आवर्जून वाचा.

खूप खूप दिवसांनी एक वेगळ्या जाॉनरचं पुस्तक वाचले.अफगणिस्तान या देशाबद्दल इंटरेस्ट असेल तर जरूर वाचा, फक्त वेळ काढून. एका बैठकीत संपणारे हे पुस्तक नाही आहे.

वर्षा हेमंत फाटक, पुणे
27 /6/2024

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »