कविता : अर्थाचे रहस्य
अर्थाचे रहस्य
अर्थाचा होता अनर्थ
गैरसमजाची ठिणगी पडते
नात्यास उगा फास बसुनि
शत्रुत्वाची निर्मिती होते
दोषारोपण, वल्गना जन्म घेते
ताडनाचे तांडव उठते
पायरी दाखवून एकमेकांची
तोंडसुखाची खैरात होते
प्रेमाचा मग लोप होतो
तिरस्कार जन्माला येतो
वात्सल्याची झूल उतरवत
क्रौयाचा अंगार पेटतो
गमावलेल्याचे परतणे
शक्याच्या पलिकडे होते
बंद कवाडांचे उघडणे
अशक्यप्राय भासते
अचानक मग अर्थ गवसतो
पश्चात्तापाची लाट उसळते
अश्रूजलाची शिंपण होऊन
वैरत्व ते नाश पावते
सामसूम झालेली वाट
किलबिलाटाने गजबजते
अनर्थातील व्यर्थता कळते
सुखाचे शिखर नजरेस येते
वर्षा हेमंत फाटक, पुणे
7/9/2024
- Varsha Hemant Phatak
« Prev
Next
»