टीव्हीवर 'ये क्या जगह है दोस्तो ये कौनसा गयार है...' हे गाणं सुरु होतं. सिनेमा उमराव जान! पलिकडे तिची आई आणि इकडे ही नाचताना मनातल्या भावना, ओढ व्यक्त करते आहे, सगळ्या आठवणी, दुःख दाटून आले आहे, ती डोळ्यातून काहीतरी शोधते आहे, एक उर्मी दाटून आली आहे, काहीतरी हवं आहे आणि ते तिला मिळणार नाही हे जाणवून मी टीव्हीसमोर बसून रडते आहे, हे नेहमीचंच!
मेरे लिए भी क्या कोई उदास, बेकरार हैं! ये क्या जगह है.......
कदाचित मी पण एक आई आहे म्हणून ती भावना हृदयाच्या जास्त जवळची वाटली आणि डोळ्यात पाणी आलं. पण मी सेंटीमेंटल झाले होते.
आणि दुसरा प्रसंग अंधा कानून सिनेमातील. अभिताभ त्याच्या मुलीच्या प्रेताजवळ कॅडबरी ठेवतो तो प्रसंग! हमखास प्रेक्षक सेंटीमेंटल होतोच होतो. ही दिग्दर्शकाची किमया! मी मनसोक्त रडते. आता होते सेंटीमेंटल! स्वभाव!
सेंटीमेंटल होणे म्हणजे प्रत्येकवेळी डोळ्यातून पाणी येणे असेही नाही. पण मला वाटतं आपलं मन आणि डोळे यांचे काहीतरी नाते नक्कीच आहे. हृदयाला ठेच लागली की डोळ्यात लगेच पाणी कसं येतं?
पण आयुष्यातही असे बरेच प्रसंग घडतात तेव्हा आपसूकच डोळ्यात पाणी उभं राहतं. मला वाटतं आम्ही बायका जास्त भावनाप्रधान असतो की काय!
समोरच्याचे दुःख पाहून कढ येणं हे साहजिकच आहे. डोळे भरून येणे. का येतात? नाही माहीत पण हा स्वभाव असतो.
कधी कधी या सेंटीमेंटल ची टर उडवली जाते! क्या रे इतना सेंटी होता है! ये देख रो रहा है। हे वाक्य ऐकावं लागतं.
कोणी आपल्याशी एखाद्या प्रसंगात चांगले वागले, अचानक अपेक्षा नसतांना मदत केली तरी आपले डोळे भरून येतात, तेव्हा शब्दांची अजिबातच गरज नसते. भावना पोहचतात!
एकदा माझ्या मुलीला खूप बरं नव्हते. आम्ही रात्री हाॅस्पीटलमधून घरी आलो तर डायनिंग टेबलवर सर्व जेवण तयार होतं. आमटी, कोशिंबीर पासून. माझ्या जवळच्या मैत्रीणी अजून कोण? सेंटीमेंटल होणार नाही तर काय?
या छोट्या छोट्या प्रसंगांतून आपण माणसं ओळखायला शिकतो. मी तिला अजिबात थॅंक्स चा मेसेज पाठवला नाही कारण तिथे शब्द तोकडे पडतात आणि काही गरजच नसते. सकाळी माझ्या पाणावलेल्या डोळ्यातून आणि शब्दांतून तिला सर्वकाही कळलं.
सेंटीमेंटल होतांना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवणे गरजेचे आहे की ती भावनिकता चूकीच्या दिशेला तर जातं नाही ना?
कारण या भावनिकतेशी निगडित असलेल्या गोष्टींचा अपेक्षाभंग झाला की मग भावनिकतेची जागा कठोरता घेते आणि खुनशीपणा येतो. ही अवस्था भयंकर असते. कोणत्याही गोष्टीने टोकाची पातळी गाठली की विपरीत परिणाम दिसणारचं.
भावना नष्ट होऊन विक्षिप्तपणा, विकृतपणा आला की मग ते 'सेंटीमेंटल' होणं महागात पडतं.
दुसर्यांच्या भावना समजून घेणारे लोक जगात असतील तर खरंच हे जग सुंदर होईल पण या स्वार्थी जगात 'सेंटीमेंटल' होऊन जगणं परवडण्यासारखे आहे का?