*डाॅग बॉय* मूळ लेखिका *इव्हा हॉर्नंग* अनुवाद : *स्वाती काळे* 'तुटक्या काचेचे तुकडे पोटात गेल्यावर माणूस मरतो बरं' हे वाक्य आणि सुरुवातीची भयाण शांतता, बोचरा एकटेपणा, असहनीय भूक वाचतांना अंगावर येते. एका क्षणी वाटलं नकोच वाचायला. त्या उदासीनतेचं वर्णन करतांना एक वाक्य आहे... मेलेल्या माशाचा सुरकतलेला डोळा दिसावा तशी! ही उपमा सगळं सांगून जाते. एवढ्या प्रचंड थंडीत तो एकटा लहान, भुकेला मुलगा कधी आणि कसा स्वतःचे निर्मनुष्य, अन्नाचा एकही दाणा नसलेले घर सोडत त्या तीन कुत्र्यांच्या मागे जातो, पोटात भुकेचा डोंब उसळलेला असतो आणि त्या कुत्रीची भुकेली पिल्ले तिला चिकटतात, आसुसल्या नजरेने त्या दूध पिणाऱ्या पिल्लांकडे बघणाऱ्या रोमोचकाच्या मनातील विचार वाचकाला कळतात आणि आपल्याला गलबलायला होतं. आई ती आईच असते! जनावरातसुद्धा! आपण सुन्न होतं जातो, प्राणिमात्रांना भूतदया दाखवा असे आपण म्हणतो पण इथे दयाळू कोण होतं? नकळतपणे रोमोचकाच्या खऱ्या आई आणि काकांचा विचार मनात येतो. काय झाले असेल नक्की? रोमोचका नंतर हळूहळू कुत्र्यांच्या दुनियेत रमतो. रोमोचोका आणि ब्लॅक सिस्टरचा उंदीर मारण्याचा प्रसंग, हट्टी बहिणीला खूश केल्याचा आनंद आणि उंदराचे दात जपून ठेवावेत आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा वापरावेत... हे वाक्य एका मानवाच्या मनातील आहे की उंदराच्या बरगड्यातील मऊ मास खाणाची इच्छा असणाऱ्या डाॉगबाॅयचं ? हा प्रश्न रेंगाळत राहतो. हळूहळू रोमाचका त्याच्या कल्पकतेने सर्व कुत्र्यांची पोट भरतो.शिकार करतो. शेवटी माणसाला माणूस असण्याची जाणिव नसली तरी जनावरांपेक्षा तल्लख मेंदू त्याच्याकडे होता. कुत्र्यासाठी खाऊ मागणारा मुलगा अशी रोमोचकाची ओळख होते. मॅमोचका त्याची आई,व्हाईट सिस्टर, ग्रे ब्रदर ही त्याची भावंड थंडीपासून सतत त्याचे रक्षण करतात. हळूहळू शहरात भीक मागायला सुरवात केल्यावर मात्र रोमोचिकला पहिल्या आईची आठवण येते आणि आपल्याला पण! तिला भेटायला आपणही उत्सुक होतो. आणि एक दिवस मॅमोचका अंधारात एक तान्हे बाळ चुकून घरात आणते आणि रोमोचकाला तो मनुष्य असल्याची जाणीव होते.तो त्याचं नाव ठेवतो आणि अचानक कथेत दिमित्री आणि नताल्याची एंट्री होते आणि एक वेगळेच जग, वेगळा अनुभव, वेगवेगळ्या भावनांची देवाणघेवाण आपण अनुभवत राहतो, स्तिमित होतो. मनुष्याच्या स्वार्थीपणाची जाणीव तीव्रतेने होते. अचानक डाँगबाॅयला त्याचा काका दिसतो, अर्थात तो तेव्हा माणसासारखाच वागतो. लाँरेंन्शिआचा विश्वासघात आणि त्यामुळे त्याची आई मॅमोचका, ग्रे बदर, व्हाईट सिस्टर यांचा सर्वांचा एकदम झालेला मृत्यू आणि मिलीटझ् च्या तावडीत सापडलेला रोमोचका. डोक सुन्न होतं. तो सैरभैर होतो. कोण चांगले, कोण स्वार्थी? कोणाचा उद्देश किती महान? रोमोचका खरंच माणसाच्या जगात परत येतो का? की शेवटी कुत्र्यांचे संस्कारच प्रभाव पाडतात? शेवट थरकाप उडवणारा! कुत्र्यांच्या दुनियेचे कधीच न वाचलेलं वर्णन गुंग करतं. त्यांच्या भावभावना, वागणं, खेळणं, एकमेकांची काळजी घेणं, रागावणं सगळं अवर्णनीय आहे. अफाट कल्पनाशक्तीची प्रचिती त्या कुत्र्यांच्या कुटुंबांचे वर्णन वाचतांना होते. तिथला हिमवर्षाव, गरीबी ओघाओघाने समोर येतच. अतिशय उत्तम, वेगळ्या जाॅनरचे पुस्तक वाचल्याच समाधान मिळतं. वर्षा हेमंत फाटक, पुणे